५० हजारांचे कर्ज मागणाऱ्या चहावाल्याकडे बँकेनेच केली ५०कोटींच्या कर्ज परताव्याची मागणी?
जगभरात रोजच्या रोज अशा घटना घडत असतात ज्या पाहून ऐकावं ते नवलच असं वाटतं. हरियाणामधल्या कुरुक्षेत्र येथे अशीच एक विचित्र घटना घडली आहे. एक चहावाला बँकेत कर्ज घ्यायला गेला तर बँकवाल्यांनी चक्क आधीचे ५० कोटी परत कर म्हणून त्याला सुनावले.
भारतात भिकाऱ्यांचेसुद्धा कित्येक फ्लॅटस् असतात. तिथे चहावाल्याने पण ५० कोटींचे कर्ज घेतले तर काही विशेष वाटणार नाही. पण कर्जप्रकरणं एवढी सोपी असतात का? बँक कर्ज देण्याआधी तुम्ही ते परत करू शकता का हे ही तपासत असते. ५० कोटींचे कर्ज घेणारा मनुष्य एका छोट्याशा टपरीवर चहा विकणार नाही हे साधंसोपं गणित आहे. असो.
तर त्या चहावाल्याचं नाव राजकुमार आहे. त्याचं असंही म्हणणं आहे की जर कधीकाळी मी ५० कोटींचं कर्ज घेतलं असतं तर आज फक्त ५० हजारांचं कर्ज घ्यायला गेलोच कशाला असतो? तर अस हे सगळं गुंतागुंतीचे प्रकरण होऊन बसले आहे.
राजकुमारच्या म्हणण्यानुसार कोरोनामुळं तसाही धंदा ठप्प झाला होता. या आर्थिक समस्येचा इलाज करावा म्हणून तो बँकेत कर्ज घ्यायला गेला. कर्जासाठी अर्ज केल्यावर बँकेनं कळवलं की आधी ५० कोटी ७६ लाखांचं कर्ज परत कर. आता विचार करा, त्या बिचाऱ्याची काय मनस्थिती झाली असेल!!
राजकुमारच्या लोन डिस्क्रिप्शननुसार त्याने दर महिन्याला कर्ज घेतले आहे. यांमध्ये किसान क्रेडिट, ऑटो आणि ट्रॅक्टर लोन सामील आहे. यावरून असा अंदाज काढला जात आहे की एकतर त्याच्याच नावासारख्या नावाच्या दुसऱ्या कुणीतरी कर्ज घेतले असेल किंवा कुणीतरी राजकुमारच्या अकाऊंटवरून कर्ज घेऊन बँक आणि राजकुमार दोघांची फसवणूक केली आहे.
चौकशी झाल्यावर सत्य काय ते बाहेर येईलच, पण एक मात्र नक्की लोकांचे अशा घटना वाचूनच मनोरंजन करवून घ्यावे लागत आहे. गेल्यावर्षी एकाच नावाच्या दोघा माणसांना एका बँकेने एकच खातं दिलं होतं, त्यात एक पैसे भरत होता आणि दुसरा सरकार हे पैसे आपल्याला देत आहे या गैरसमजात पैसे काढून घेत होता. यावर्षी हा किस्सा घडलाय, आता पुढे काय होतं हे फक्त पाहात राहायचं!!