गुगलच्या डूडलवर असलेला हा महान क्रिकेटर कोण आहे माहित आहे का ??
गुगलने आज खास डूडलद्वारे एका महान क्रिकेटरला मानवंदना दिली आहे. या क्रिकेटरला नवी पिढी फारसं ओळखत नाही. ज्यावेळी क्रिकेटच्या जगतात भारत अगदी लहान देश होता त्याकाळात या क्रिकेटवीराने इतिहास रचला होता. मंडळी, विदेशात जाऊन द्विशतक ठोकणारे ते पहिले भारतीय क्रिकेटर होते. त्याचं नाव आहे ‘दिलीप सरदेसाई’.
आज दिलीप सरदेसाई यांचा ८७ वा (जन्म १९४०) वाढदिवस आहे. ते ३० टेस्ट सामने खेळले. त्यांची कारकीर्द फार मोठी नसली तरी त्यांनी आपल्या लहानशा कारकिर्दीत भारतीय संघाला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्यामुळे भारतीय टीमने विदेशात जाऊन सामने जिंकायला सुरुवात केली. वेस्ट इंडीजला पहिल्यांदा भारतीय टीमने धूळ चारली ती त्यांच्याच दमदार खेळीमुळे. हा सामना आजही अनेकांच्या आठवणीत आहे. वेस्ट इंडीज पाठोपाठ त्याकाळातील बलाढ्य अशा इंग्लंडला त्यांनी त्यांच्याच भूमीवर हरवलं होतं.
द्विशतकासोबत दिलीप सरदेसाई यांच्या नावावर ५ शतकं आणि ९ अर्धशतकं आहेत. त्यांच्या नावावर एका सिरीजमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा रेकॉर्ड सुद्धा होता. विजय मर्चंट यांनी त्यांना ‘द रेनासांस मॅन ऑफ इंडिया’ म्हटलं होतं. २ जुलै २००७ रोजी त्यांचं निधन झालं.
मंडळी, आज दिलीप सरदेसाई यांच्या घरातले जवळजवळ सगळेच महत्वाच्या पदावर आहेत. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला आपण सगळेच ओळखतो, प्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई. आज त्यांनी पत्रकारितेमध्ये नाव कमावलं आहे. तसेच दिलीप सरदेसाई यांच्या पत्नी नंदिनी सेन्सॉर बोर्डच्या सदस्य म्हणून काम करत आहेत.
मंडळी, अशा या महान खेळाडूला बोभाटातर्फे भावपूर्ण आदरांजली.