अमेरिकेने चक्क मेक्सिकन मुलांना अनाथआश्रमात डांबलं ?? काय आहे कारण ?

मंडळी, जगातील प्रत्येक देशाला त्यांचे त्यांचे असे काही ज्वलंत प्रश्न आहेत. आता यात बलाढ्य देशांपासून ते अगदी गरीब देश सगळेच येतात. यात अमेरिका सुद्धा आला बरं का. राव अमेरिका सारखा बलाढ्य देशाला कोणती समस्या भेडसावत असेल ? तर मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अमेरिकाचं बलाढ्य असणंच त्यांच्या जीवावर उठलं आहे. कसं ? चला जाणून घेऊ !!

त्याचं काय आहे ना राव, दरवर्षी किंवा आपण असं म्हणून दरदिवशी अनेक मेक्सिकन नागरिक अवैधरीत्या अमेरिकेची बोर्डर ओलांडतात. मेक्सिको हा अमेरिकेच्या शेजारील देश असला तरी अमेरिकेएवढा प्रगत नाही. मेक्सिको देश गुन्हेगारी, हिंसा व गरिबीमुळे ग्रासलेला आहे. त्यामुळे तिथले नागरिक एका चांगल्या भविष्याच्या शोधात अमेरिकेत येतात. हे नागरिक एकटे दुकटे येत नसून संपूर्ण कुटुंबासहित येत असतात. हे म्हणजे आपल्या मुंबई सारखंच आहे. पण मुंबई मध्ये येणं अवैध नाही एवढाच काय तो फरक.

स्रोत

तर, मेक्सिकन अमेरिकेत येतात हे अर्थात अवैध असल्याने अशा स्थलांतरितांना जेलची हवा खावी लागते. अमेरिकेला या कामासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. बॉर्डर सुरक्षेसाठी व तुरुंग व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या खर्चाचा बोझा अमेरिकेच्या तिजोरीवर पडत असतो. राव, एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असूनही मेक्सिकन लोक जीवावर उदार होऊन अमेरिकेत शिरतात. आजवर अनेकजण बॉर्डर ओलांडताना मृत्युमुखी पडले आहेत. एकूण काय तर लाखो डॉलर्स खर्च करून अमेरिकन्स सुरक्षा व्यवस्था वाढवतात आणि मेक्सिकन त्यातूनही मार्ग काढून देश ओलांडतात.

स्रोत

अमेरिकेच्या प्रगत असण्यामुळे ही डोके दुखी त्यांना अनेक वर्षापासून सतावत आहे. या समस्येवर नुकताच ट्रम्प सरकारने एक नवीन तोडगा शोधून काढलाय. अमेरिकेच्या नव्या पॉलिसी नुसार स्थलांतरितांच्या कुटुंबातील प्रौढांना अटक केली जात असून लहान मुलांना मात्र वेगळं काढलं जात आहे. या मुलांना अमेरिका चक्क अनाथाश्रमात डांबत आहे. हे अनाथ अश्राम सुद्धा अनाथाश्रम नसून एक कोठडी वजा जागा आहे.

स्रोत

आता पर्यंत २००० मुलांना या नियमाखाली ताब्यात घेण्यात आलंय. अमेरिकेच्या या निर्णयाने जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे. या कार्यवाहीला जगभरातून अमानवी आणि क्रूर म्हटलं जातंय.

मंडळी, फक्त मेक्सिकन नाही तर मध्य अमेरिकेतल्या देशातून अनेक नागरिक अमेरिकेत येत असतात. होन्डुरास, ग्वाटेमाला, एल साल्वादोर या देशातील हे नागरिक असतात. हे देश मेक्सिकोच्या दक्षिणेला असल्याने त्यांना मेक्सिकोतून किंवा समुद्र मार्गे अमेरिका गाठावी लागते. सध्या अटक झालेल्या कुटुंबात या देशातील नागरिकांचा देखील समावेश आहे.

मंडळी, अमेरिकेने स्थलांतरितांच्या प्रश्नावर तोडगा म्हणून जे पाऊल उचललं आहे त्याबद्दल मतभेद आहेत. काहींना हा निर्णय अगदी योग्य वाटतोय तर काहींना हा अमानुषपणा वाटतोय. याबद्दल काही मुद्दे समजून घेतले पाहिजेत.

स्रोत

१. काहींच्या मते हा प्रकार म्हणजे बाल शोषण आहे. या मताचे विरोधक म्हणतात की अमेरिकेने या मुलांना फक्त त्यांच्या कुटुंबीयांपासून वेगळं केलं असून त्यांच्यावर कोणतेही अत्याचार केलेले नाहीत. त्यामुळे या प्रकाराला बाल शोषण म्हणणे चुकीचं ठरेल..

२. प्रौढांना एकत्र करून त्यांच्या मुलांना त्यांच्यापासून हिरावणे म्हणजे मानवाधिकाराचे उल्लंघन आहे असं काहींचं मत आहे. पण अमेरिकेचे समर्थक म्हणतात की अमेरिकेने त्यांच्या देशात येणाऱ्या स्थलांतरितांना कायदेशीररीत्या अटकाव करण्यासाठी हा मार्ग अवलंबला आहे ज्यात चुकीचं काहीच नाही.

 

मंडळी, या प्रश्नावर रान पेटलं आहे. अनेक मतमतांतर आहेत. राव याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा !! या प्रश्नावर चर्चा होऊद्या राव !!

सबस्क्राईब करा

* indicates required