व्हॅक्सिन्सचा इतिहास : फ्ल्यू विषाणू, त्याचे प्रकार आणि ते शोधणारे संशोधक थॉमस फ्रान्सिस ज्यूनिअर यांच्या संशोधनाची गोष्ट!!
इन्फ्लुएंझा किंवा सोप्या भाषेत फ्ल्यू हा विषाणूंमुळे (व्हायरसमुळे) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य आजार आहे. वर्षभरात कधीही फ्ल्यू होऊ शकतो, पण हिवाळ्यात तो जास्त प्रमाणात होतो. म्हणूनच त्याला सीझनल फ्ल्यू असंही म्हटलं जातं. या रोगाची लागण प्राण्यांना, पक्ष्यांना आणि माणसांना होते. फ्ल्यूच्या विषाणूचे अ, ब, क, आणि ड असे चार प्रकार (स्ट्रेन्स) आहेत. हे प्रकार उतरत्या क्रमाने हानीकारक आहेत. म्हणजे इन्फ्ल्यूएंझा ‘अ’ विषाणू सगळ्यात जास्त धोकादायक आहे. फ्लूची जागतिक साथ ही या \'अ\' प्रकारच्या विषाणूमुळे आली होती. तुलनेने ‘ब’ व ‘क’ प्रकारचे विषाणू सौम्य असतात. \'ब\' गटातल्या विषाणूंमुळे विशिष्ट प्रदेशात स्थानिक पातळीवर फ्ल्यूच्या साथी येतात. \'क\' प्रकारच्या विषाणूमुळे माणसाला सौम्य स्वरूपाचं इन्फेक्शन होतं. विषाणूचा \'ड\' प्रकार माणसांत रोग निर्माण करत नाही. तो मुख्यतः डुकरं आणि गुरं यांच्यामध्ये आढळून येतो.