माणूस जास्तीत जास्त जंगल तोडून स्वतःसाठी अधिकाधिक जागा तयार करतोय आणि ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. या समस्येचा परिणाम स्वतः माणसावर फारसा झालेला नसला तरी प्राण्यांसाठी मात्र ही जीवाची लढाई होऊन बसली आहे. आज आम्ही जी बातमी घेऊन आलो आहोत ती तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल.
कोणताही प्राणी स्वतःचा प्रदेश ठरवून ठेवत असतो. त्या प्रदेशात इतर प्राण्यांनी आलेलं त्याला चालत नाही. वाघ हा प्राणी आपल्या प्रदेशाच्या बाबतीत इतर प्राण्यांपेक्षा जास्त संरक्षणात्मक असतो. त्याला कारणही आहे. ज्या जागी मुबलक पाणी, अन्न आणि जोडीदार असेल तिथेच वाघ ठाण राहतो. अशी बरोबर जागा शोधण्यासाठी त्याला बराच प्रवास करावा लागतो. सध्या जंगल कमी होत असल्याने हा प्रवास कैकपटीने वाढला आहे. या वाघाला तर आपला प्रदेश शोधण्यासाठी तब्बल १३०० किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे.










