computer

Tata Neu ७ सुपर ॲप!! वेगवेगळी ॲप्स इन्स्टॉल करण्यापेक्षा हे एकच ॲप इन्स्टॉल केल्याने आपला नेमका काय फायदा होईल?

सध्या डिजिटल युगामुळे कंपन्या आपले ग्राहक स्वतःकडेच कसे राहतील यासाठी प्रयत्नशील असतात. कोविड काळात किंवा त्यानंतरही ग्राहकांचा ऑनलाइन खरेदी करायचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे सगळेजण विविध सेवांसाठी अ‍ॅप वापरतात. म्हणजे कपड्यांसाठी एक अ‍ॅप, औषधांसाठी दुसरे, हॉटेल बुकिंगसाठी तिसरेच. त्यामुळे फोन भरमसाट ॲप्सने भरून जातो. म्हणूनच यावर उपाय म्हणून एक सुपर ॲप लॉन्च झाले आहे. या सुपर ॲपचे नाव आहे Tata Neu ७ . टाटा ग्रुपने नुकतीच याची घोषणा केली आहे. ७ एप्रिल रोजी ते लॉन्च झाले आहे. आज पाहूयात Tata Neu ७ आहे काय आणि या सुपर ॲपचा फायदा काय?

सुपर अ‍ॅप म्हणजे सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. खाणे, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे,औषधे, फ्लाइट आणि हॉटेल्सचे बुकिंग हे सर्व एकाच ठिकाणी या ॲपद्वारे करणे शक्य होणार आहे. त्यामुळे इतर flipkart, Amazon, Paytm, Reliance Jio यांच्यासारख्या अनेक अ‍ॅप्सला याची तगडी स्पर्धा होणार आहे. या इतर सर्व ॲप्सपेक्षा यात सुविधाही अधिक मिळणार असल्याची ग्वाही Tata Neu ७ ने दिली आहे. याशिवाय यामध्ये बऱ्याच ऑफर्सचा फायदा ग्राहक घेऊ शकतात. म्हणजे खरेदी केल्यास ग्राहकांना काही NeuCoins मिळतील आणि ती पुढच्या खरेदीसाठी वापरता येतील.

Tata Neu७ वर कोणत्या सेवा उपलब्ध आहेत?
 

टाटा ग्रुपच्या विविध डिजिटल सेवा, म्हणजेच AirAsia India, Air India वर फ्लाइट तिकीट बुक करणे, ताज ग्रुपचे हॉटेल बुक करणे, BigBasket वरून किराणा मालाची ऑर्डर करणे, 1mg वरून औषधे घेणे किंवा Croma मधून इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स खरेदी करणे, तसेच Westside वरून कपडे घेणे शक्य होईल. या ॲपमधून खरेदी केल्यास सूटही मिळू शकते.
याशिवाय अ‍ॅपद्वारे तुम्ही मोबाइल, DTH किंवा विज बिलही भरू शकता. इतकेच नाही तर तुम्ही पैसे पाठवणे आणि घेणे या दोन्ही प्रक्रिया करू शकता.
 

काही आठवड्यांपूर्वी TataNeu अ‍ॅप टाटा कर्मचाऱ्यांसाठी उघडण्यात आले होते. प्रत्येक टाटा कर्मचाऱ्याला टाटा सुपर अ‍ॅप वापरण्यासाठी त्याच्या ओळखीच्या पाच लोकांना आमंत्रित करण्याची परवानगी देण्यात आली होती आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेसोबतच त्यांनी पहिल्यांदाच सुपर ॲपची जाहिरात करण्यास सुरुवात केली आहे.

७ एप्रिलला हे सुपरॲप जोरदार लाँच झाले आहे आणि हे सर्वांसाठी playstore वर उपलब्ध आहे.. याच्या डिझाइनवर सुद्धा विचार करण्यात आला आहे. ग्राहकांना सर्व सेवा कशा सुलभतेने वापरता येईल हे पाहिले गेले आहे. आता येणारा काळच सांगू शकेल की हे सुपर अ‍ॅप कसे फायदेशीर ठरते! तुमचे काय मत आहे ?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required