आणखी एका ग्लोबल कंपनीचा भारतीय चेहेरा- Twitterचा नवा बॉस पराग अग्रवाल !
सिलिकॉन व्हॅली भारतीय चालवतात असे म्हटले जाते.सिलिकॉन व्हॅलीत सर्व मोठया कंपन्यांची हेडऑफिस आहेत.तिथे अनेक कंपन्यांमध्ये सर्वसाधारण कर्मचार्यापासून सीईओपर्यन्त भारतीय आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला हे दोन जगप्रसिद्ध भारतीय सीईओ आहेत. यात अजून एक नाव येऊ पाहत आहे.
जसे फेसबुक म्हटले की मार्क झुकरबर्ग आठवतो तसे ट्विटर म्हटले की जॅक डोर्सी आठवतो. हा भाऊ पहिल्या दिवसापासून ट्विटरच्या सीईओ पदावर मांड ठोकून आहे. तो सध्या ट्विटर आणि स्क्वेअर अशा दोन्ही कंपन्यांचा सीईओ आहे. स्वतः स्थापन केलेल्या कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा जॅक डोर्सीने दिला आहे. त्याच्या जागी एका भारतीय चेहऱ्याची निवड बोर्डने केली आहे.
पराग अग्रवाल ही भारतीय व्यक्ती आता ट्विटरचा सीईओ असणार आहे. स्वतः डोर्सीने आपल्या परागवर प्रचंड विश्वास असून गेल्या १० वर्षात या पदासाठी तोच लायक आहे हे त्याने सिद्ध केले आहे असे म्हटले आहे. परागने देखील या पदावर निवड झाल्यावर अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे.
पराग हा आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केले आहे आणि पुढे त्याने स्टॅनफर्ड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे. सुरुवातीला काही काळ त्याने याहू,मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांमध्ये काम केले. २०११ साली ट्विटर जॉईन करत एकाच कंपनीत तो गेली १० वर्ष टिकून राहिला. याचा फायदा त्याला झाला. याआधी २०१७ साली त्याची निवड ट्विटरमध्ये सिटीओ म्हणून झाली होती.
परागचे वय आता ३७ वर्ष आहे. इतक्या कमी वयात ट्विटरसारख्या प्रभावी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सर्वोच्च पदावर पोहोचणे ही निश्चितच मोठी गोष्ट आहे. परागच्या रूपाने भारताचा अजून एक चेहरा जागतिक कंपनी चालवताना दिसणार आहे.
उदय पाटील