क्रिकेटच्या इतिहासात थर्ड अंपायरचा पहिला बळी कोण होता? उत्तर तुम्हाला माहित असायलाच हवं...

मंडळी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसर्‍या पंचांची, म्हणजेच आपल्या थर्ड अम्पायरची भूमिका तशी फार महत्वाची. मैदानावरील दोन्ही पंच एखादा निर्णय देण्याबाबत संभ्रमावस्थेत असतात, त्यावेळी अंतिम आणि अचूक निर्णय देण्यासाठी थर्ड अम्पायरची मदत घेतली जाते. झेल, रनआऊट, स्टम्पींग, बाऊन्ड्रीज, अशा अनेक बाबतीत टिव्ही रिप्ले आणि अन्य तंत्रज्ञानाच्या मदतीने थर्ड अंपायर आपला अंतिम निर्णय देत असतो.

या थर्ड अम्पायर पध्दतीची संकल्पना मांडली होती माजी श्रीलंकन क्रिकेटर महिंदा विजेसिंघे यांनी... आणि ती अंमलात आणली गेली १४ नोव्हेंबर १९९२ मध्ये डर्बन (द. आफ्रिका) इथं खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात. यावेळी पहिल्यांदा थर्ड अम्पायर बनण्याचा मान मिळाला कार्ल लायबेन्बर्ग यांना. आणि या थर्ड अम्पायरकडून आऊट होणारा पहिला खेळाडू दूसरा तिसरा कोणी नसून तो चक्क आपला क्रिकेटचा देव : सचिन तेंडुलकर होता!!

सामन्याचा दुसरा दिवस. ११ धावांवर खेळणारा १९ वर्षांचा सचिन आणि जोडीला नॉन स्ट्राईकवर रवी शास्त्री. ब्रायन मॅकमिलान याने टाकलेला चेंडू पॉईन्टकडे फटकावून धाव घेण्यासाठी सचिनने क्रीझ सोडली खरी, पण रवी शास्त्रींनी सावधता बाळगत तात्काळ सचिनला परत पाठवलं. यादरम्यान क्षणाचाही विलंब न करता पॉईन्टवर तैनात असलेल्या चपळ क्षेत्ररक्षक जॉन्टी र्‍होड्सने बॉल स्टम्प्सच्या दिशेने थ्रो केला आणि विकेटकीपरने स्टम्पींग करत आपलं काम चोख बजावलं. सचिन क्रीझमध्ये पोहचायला किंचित कमी पडला. निर्णयाबाबत शंका असल्यानं मैदानावरील पंच सिरील मिश्ल्ये यांनी पहिल्यांदाच थर्ड अम्पायरकडे निर्णय मागितला आणि सचिन तेंडुलकर थर्ड अम्पायरकडून बाद दिला गेलेला पहिला खेळाडू ठरला !

 

तर मंडळी, निरनिराळ्या विक्रमांचे डोंगर ज्याने रचले तो आपला आपला विक्रमादित्य सचिन. त्याचं नाव अशाही प्रकारे इतिहासात नोंद आहे बरं का...

सबस्क्राईब करा

* indicates required