तुम्ही कुठं जाता याची सगळी माहिती गुगल मॅप्सकडे आहे. तुम्हीच पाहा गेल्या वर्षभरात तुम्ही कुठल्या ठिकाणांना भेट दिली ते..
आजकाल सगळ्यांकडं स्मार्टफोन्स आहेत. मग त्यात व्हॉटसऍप, फेसबुक, जीमेल हे पण असतंच. गुगल मॅप्समुळं कुणाला पत्ते आणि रस्ते विचारायची पण गरज राहिली नाही.
गुगल आणि फेसबुक त्यांच्या युझर्सची सगळी माहिती ठेवतात हे आपल्याला तसं माहित असतं. पण नक्की काय माहिती आणि ती किती दिवस ठेवली जाते हे नेमकं अजून आपल्यासारख्या युझर्सना माहिती नाहीय. अलिकडेच फेसबुकवर एक नवीन फीचर आलंय. आता त्याला फीचर म्हणायचं की भोचकपणा हा प्रश्नच आहे. कुठल्या हॉटेलात जेवायला, पेट्रोलपंपावर किंना आपलं गांव सोडून दुसर्या गावाला गेलं रे गेलं, की फेसबुकवर "तुम्ही अमक्या ठिकाणी आहा, इथं चेक-इन करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कळवा" असा संदेश लगेच झळकतो. गुगलने तर अशा ठिकाणांची आणखी माहिती इतरांना कळावी म्हणून भेट दिलेल्या नवीन ठिकाणाबद्दल लोकांना प्रश्नही विचारायला सुरूवात केलीय. मात्र हे गुगलचे प्रश्न आपल्याच हिताचे आहेत. कारण ते त्या ठिकाणी टॉयलेट आहे का, तिथं क्रेडिट/डेबिट कार्ड चालतं का, वाय-फाय आहे का, असलं तर ते फ्री आहे का? अशा गोष्टी विचारतात.
असो. आज आम्ही तुम्हांला सांगत आहोत की तुम्ही जिथं जिथं जाता, त्या ठिकाणांची माहिती गुगल मॅप्स ठेवत असतं. गंमत म्हणजे तुम्ही तुमची प्रायव्हसी सेटिंग्स कशीही ठेवलीत तरी गुगल ही माहिती जमा करतंच. खात्री करायची असेल, तर या कोणत्याही गुगल अकाऊंटमधून या लिंकवर क्लिक करा. फोनवरून हा लेख वाचत असाल, तर तुमचं गुगल अकाऊंट ऍक्टिव्ह असेलच. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून वाचत असाल, तर मात्र गुगलला लॉग-इन करावं लागेल. या लिंकवर तुम्हांला एक मॅप दिसेल, आणि जिथं-जिथं तुम्ही गेला आहात, त्या ठिकाणी दिसेल एक लाल ठिपका. तुमचं गांव मोठं असेल आणि तुम्ही गावातच बँकेत, मंदिरात आणि कुठं गेला असाल, तर त्याचेही वेगळे लाल ठिपके दिसतील. बर्याच लोकांचं म्हणणं आहे की ते वर्षभरापूर्वी एखाद्या गावाला गेले असतील, तर ते ही त्यांना या लिंकवर दिसलंय.
गुगल हे माहिती मिळवतच राहणार. पण त्यांना जास्त माहिती द्यायची नसेल, तर आपल्या गुगल मॅप्सच्या ऍपमध्ये लोकेशन हिस्टरी बंद ठेवण्याचा पर्याय निवडता येईल. पण त्यामुळं गुगलकडे सध्या असलेली माहिती नाहिशी होणार नाही, फक्त यापुढं त्यांना आपल्याबद्दल तुलनेनं कमी माहिती मिळेल.
पाहा मग, तुम्ही कोणत्या ठिकाणांना भेटी देऊन आलात ते. तेवढाच थोडा विरंगुळा.. नाही का?