हात धुण्याची सर्वोत्तम पद्धत....या सिम्पल ट्रिकने फक्त १० सेकंदात हात स्वच्छ होतील !!
असं म्हणतात की हात पूर्णपणे स्वच्छ धुण्यासाठी २० सेकंदापर्यंत हात चोळत राहणं गरजेचं असतं. पण मंडळी २० सेकंद म्हणजे जरा जास्त नाही का वाटत? आज आम्ही तुम्हाला सांगतो फक्त १० सेकंदात हात स्वच्छ कसे धुवायचे ते. एकदम सिम्पल आयडिया आहे राव.
मंडळी २० सेकंदभर ‘धोते जाओ, धोते जाओ’ म्हणत हात रगडण्यापेक्षा फक्त १० सेकंद साबण आणि थंड पाण्याने हात धुतल्यास हातावरचे सगळे जंतू साफ होतात. हे एका वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध झालं आहे.
राव, टीव्हीवर जाहिरातीत आपल्याला दाखवलं जातं की अमुक अमुक साबण किंवा हँड वॉश वापरल्यावर ९९.९ % किटाणू (उरलेला ०.१ टक्का कोणीही साफ करू शकत नाही) मारले जातात. हे कदाचित खरंही असेल पण मुळात साबण कोणताही असला तरी थंड पाणी हे हात धुण्यासाठी सगळ्यात योग्य समजलं जातं.
यासाठी न्यू-जर्सीच्या रटगर्स विद्यापीठाने एक प्रयोग केला होता. त्यांनी प्रयोगासाठी २१ जणांची निवड केली. या २१ जणांचे हात मुद्दाम घाण करण्यात आले. त्यांनतर त्यांना वेगवेगळ्या तापमानातील पाण्याने हात धुण्यास सांगितलं गेलं. ६० डिग्री, ७९ डिग्री आणि १०० डिग्री फॅरनहाइट अशा वेगवेगळ्या तापमानातील हे पाणी होतं. वापरायचा साबण सुद्धा वेगवेगळा ठेवण्यात आला. एकीकडे हा प्रयोग होत असताना असाच एक प्रयोग थंड पाण्याने करण्यात आला.
प्रयोगातून हे सिद्ध झालं की २० सेकंद वेगवेगळ्या पाण्याने हात धुतल्यानंतर जंतू पूर्णपणे नष्ट तर झाले पण थंड पाण्याने हात स्वच्छ व्हायला फक्त १० सेकंदाचा वेळ लागला. यात एक गोष्ट महत्वाची म्हणजे साबण कोणताही असला तरी फरक पडत नाही, पाणी महत्वाचं आहे.
एकूण हात स्वच्छ धुवायचे असतील तर साबण कोणतंही घ्या पण पाणी मात्र थंडच असलं पाहिजे. नाही तर २० सेकंद ‘धोते जाओ, धोते जाओ’ म्हणत बसावं लागेल.
आणखी वाचा :
फळांवर फवारणी केलेले किटकनाशक घालवायचा हा सर्वोत्तम उपाय आहे !!
टॉवेल आणि बेडशीट्स किती दिवसांनी धुवावेत ? तुम्ही किती दिवसांनी धुता ?