एकूण १०० बॉल्सची स्पर्धा, प्रत्येक ओव्हरमध्ये १० बॉल्स? क्रिकेटचा हा नवीन प्रकार तुम्हाला कसा वाटला?
भारतात आयपीएल हिट झाले आणि जगभर अशा स्पर्धा आपल्याकडे पण भरवल्या जाव्या म्हणून चढाओढ लागली. पण आयपीएल एवढी प्रसिध्दी काय या स्पर्धांना मिळाली नाही. गेल्या वर्षी इंग्लिश क्रिकेट बोर्डाने मात्र क्रिकेटचा पॅटर्न बदलणारी स्पर्धा आयोजित करण्याचा घाट घातला होता पण तो काय कोरोनाने यशस्वी होऊ दिला नाही.
द हंड्रेड म्हणून स्पर्धा इंग्लंडमध्ये भरवली जाणार होती. चालढकल करत शेवटी ही स्पर्धा या महिन्यात २१ जुलै पासून सुरु होत आहे. ही स्पर्धा क्रिकेटची असली तरी आजवर या प्रकारची स्पर्धा कधीही झालेली नाही. द हंड्रेड या नावातच स्पर्धेचे गुपित आहे. फक्त १०० बॉल्सचा सामना यात असेल. त्यातही ६ बॉल्सची ओव्हर न होता १० बॉल्सची ओव्हर असेल. म्हणजेच १० ओव्हर्समध्ये सामना खलास!!!
आयपीएलप्रमाणे इथे पण ८ संघ असतील. त्यात ओव्हल इन्व्हिंसिबल, वेल्स फायर, लंडन स्पिरीट, मँचेस्टर ओरिजिनल्स, लंडन, मँचेस्टर, नॉर्थर्न सुपरचार्जर्स, साऊथर्न ब्रेव, बर्मिंगहॅम फिनिक्स असे संघ असतील. या संघांमध्ये फक्त ३ खेळाडू बाहेरचे घेता येतील असा नियम असेल. १० बॉल्सची पूर्ण ओव्हर एक खेळाडू किंवा दोन खेळाडू मिळून ५-५ बॉल टाकू शकतील. त्यातही प्रत्येक १० बॉल्स नंतर बॉलिंग एन्ड बदलेल.
टी ट्वेन्टी सामन्यात एक बॉलर चार ओव्हर्स टाकू शकतो तसेच इथेही एक बॉलर फक्त २० बॉल्स टाकू शकतो. यात केलेला महत्वपूर्ण बदल म्हणजे टाइमआऊटवेळी प्रशिक्षक मैदानावर येऊन खेळाडूंशी चर्चा करू शकतात. यात १५-१५ खेळाडूंचा महिला आणि पुरुष असे दोन स्क्वॅड असतील. पहिला सामना लेडीज फर्स्ट या नियमाने मँचेस्टर ओरिजिनल्स आणि ओव्हल इन्व्हिंसिबल यांच्यात खेळला जाणार आहे. ही स्पर्धा २१ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार आहे.
भारतीय महिला संघातील स्मृती मंधाना साऊथर्न ब्रेव कडून, शेफाली वर्मा बर्मिंगहॅम फिनिक्स, तर हरमनप्रीत कौर मँचेस्टर ओरिजिनल्स कडून खेळणार आहे. पुरुष संघात स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अनेक खेळाडू मात्र बाहेर पडले आहेत. त्यात अरोन फिंच, केन विल्यम्सन, डेव्हिड वॉर्नर अशा दिग्गजांचा समावेश आहे.
क्रिकेटच्या इतर फॉरमॅटपेक्षा हा पुर्णपणे वेगळा असा हा खेळ होऊ शकतो. आधी ५ दिवसाचे सामने, मग एकदिवसीय सामने त्यानंतर २० ओव्हर्सवरून आता १०० बॉल्सवर क्रिकेट आले आहे. तुम्हाला या नव्या प्रकाराबद्दल काय वाटते हे आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये कळवा...