ट्रेनच्या मागच्या बाजूस हा 'X' का असतो राव ? जाणून घ्या काय आहे कारण !!
आपण ट्रेनने अनेकदा प्रवास करतो. लांबच्या प्रवासाला जाताना आपण ‘एक्स्प्रेस’ ने जातो. यावेळी आपण एक गोष्ट बघितली असेल. ती म्हणजे ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर लिहिलेला पिवळ्या रंगातील ‘X’. हा X तिथे का असतो मंडळी ? माहित आहे का ? नाही ? मग चला जाणून घेऊया !!
मंडळी या X चा अर्थ होतो ट्रेनचा शेवटचा डब्बा. या X मार्कमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना इशारा मिळतो की पूर्ण ट्रेन निघून गेली आहे. आता हे पिवळ्या रंगातच का असतं? तर याचं उत्तर आहे, पिवळा रंग हा मानवी डोळ्यांना लांबूनही दिसणारा रंग आहे. पिवळा रंग इतर रंगांपेक्षा लवकर दृष्टीस पडतो. त्यामुळे अनेक महत्वाच्या ठिकाणी लावलेले फलक हे पिवळ्या रंगातच आपल्याला दिसतील.
X शिवाय अजून दोन गोष्टी आहेत ज्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असतात.
त्यातील एक म्हणजे लाल रंगाचा दिवा. ‘X’ शिवाय एक लाल रंगाचा दिवासुद्धा डब्याच्या तळाला असतो. ट्रेन सुरु झाल्यानंतर याची सतत उघड झाप होत असते. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार हा दिवा असणं तिथे अनिवार्य आहे. हा दिवा एक प्रकारे सिग्नल देण्याचं काम करत असतो.
लाल दिव्याच्या बाजूलाच काळ्या किंवा पांढऱ्या रंगात ‘LV’ लिहिलेलं तुम्ही बघू शकता. या अक्षरांकडे आपलं सहसा लक्ष जात नाही. पण रेल्वे विभागाच्या दृष्टीने हे फार महत्वाचं असतं. आता LV चा अर्थ काय? तर, LV चा अर्थ होतो ‘last vehicle’ म्हणजेच शेवटचा डब्बा!! मंडळी जर ट्रेनच्या शेवटी LV नसेल तर पूर्ण ट्रेन आलेली नाही असं समजलं जातं.
मंडळी पुढच्यावेळी तुम्ही जेव्हा प्रवासाला जाल तेव्हा या तीन गोष्टी बघायला विसरू नका!!