अर्जुन रणतुंगा नसता तर मुथय्या मुरलीधरन दिग्गज गोलंदाज होऊ शकला नसता!वाचा आजच्या दिवशी घडलेला रोमांचक किस्सा..
श्रीलंका संघाने आतापर्यंत केवळ १ वेळेस वनडे विश्वचषकावर नाव कोरले आहे. १९९६ मध्ये अर्जुन रणतुंगा यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघाने विश्वचषक जिंकला होता. श्रीलंका संघ सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ताकदवर असा संघ नव्हता. मात्र अर्जुन रणतुंगा यांनी संघाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर श्रीलंका संघाने आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली. एखाद्या खेळाडू कडून चांगली कामगिरी कशी करून घ्यायची हे अर्जुन रणतुंगा यांना चांगलेच माहीत होते. हेच कारण होते की, सर्वोत्तम कर्णधारांच्या यादीत अर्जुन रणतुंगा यांचा उल्लेख केला जायचा. आजच्याच दिवशी ते आपल्या युवा खेळाडूसाठी थेट अंपायर सोबत भिडले होते.
श्रीलंका संघ कार्लटन अँड युनायटेड मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. या मालिकेत इंग्लंड संघाने देखील सहभाग घेतला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये २३ जानेवारी रोजी सामना पार पडला होता. या सामन्यात पंचांनी मुथय्या मुरलीधरनसोबत असे काहीतरी केले होते, ज्यामुळे अर्जुन रणतुंगा यांनी थेट पंचांसोबत वाद घातला होता.
इंग्लंड संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी १५ षटकांचा सर्कल असायचा. सर्कल संपल्यानंतर अर्जुन रणतुंगाने आपल्या संघातील फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले. त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या १ गडी बाद ८६ होती. त्यानंतर १८ वे षटक टाकण्यासाठी जेव्हा मुथय्या मुरलीधरन गोलंदाजीला आला. त्यावेळी एक नवा वाद पेटला. षटकातील चौथा चेंडू टाकताच स्क्वेअर लेगला असलेल्या पंचांनी नो बॉलचा ईशारा केला. नो बॉल देण्याचे कारण होते, गोलंदाजी ॲक्शन. या चेंडूनंतर अर्जुन रणतुंगा यांनी अंपायरसोबत चर्चा केली. मात्र अंपायर काही माघार घ्यायला तयार नव्हते. अर्जुन रणतुंगा अंपायर सोबत बोट दाखवून चर्चा करत होते. मात्र काही तोडगा न निघाल्याने अर्जुन रणतुंगा आपल्या संघाला घेऊन मैदानाबाहेर गेले.
श्रीलंकेचे सर्व खेळाडू मैदानाच्या बाहेर जाऊन उभे होते. नंतर श्रीलंका संघाचे संघ व्यवस्थापक रणजित फर्नांडो मैदानावर आले आणि त्यांनी अंपायरसोबत चर्चा केली. तरीदेखील तोडगा न निघाल्याने शेवटी मॅच रेफ्रीला मध्यस्थी करावी लागली. अर्जुन रणतुंगाने मुथय्या मुरलीधरनला गोलंदाजी करण्यास सांगितले. मुरलीधरनने या सामन्यातील ७ षटकात ४६ धावा खर्च केल्या. मात्र त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता.
अंपायरने अवैध गोलंदाजी ॲक्शनचे आरोप केल्यानंतर, अर्जुन रणतुंगा यांनी विरोध केला होता. १९९५-९६ मध्ये बेंसन अँड हेजस मालिकेत देखील मुथय्या मुरलीधरनच्या गोलंदाजी ॲक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. वेस्ट इंडिज विरुध्द झालेल्या सामन्यात देखील मुथय्या मुरलीधरन गोलंदाजी करत असताना त्याचे चेंडू नो बॉल घोषित करण्यात आले होते. अंपायरचे असे म्हणणे होते की, ऑफ स्पिन बॉल टाकताना तो बॉल थ्रो करतो. त्यामुळे या सामन्यात मुथय्या मुरलीधरनला लेग स्पिन बॉलिंग करावी लागली होती.