computer

साडीत ब्लॅकफ्लिप करणारी ही मुलगी आहे तरी कोण? इन्स्टाग्राम, वीगो, टिकटॉक गाजवलंय पोरीनं !!

कोणतंही कौशल्य मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. गायन, चित्रकला, लेखन, ज्युदो, कराटे, योगा असं कुठलंही क्षेत्र असलं तरी फक्त सराव, सराव आणि सराव हाच मंत्र तुम्हाला स्किल्ड बनण्यासाठी उपयोगी पडतो. टीव्हीवर डान्सचे कितीतरी रियालिटी शो तुम्ही बघितले असतील. त्यातील अगदी लहान मुलंही किती सराईतपणे जिम्नॅस्टिक्सच्या कसरती करतात. त्यांच्या त्या कसरती पाहून डोळे विस्फारल्या शिवाय राहत नाहीत.

जिम्नॅस्टिक्स हा कसरती खेळ आहे. यात खेळाडूची लवचिकता, ताकद आणि तोल सांभाळण्याचे कौशल्य अशा सगळ्याचीच परीक्षा घेतली जाते. खरं तर जिम्नॅस्टिक्समध्ये स्नायूंची लवचिकता जितकी महत्वाची तितकाच जिम्नॅस्टिक्स करताना तुम्ही कोणता पेहराव वापरता तो ही महत्वाचाच. हा खेळ भारतीयांसाठी अगदी नवखा असला तरी ऑलम्पिकमध्ये अनेक भारतीयांनी या खेळात चमकदार कामगिरी करून भारताचे नाव मोठे केले आहे.

पण, आता जिम्नॅस्टिक्स हा खेळ चर्चेत आला आहे तो मिली सरकार या १७ वर्षाच्या तरुणीमुळे. पश्चिम बंगालच्या रायगंज गावातील मिली सरकार ही एक उत्तम जिम्नॅस्टिकपट्टू आहे. मिलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून नेहमीच ती जिम्नॅस्टिक्सचे व्हिडीओ शेअर करत असते. अलीकडेच तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या व्हिडीओत असे नेमके काय आहे, ज्यामुळे मिली सरकार समस्त नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरली?

मिलीने यावेळी ब्लॅकफ्लिपचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे ब्लॅकफ्लिप करताना तिने साडी नेसली आहे. आता तुम्हीच कल्पना करा ब्लॅकफ्लिप आणि तेही साडीत! करवते तरी का ही कल्पना आपल्याला? नाही ना! पण, मिलीने हे वास्तवात करून दाखवले आहे. साडीतही तिने इतक्या सफाईदारपणे हे ब्लॅकफ्लिप्स केले आहेत की, पाहणाऱ्याचे डोळे विस्फारले जातील.

साडी घातल्यानंतर अनेकींचा चालतानाही किती गोंधळ उडतो. तिथे जिम्नॅस्टिक्स करण्याची कल्पनाही कुणी करणार नाही. पण, मिलीने ही कल्पना केली आणि ती प्रत्यक्षात उतरवूनही दाखवली. मिलीचा हा व्हिडीओ दहा लाखपेक्षाही जास्त लोकांनी पाहिला आहे. अनेक सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ट्विटरवरही लाखो लोकांनी याला पसंती दर्शवली आहे.

खरे तर ही तरुण नर्तिका नेटकऱ्यासाठी अगदीच अपरिचित आहे असे नाही. तिच्या वीगो अकाऊंटवर तिचे सात लाख फॉलोअर्स आहेत. तिने टीकटॉकवर देखील आपली कला दाखवलेली आहे. टिकटॉकवरही तिचे तितकेच फॉलोअर्स आहेत. परंतु सध्या भारतात या दोन्ही अॅप्सवर बंदी आलेली असल्याने तिने अलीकडेच इन्स्टा अकाऊंट सुरु केले आहे आणि इथेही तिला जबरदस्त फॅनफॉलोइंग मिळाली आहे.

तिच्या या अनोख्या प्रयोगाची कल्पना तिला कशी सुचली, असे विचारले असता मिली सांगते, “तसा साडीत वावरण्याचा मला जास्त अनुभव नाही. पण, ही कल्पना अगदीच वेगळी वाटली म्हणून हा प्रयोग करून पाहिला. खरे तर मला माझ्या बहिणीने हे सुचवलं.” हे सांगताना मिलीच्या चेहऱ्यावरील हास्य लपता लपत नाही.

मिलीला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे. गेल्या पाच वर्षातच तिला तिच्या नृत्याचे व्हिडीओ शूट करून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याचा मार्ग सापडला. यात तिची मोठी बहिण शिवलीची ही तिला खूप मदत झाली.

तिने केलेले हे छोटे-छोटे व्हिडीओ एडीट कसे करायचे आणि ते अपलोड कसे करायचे हेही तिचे तीच शिकली. सुरुवातीला ती व्हिगो या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ अपलोड करायची. तिथे तिच्या व्हिडीओना प्रचंड प्रतिसाद मिळत असे. ज्यामुळे मिलीला प्रोत्साहन मिळत गेले आणि ती यात अधिकाधिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी नियमित सराव करू लागली.

नेटवर काय चालेल आणि काय नाही याची नस टीनएजर्सना तरी लगेच सापडते. मिलीलाही नेटकऱ्यांची नस अचूक सापडली. तिचे योगा आणि जिम्नॅस्टिक्सच्या व्हिडीओना जास्त प्रसिद्धी मिळते हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने याच दोन गोष्टींवर विशेष भर दिला. तिच्या घरच्यांनीही तिला या दोन्ही गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिचे यातील कौशल्य वाढवण्यासाठी तिचे बाबा स्वतः तिचा सराव करुवून घेऊ लागले. मिलीचे कुटुंब हे एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब आहे. तिचे वडील ड्रायव्हर आहेत आणि आई गृहिणी. तिच्या वडिलांनाही योगासनांची आवड आहे. त्यांनी स्वतः आवर्जून हा छंद जोपासला आहे. मिलीला एक मोठा भाऊ आहे, जो सध्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी छोटी-मोठी कामे करतो. असे हे एक सर्वसाधारण कुटुंब.

योगा शिकण्यासाठी मिलीने खास क्लास लावला होता. पण, पैशाच्या अडचणींमुळे तिला हा क्लास अर्ध्यातच सोडवा लागला. व्हिगो वरून तिला प्रसिद्धी मिळाल्याने तिला वेगवेगळ्या ठिकाणाहून कार्यक्रमांसाठी बोलावले जाऊ लागले. यातून जी काही थोडी बहुत कमाई तिला झाली त्यातून तिने एक चांगला फोन विकत घेतला. जेणेकरून तिला अधिक चांगले व्हिडीओ शूट करता येतील. शिवाय, व्हिडीओसाठी चांगले फॅशनेबल ड्रेस, मेकअपसाठी आवश्यक साधने अशाही गोष्टींची जमवाजमव करणे शक्य झाले. तिने स्वतःचे एक युट्युब चनेल सुरु केले आहे ज्यावरून ती व्हिडीओ प्रसिद्ध करत असते. या चनेलवर ती विशेष करून तिच्या नृत्याचे व्हिडीओ अपलोड करते.

मिली पश्चिम बंगालच्या एका छोट्याशा खेड्यात राहते. इथे तिला योग्य त्या सोयीसुविधा आणि मार्गदर्शन मिळणे तसे कठीणच आहे. तिचे व्हिडीओ शूट करण्यासारखी चांगली ठिकाणे कमीच आहेत. युट्युबवर व्हिडीओ टाकायचे म्हणजे त्यासाठी खूप सारी मेहनत लागते. सध्यातरी मिलीला यावर फारसे काम करता येत नाहीये. याची तिला कधीकधी खंत वाटते. पण, तिच्यातील कलेची जोपासना करण्याचा उत्साह मात्र वाढतच आहे. मिलीने नृत्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांचा दौरा केलेला आहे. नृत्याविषयी तिला असलेली ओढ यातून कळते.

मिली सारख्या छोट्या-छोट्या गावातील कलाकारांसाठी हल्ली इंटरनेटवरील विविध प्लॅटफॉर्म म्हणजे एक वरदानच ठरत आहे. ज्यामुळे त्यांना त्यांची कला लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळते.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required