पैसे दुप्पट करण्याच्या अामिषामुळे युवराज सिंगच्या आईचे तब्बल एवढे पैसे बुडाले राव....वाचा पोन्झी स्कीमचा नवा किस्सा !!
आता एवढे एवढे पैसे भरा मग एका वर्षात मालामाल व्हा !! अशा स्कीम मध्ये पैसे गुंतवून आपल्यातले अनेकजण आहेत तेही पैसे गमावून बसले असतील. याला पोन्झी स्कीम म्हणतात. पोन्झी स्कीम म्हणजे तुमच्या १ हजारचे १ लाख करून देण्याचं खोटं आश्वासन. अशा फसव्या स्कीम पासून आपण सामान्य माणसं काय सेलिब्रिटी सुद्धा वाचलेले नाहीत राव. आता आलेलं नवीन उदाहरण बघा ना.
नुकतंच युवराज सिंगच्या आई शबनम कौर यांनी अशाच एका स्कीम मध्ये पैसे गुंतवले होते. या स्कीम मुळे त्यांचे तब्बल ५० लाख रुपये बुडाले आहेत राव.
झालं असं की, साधना इंटरप्राईझ या कंपनीच्या मॅनेजरने शबनम कौर यांच्याकडून जवळजवळ १ कोटी रुपये घेऊन गुंतवणुकीच्या बदल्यात वर्षाकाठी ८४% परतावा देण्याची हमी दिली होती. त्याप्रमाणे त्यांना ५० लाख रुपये मिळालेही होते पण अचानक काही महिन्यांनी पैश्यांचा ओघ थांबला.
शेवटी हा सगळा बनाव असून आपण फसले गेलो आहोत हे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस अजूनही त्या भामट्यांचा तपास घेत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, युवराज सिंगच्या आई त्या अनेक लोकांपैकी एका आहेत ज्यांनी या कंपनीच्या खोट्या स्कीम मध्ये पैसे गुंतवले होते.
शबनम कौर या अशा फसव्या स्कीम्स मध्ये अडकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. युवराज सिंगला जेव्हा कॅन्सर झाला होता तेव्हा त्या त्याला चक्क निर्मल बाबांकडे घेऊन गेल्या होत्या. आता बोला !!
राव, सेलिब्रिटीजनी अशाप्रकारे पैसे गमावण्याची ही पहिली घटना नाही. राहुल द्रविडने अश्या स्कीम मध्ये १५ कोटी तर सायना नेहवालने ७५ लाख रुपये गमावले आहेत.
मंडळी, बऱ्याच वर्षापासून पोन्झी स्कीमचा नुसता सुळसुळाट झाला आहे. RMP आणि ई-बीज अशी काही प्रसिद्ध उदाहरणं देता येतील. पोन्झी स्कीमवरबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी आमचा खालील लेख वाचायला विसरू नका :
सहा महिन्यात पैसे दुप्पट - एक वर्षात लाईफ चौपट ?? तुम्ही कधी फसलात का अशा स्कीम मध्ये ??