computer

भारताने वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या ५ रोमहर्षक मॅचेस...

जगभरातील क्रिकेटप्रेमी ज्या गोष्टीची तब्बल चार वर्षे वाट पाहत आहेत. ती वेळ आता आली आहे. नक्की कशाची म्हणून काय विचारता? मंडळी, क्रिकेटचा सर्वात मोठा सण म्हणजेच वर्ल्डकप सुरू झाला आहे.  क्षणक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या मॅचेस, रोमांचक लढती, छक्या चौक्यांची बरसात या सगळ्यांची बरसात म्हणजे वर्ल्डकप!! नव्या दम्याच्या नव्या प्लेयर्सना घेऊन सगळ्याच टीम्स जोरदार टक्कर देण्यासाठी तयार झाल्या आहेत. २०११च्या वर्ल्डकपचा विजेता संघ, आणि आजच्या काळातील सर्वात बलाढ्य संघ म्हणून आपण पण तयारीत आहोत. कोहलीसारखा कॅप्टन आणि धोनीसारखा प्लेयर असणाऱ्या टीमची धडकी इतरांना बसली नाही तर नवलच! मंडळी, आजवरच्या वर्ल्डकपच्या इतिहासात भारताने अनेक रोमहर्षक मॅचेस खेळल्या आहेत. त्यांची नुसती आठवण झाली तरी अंगावर काटा उभा राहतो. २००३ साली फायनलमध्ये पोचून हरल्याची जखम तर आजही ताजी वाटते. तर आज आपण भारताने वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या काही रोमहर्षक मॅचेसचा आढावा घेणार आहोत.

१९८३ - झिम्बाब्वेविरुद्ध हातातून गेलेली मॅच जिंकली.

१९८३ वर्ल्डकप भारतासाठी तसा धक्कादायकच होता. वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य टीम्सना हरवून कप आणणे सोपे नव्हते. उलट भारत झिम्बाब्वेसारख्या हलक्या टीमकडून हारणार होता. पण कपिलदेवच्या वादळी खेळीमुळे भारत जगज्जेता ठरला. मंडळी त्यादिवशी आपली परिस्थिती १७ रन्सवर ६ विकेट अशी केविलवाणी झाली होती. पण नंतर कपिल आला आणि त्याने झिम्बाब्वेच्या बॉलर्सची जबरदस्त धुलाई केली. त्याच्या १३८बॉल्स मधील १७४रन्समुळे आपण २६६पर्यन्त पोहोचलो. नंतर झिम्बाब्वेच्या बॅट्समनना परत आपल्या तुफान बॉलिंगने कपिल देव आणि मदन लालने रोखले आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवता आला.

१९८३ फायनलमधला रोमांचक विजय

मंडळी, झिम्बाब्वेला हरवल्यावर भारतीय प्लेयर्सचा आत्मविश्वास वाढला होता. पण खरी परीक्षा होती ती फायनलमध्ये, कारण फायनल होती दोन वेळचा विजेता असलेल्या वेस्टइंडिजसोबत. वेस्टइंडिजचे प्लेयर्स म्हणजे उभे-आडवे वाढलेले गडी, बॉल बॅटला लागला म्हणजे बाऊंड्री पार जायलाच पाहिजे अशी त्यांची पद्धत. आता अशा संघाला हरवणे म्हणजे किती कठीण असेल विचार करा मंडळी!!

वरून आपल्या टीमला त्यांनी १८३रन्समध्ये  गुंडाळले. आता मॅच हातातून गेली असे वाटत असताना मोहिंदर अमरनाथ आणि मदनलालने आपल्या बॉलिंगने इंडिजचे एकेक मोहरे पॅव्हेलीयनमध्ये पाठवले आणि जगज्जेता वेस्टइंडिजला नमवून भारताने जगभरात दबदबा निर्माण केला.

२००३ मध्ये पाकिस्तानला चौथ्यांदा नमवले.

२००३वर्ल्डकपमध्ये मोठ्या काळानंतर भारताच्या आशा जागृत झाल्या होत्या. आपला दादा म्हणजे सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजयरथ जोरदार सुरू होता. आणि आपल्याकडे तेव्हा सचिन, सेहवाग, द्रविड, लक्ष्मणसारखे एक से बढकर एक बॅट्समन होते. या तगड्या बॅटिंग लाईनच्या जोरावर आपण फायनलपर्यंत मुसंडी मारली.  पण आपल्या सारख्याच तगड्या ऑस्ट्रेलियाकडून आपल्याला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. त्याच्याआधी मात्र मंडळी ज्या मॅचकडे जगाचे लक्ष लागलेले असते, ती भारत आणि पाकिस्तान मॅच झाली. तोपर्यंत भारत-पाकिस्तानच्या तीन मॅचेस झाल्या होत्या आणि तीनही वेळा आपण पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले होते. यावेळी मागचा बदला घ्यायचाच म्हणून पाकिस्तान मैदानात उतरले. सईद अन्वरच्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर भारतापुढे २७३रन्सचे लक्ष ठेवले. पण पाकीस्तानचे नशीबच फुटके.  आपल्याविरुद्ध आले म्हणजे त्यांची हार ठरलेलीच असते. सचिनच्या शानदार ९८ रन्सच्या खेळीमुळे भारतीय संघाने चौथ्यांदा पाकिस्तानला धूळ चारली.

२०११मध्ये इंग्लंडविरुद्ध टाय झालेली मॅच

मंडळी,  ही मॅच भारताच्याच नाहीतर जगातल्या सर्वात रोमांचक मॅचपैकी एक असेल. पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या भारताने सचिनच्या १२०आणि युवराज सिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर तब्बल ३३८रन्सचा डोंगर उभा केला. एवढे मोठे लक्ष्य असल्यावर दुसरी टीम असती तर दबावामुळे हरली असती. पण उत्तर देण्यासाठी उतरलेल्या केविन पीटरसन आणि स्ट्रोस यांनी धुवांधार बॅटिंग करायला सुरुवात केली. एकवेळ तर अशी आली कि आता इंग्लंड मॅच जिंकेल की काय असे वाटायला लागले. शेवटच्या बॉलपर्यन्त उत्सुकता ताणली गेलेली ही मॅच शेवटी टाय झाली.

२०११च्या फायनलमधला विजय

२०११चा वर्ल्डकप जिंकायचाच या ध्येयाने भारतीय संघ उतरला होता. मंडळी, सचिनचा शेवटचा कप असल्याने तो सुद्धा जीवाचे रान करत होता. एकेक मॅच जिंकत भारत फायनलपर्यंत तर पोचला.  पण फायनलमध्ये श्रीलंकेने आपल्यापुढे तगडे आव्हान उभे केले. लंकेने ठेवलेल्या २७५रन्सचा पाठलाग करताना सुरुवातीलाच आपल्या महत्वाच्या विकेट्स पडल्या. सचिन, सेहवाग, कोहलीसारखे दिग्गज आऊट झाल्यावर देशभर चिंतेचे वातावरण होते. पण नंतर उतरलेल्या धोनीने श्रीलंकन बॉलर्सची मनसोक्त धुलाई करत भारताला जेतेपद मिळवून दिले.


 

मंडळी, वर्ल्डकपमधल्या या सोडून आणखी कोणत्या भारताच्या मॅचेस तुम्हांला रोमहर्षक वाटतात? कमेंटबॉक्समध्ये आम्हाला तुमच्या फेव्हरिट मॅचेसबद्दल आम्हांला नक्की कळवा. आणि वर्ल्डकपमधल्या भारताच्या छान आठवणी जागवण्यासाठी हा लेख तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेयर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required