जगातला सगळ्यात वेगवान, उंच आणि सर्वात लांब रोलरकोस्टर तयार होतोय...काय वैशिष्ट्य आहे या रोलरकोस्टरचं ?

तुम्ही जर थरारक खेळांचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक चांगली माहिती घेऊन आलोय. अनेकजण थ्रिल अनुभवण्यासाठी अम्युजमेंट पार्कला जात असतात. उंचच उंच जाणाऱ्या राईड, गोल फिरवणाऱ्या राईड तर काही खूप वेगाने वर खाली जाणाऱ्या राईड तुम्ही अनुभवल्याच असतील. लवकरच याही पुढे जाऊन जगातल्या सगळ्यात वेगवान आणि उंच रोलरकोस्टरचा थरार अनुभवता येणार आहे.
सौदी अरेबियामधील सिक्स फ्लॅग्स किद्दिया येथे हा जगातला सगळ्यात वेगवान, उंच आणि सर्वात लांब रोलरकोस्टर तयार होत आहे. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड हे रोलर कोस्टर मोडेल असा दावा करण्यात येतोय. मध्य पूर्वेत हे रोलर कोस्टर बनत असून लवकरच सर्वांसाठी उघडण्यात येईल. याचे नाव फाल्कन फ्लाईट असे आहे.
किडिया इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या म्हणण्यानुसार फाल्कन फ्लाइट अंदाजे ४ किमी हे ट्रॅकचे अंतर २४९ मैल प्रतितास या विलक्षण वेगाने जाईल. हा वेग आतापर्यंत कोणत्याही रोलर कोस्टर राईडपेक्षा सगळ्यात जास्त असणार आहे. म्हणजे डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच तुम्ही दुसऱ्या टोकाला पोहोचला असाल. हे झाले वेगाबद्दल पण उंचीबाबत वाचलेत तर आताच पोटात गोळा येईल.
हे रोलर कोस्टर ६५५ फूट उंचावर जाऊन ५२५ फूट सरळ खाली येणार आहे. आणि वेगही खूप जोरात असणार आहे. आतापर्यंत कोणी उंच कड्यावरून डायव्हिंग केले नसेल तर हाच थरारक अनुभव त्यांना या राईडमध्ये अनुभवता येईल. हवेत असताना काहीच वजन नाहीये असं वाटेल. नाजूक हृदय असणाऱ्यांसाठी ही राईड नसेल. सुरक्षेची सर्व काळजी या राईडमध्ये घेतली जाईल. पण जे ही राईड करतील त्यांना जगात सर्वात उंच उडत असल्याचा भास होईल. चुंबकीय मोटर प्रवेग (एलएसएम तंत्रज्ञान) हे तंत्रज्ञान यात वापरले गेले आहे. यामुळेच क्षणात खोल दरीत आणि क्षणात उंच कड्यावर गेल्याचा अनुभव येईल.
सध्या हे पाच जगातील सर्वात वेगवान रोलर कोस्टर आहेत.
१. फेरारी वर्ल्डमधील फॉर्म्युला रोसा (अबू धाबी) ...१४९ मैल प्रतितास वेग
२. किंग्डा का सिक्स फ्लॅग्स ग्रेट अॅडव्हेंचर (जॅक्सन, NJ) ...
३. सीडर पॉईंट (सँडस्की, OH) येथील टॉप थ्रिल ड्रॅस्टर ...
४. फेरारी लँड (सलोऊ, स्पेन) येथे रेड फोर्स ...
५. फुजी-क्यू हाईलँड येथील डोडोनपा (यामानशी, जपान)
ही नवी रोलर कोस्टर फाल्कन फ्लाइट या सर्वांना मागे टाकणार. या रोलर कोस्टरची घोषणा झाल्यापासून जगभरातील रोलरकोस्टर चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. ही राईड कधी सुरू होईल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. एकदा का ही राईड सुरू झाली की हा थरार अनुभवायला अनेकजण गर्दी करतील यात शंका नाही.
लेखिका: शीतल दरंदळे