जपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...
रोबॉट्समुळे माणसाचं बरचसं काम हलकं झालं. म्हणजे नेमकं काय झालं, तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हेच आपण ऐकत आलो आहोत, पण आज एक चांगली बातमी आली आहे. जपानची राजधानी टोक्यो मध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान एक प्रयोग केला जाणार आहे. या काळात वेटर म्हणून रोबोट्स काम करतील. आता रोबॉट्स कडून काम करून घेणं तसं फारसं जुनं नाही, पण खरी गोष्ट या मागे आहे. चला जाणून घेऊ या....
टोक्योतल्या कॅफे मध्ये रोबोट्स वेटर म्हणून काम करणार आहेत, तर त्यांना चालवण्याचं काम अर्धांगवायूचा झटका आलेले रुग्ण करणार आहेत. अशा प्रकारे पॅरलाईज व्यक्तींना नोकरी देण्याचा हा उपक्रम आहे.
Ory या रोबोटिक्स स्टार्टअप्सने यासाठी खास OriHime-D नावाचे रोबॉट्स तयार केले आहेत. या प्रकारातील रोबॉट्सचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना बसल्या जागेवरून नियंत्रित करता येतं. त्यांना कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्पीकर्स जोडलेले असतात. यामुळे बसल्या जागेवरून रोबॉटची हालचाल, त्यांचं नियंत्रण आणि ग्राहकांशी संवाद साधणे या गोष्टी करता येतात.
या प्रयोगात पॅरलाईज व्यक्तींच्या व्यतिरिक्त Amyotrophic Lateral Sclerosis (ALS – हाच आजार स्टीफन हॉकिंग यांना झाला होता) आणि पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या रुग्णांचा देखील समावेश असणार आहे. अशा रुग्णांना कोणतीही हालचाल न करता फक्त डोळ्यांच्या हालचालीने सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवता येतील. ग्राहकांशी संपर्क साधण्याचं म्हणाल तर त्यासाठी टेक्स्ट इंटरफेस बसवण्यात आले आहेत. याद्वारे डोळ्यांच्या हालचालींनीच आपल्याला काय म्हणायचं आहे ते लिहिता येईल. या टेक्स्टचं रुपांतर रोबॉट्स आवाजात करतील.
मंडळी, अशा प्रकारे त्या असंख्य लोकांना नोकऱ्या मिळू शकतात ज्यांना शारीरिक व्यंगामुळे नोकरी करता येत नाही.
आणखी वाचा :
जपानमध्ये रोबोट चालवत आहेत एक पूर्ण हॉटेल..
कार्यकर्ते मंडळी, तयारीला लागा... निर्माण होतोय जगातला पहिलावहिला रोबोट राजकारणी
एका देशाचं नागरिकत्व मिळवणारी पहिली रोबो, पण AI म्हणजे काय ? जाणून घ्या तिची पूर्ण कहाणी..