वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१: भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या लढ्यात कोणकोणते खेळाडू असणार आहेत?
उद्यापासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलँडमध्ये रंगणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान चालणाऱ्या या सामन्यात विजयी होणारा संघ हा कसोटी क्रिकेटचा बादशाह आहे हे सिद्ध होईल. गेले दोन वर्षे या क्षणासाठी सर्वच कसोटी संघांनी जोरदार प्रयत्न केले पण शेवटी भारत आणि न्यूझीलँड या दोघांनी फायनलमध्ये धडक दिली.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतर स्पर्धांसारखी नाही. १ ऑगस्ट २०१९ रोजी या स्पर्धेस सुरुवात झाली. या स्पर्धेत टॉप ९ संघ सहभागी झाले. या संघांना दोन वर्षात ६ कसोटी मालिका खेळायच्या होत्या. यापैकी तीन मालिका स्वतःच्या देशात तर तीन परदेशात अशा पद्धतीने या स्पर्धेची रचना करण्यात आली होती.
पण कोरोनाने जगभरच्या गोष्टी अस्ताव्यस्त केल्या. क्रिकेटही त्यापासून वाचू शकले नाही. गेल्या वर्षभरात अनेक मालिका आयोजित करता आलेल्या नाहीत. यामुळे या स्पर्धेचे नियम पाळून स्पर्धा पार पडणे शक्य नव्हते. अशावेळी आयसीसीने वेळेवर स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आपल्या नियमांमध्ये काही बदल केले. या काळात सामने जिंकल्याच्या टक्केवारीवरून दोन अंतिम संघांना निवडले गेले आहे.
भारत आणि न्यूझीलँड हे दोन्ही संघ यासाठी पात्र ठरले आहेत. उद्यापासून इंग्लंडमध्ये आपापले सर्वाधिक ताकदीचे खेळाडू घेऊन या संघांमध्ये 'काटे की टक्कर' दिसणार आहे. दोन्ही संघ आपल्या टीम 11 मध्ये कुणाला जागा देतात याचा खुलासा अजून झाला नसला, तरी कॅप्टन कोहली रिषभ पंत या सध्या फॉर्मात असलेल्या खेळाडूला संधी देण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा असे दिग्गज भारताकडे आहेत. तर बॉलिंगसाठी मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह हे फास्ट तर जडेजा आणि अश्विन या स्पिनर्सची फळी आहे.
तर दुसरीकडे न्यूझीलँडच्या संघात केन विल्यमसन हा विराटचा आयपीएलमधील सहकारी कॅप्टन असणार आहे. त्याच्या जोडीला टीम साऊथी, कोलीन डी ग्रँडहोम असे भरभक्कम खेळाडू आहेत. सामना जर ड्रॉ किंवा टाय झाला तर ही ट्रॉफी दोघांना देण्यात येईल. पण जर पाऊस झाला तर एक दिवस अधिक सामना खेळवला जाणार आहे. हा सामना कसोटी क्रिकेटमधील चॅम्पियन कोण हे ठरविणारा असल्याने कसोटीप्रेमींसाठी उद्यापासून सुरू होणारा सामना हा पर्वणी असणार आहे.