स्वित्झर्लंडच्या या गावात राहण्यासाठी मिळतायत तब्बल २५००० डॉलर्स !!
स्वित्झर्लंड मध्ये जाण्यासाठी खिश्यात तेवढे पैसे असावे लागतात किंवा निदान स्विस बँकेत तरी अकाउंट असावं लागतं. हे दोन्ही असलं तरी निसर्ग सौंदर्य बघून आपल्याला तिथे कायमचं राहता येत नाही. अश्यावेळी आपण टीव्हीवर यश चोप्राचे सिनेमे बघूनच समाधान मानू शकतो कारण अर्धा स्वित्झर्लंड तर तिथेच आहे. (खरं तर सिनेमात जे स्वित्झर्लंड दाखवतात ते काहीवेळा 'इस्टोनिया' असतं'.). पण राव, समजा स्वित्झर्लंडच्या एका सुंदर आणि रम्य गावात तुम्हाला राहायला मिळालं आणि तिथे राहण्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळाले तर ?
मंडळी आम्ही काय तुमची फिरकी घेत नाहीये. हे खऱ्या आयुष्यात होऊ शकतं. स्वित्झर्लंडच्या एका गावात चक्क तिथे राहण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत. चला याबद्दल आणखी जाणून घेऊया !!
स्वित्झर्लंड मधील अल्पाईन भागातील एका लहानश्या गावात आता गावाबाहेरील लोकांना सुद्धा राहता येणार आहे. या गावाची खासियत म्हणजे इथे राहण्यासाठी मोठ्यांना २५,००० डॉलर तर लहान मुलांना १०.००० डॉलर्स दिले जातील. अट फक्त एवढीच की तुमचं वय ४५ पेक्षा कमी असावं आणि तुम्ही किमान १० वर्ष तरी या गावात राहिलं पाहिजे. या नियमांचं उल्लंघन केल्यास आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो.
पैसे घेण्याऐवजी देत का आहेत !!
याचं उत्तर म्हणजे या गावाची कमी होत जाणारी लोकसंख्या. नोकरी, कामधंद्याच्या शोधात या गावातील लोक गाव सोडून निघून गेले आणि आता परिस्थिती अशी आहे की गावात फक्त २४० लोक उरलेत. शेवटी गाव वाचवण्यासाठी गावातल्या लोकांनी ही शक्कल लढवली.
स्वप्नातच विचार करू शकतो असं हे गाव, तिथे राहण्यासाठी जर पैसे मिळत असतील तर कोण नाही जाणार भाऊ !!!