नआरामदायी शूज, अपेंडीसायटीस, पाय मोडणं, पाय जाणं यातलं काहीच या खेळाडूला विश्वविक्रम करण्यापासून रोखू शकलं नाही!!
साहसे सुवर्ण प्रतिवसति...
इथिओपिया या देशाचे नाव कानावर पडले, की तुमच्या डोळ्यांसमोर काय येते? पूर्वीपासून आपल्या मनात असलेली एखाद्या गरीब आफ्रिकी देशाची प्रतिमा समोर येते, की जगातला सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेला आफ्रिकी देश? जागतिक आरोग्य संघटनेचे वादग्रस्त विद्यमान महासंचालक टेड्रॉस अधनोम घेब्रेयसस यांचा चेहरा दिसतो, की ते मध्यम उंचीचे आणि काटक शरीरयष्टीचे, न थकणारे धावपटूंचे पाय दिसतात?
तसेही आपण सगळेच कमीअधिक प्रमाणात ऱ्हस्व दृष्टीची शिकार झालेलो असतो. त्यामुळे इथिओपिया म्हणताच टेड्रॉस यांची आठवण येत असेल, तर त्यात दोष कसा मानायचा? परंतु, स्मरणशक्तीला थोडा ताण देऊन पाहा. आपण सगळेच काही खेळ आणि खेळाडूंचे चाहते नसलो, तरी प्रत्येक ऑलिम्पिक वर्षी ते आफ्रिकी देशांतील शिडशिडीत धावपटू जगाच्या अन्य भागांतील स्पर्धकांना सहज मागे टाकत लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यती जिंकल्याचे आपणही पाहिलेले असते. २०२०देखील असेच ऑलिम्पिकवर्ष होते. यंदाच्या या क्रीडा स्पर्धा टोकियोमध्ये होणार होत्या. कोरोनाच्या संकटाने त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
याच टोकियोने १९६४मध्येही ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन केले होते. तेव्हा अवघ्या जगाने एका आफ्रिकी धावपटूच्या विजिगिषू वृत्तीला सलाम केला होता. स्पर्धेला एक महिना बाकी असताना सरावादरम्यान अपेडिसायटिसच्या वेदनांनी विव्हळत जमिनीवर कोसळल्याने सलग दुसरे ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवणारा जगातील पहिलाच लांब पल्ल्याचा धावपटू होण्याचे त्याचे स्वप्न त्याच्यापासून दुरावले होते. परंतु आव्हान जेवढे कठीण, तेवढी ते पेलण्याची ईर्षाही तीव्र असेल तरच तुम्ही जगज्जेते होण्याच्या वाटेतील अडसर दूर होत जातात ना!
अबेबे बिकिला हे असेच जगज्जेते होते...
असामान्यत्व हे जन्माने नव्हे, कर्माने मिळते, याची खात्री पटवून घ्यायची असेल, तर अबेबे यांची जन्मकहाणी आवर्जून जाणून घ्यायला हवी. १९३२मध्ये एका मेंढपाळ कुटुंबात जन्मलेला हा मुलगा. गुरे राखत राखतच त्याचे शिक्षण झाले. इथिओपियाच्या सैन्यदलात भरती होण्याची मिळालेली संधी ही त्याला आयुष्याची वाट बदलण्याची मिळालेली पहिली संधी. सैन्यात असताना १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या आपल्या देशाच्या क्रीडापटूंचे संचलन पाहण्याची संधी त्याला मिळाली. त्यांच्या पाठीवर लिहिलेले देशाचे नाव त्याच्या मनावर कोरले गेले. त्याने राष्ट्रीय सैन्यदल स्पर्धांमध्ये भाग घेतला. स्वतःला आजमावण्याचा पहिलाच प्रयत्न. इथिओपियाचा ५००० आणि १०००० मीटर धावण्याच्या शर्यतीतील तेव्हाचा विजेता हाच ती स्पर्धा जिंकणार, हा सर्वांचाच होरा होता. परंतु तो आणि त्याचा राष्ट्रीय विक्रम यांना सहज मागे टाकत अबेबेने ती स्पर्धा जिंकली!
अबेबे बिकिला यांचा प्रवास आता १९६०च्या रोम ऑलिम्पिकच्या दिशेने सुरू झाला. परंतु ऑलिम्पिक व्यासपीठावरच्या या पहिल्याच प्रयत्नात एक मोठा अडसर आला. आदिदास ही स्पर्धेसाठी खेळाडूंच्या शूजची प्रायोजक कंपनी होती. त्यांचे शूज निवडण्यासाठी अबेबे पोचेपर्यंत त्यांच्या पायाच्या मापाचे काही मोजकेच शूज बाकी राहिले होते. त्यातीलच एक त्यांनी निवडला. परंतु त्याने धावणे त्यांना त्रासदायक वाटू लागले. या पठ्ठ्याने चक्क ते शूज आणि त्यांचा विचार फेकून दिला आणि मॅरेथॉन स्पर्धेत अनवाणी धाव घेतली. त्याही परिस्थितीत जागतिक विक्रमासह ती स्पर्धा जिंकली आणि इथिओपियाचे खेळाडू निर्धार आणि जिगर यांच्या जोरावर प्रतिकूलतेवरही मात करतात, हा संदेश जगाला दिला.
आता अबेबे यांच्याकडे हा पुढच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांचाही संभाव्य विजेता म्हणून गणला जाऊ लागला. लष्करात कर्नलच्या हुद्द्यावर त्यांना बढती मिळाली. परंतु देशातील लष्करी उठावात त्यांना गोवण्यात आले आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींची हत्या करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला. राजघराण्याच्या शरीररक्षकांच्या पथकात असलेले अबेबे यांनी त्याला नकार दिला. परंतु हा उठाव हाणून पाडला गेल्यानंतर त्यात सहभागी सर्वांच्या डोक्यावर फाशीची टांगती तलवार लटकू लागली. अबेबेप्रेमी जनतेने दबाव आणल्यामुळे अखेर राजाने त्यांना माफ केले.
फाशीचा दोर गळ्यातून असा काढला गेल्यावर अबेबे यांनी मोकळा श्वास घेतला नाही, तोच ऑलिम्पिकचा सराव करताना दुर्दैवाने अपेंडिसायटिसने त्यांना गाठले. टोकियोला जाण्याच्या आशांवर पाणी सोडावे, असेच डॉक्टरांनी त्यांना सांगितले. परंतु त्यांनी हार मानली नाही. शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयाच्या आवारातच सर्वांच्या नजरा चुकवून त्यांनी सराव सुरू केला. सहभागाची शक्यता धूसर असतानाही टोकियो गाठले. जपानी चाहत्यांच्या प्रोत्साहनापुढे त्यांना काही काळ जणू वेदनांचा विसर पडला. यावेळी ते शूज घालून मॅरेथॉन धावले आणि पुन्हा जागतिक विक्रमी वेळ नोंदवून थेट ऑलिम्पिकच्या इतिहास पुस्तकांमध्येच स्थानापन्न झाले.
यशाच्या शिखराकडे धाव घेताना त्यात अशक्यप्राय अडसर येणे आणि तरीही नाउमेद न होता पुन्हा शिखर गाठणे हे एव्हाना अबेबे यांच्याही अंगवळणी पडले आणि बहुधा त्यांची परीक्षा पाहणाऱ्या दैवाच्याही! त्यामुळेच, १९६८च्या मेक्सिको ऑलिम्पिकच्या आधीच्या वर्षी त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्यामुळे दोन शर्यतींतून त्यांना माघार घ्यावी लागली. पावलातील हाड मोडलेल्या स्थितीतही ते ऑलिम्पिकच्या शर्यतीत उतरले. परंतु दहाव्या मैलालाच वेदना असह्य होऊन थांबले...
ही त्यांच्या आयुष्यातील शेवटचीच मोठी मॅरेथॉन शर्यत! परंतु ती पायाची दुखापत हे त्यांच्या कारकिर्दीला खीळ बसण्याचे कारण ठरले नाही. त्याचे कारण होते, १९६९मध्ये त्यांना झालेल्या अपघाताचे. राजधानी अदिस अबाबामध्ये झालेल्या मोटार अपघातात त्यांच्या शरीराचा कमरेखालील संपूर्ण भाग पंगू झाला. ज्या धावण्याने आयुष्य उजळवले, त्यापासूनच कायमचे दुरावण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहिला नाही...
सामान्य माणूस हार मानतो, तेथून असामान्यांची धाव सुरू होते, असे म्हणतात. अबेबे यांच्या बाबतीत त्याचा प्रत्यय त्यांचे पाय धावायचे थांबल्यानंतरही येतो. किंबहुना, त्यानंतरच आणखी तीव्रतेने येतो... मोटार अपघातानंतर ते इंग्लंडमध्ये उपचारांसाठी दाखल झाले. परंतु पुन्हा पायांवर उभा राहू न शकता स्ट्रेचरवरूनच मायदेशी परतले. दुसरा कोणी सर्वसामान्य असता, तर उर्वरित आयुष्याचे काय करायचे, असा विचार त्याच्या मनात सुरू झाला असता.
अबेबे यांनी व्हीलचेअरवर बसून कोणत्या खेळात अव्वल होता येईल, याचा विचार सुरू केला! पॅरालिंपिक स्पर्धांना तेव्हा स्टोक मॅडेव्हाइल गेम्स म्हणत असत. इंग्लंडमध्ये उपचार सुरू असतानाच १९७०च्या त्या स्पर्धांत तिरंदाजी आणि टेबल टेनिस या प्रकारांत भाग घेऊन त्यांनी रंगीत तालीम करून पाहिली होतीच. १९७१मध्ये नॉर्वेत झालेल्या दिव्यांगांसाठीच्या स्पर्धेत त्यांनी स्लाय रायडिंग (बर्फावरील घसरगाडी) या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक पटकावून आणखी एक शिखर पादाक्रांत केले!
इथिओपियाच्या गळ्यातला ताईत झालेल्या अबेबे बिकिला या विश्वविजयी खेळाडूच्या गळ्यातील हे मात्र शेवटचे पदक. १९६९मध्ये झालेल्या अपघाताने त्यांच्या शरीरावर केलेल्या आघातांनी त्यानंतर पुन्हा उचल खाल्ली. तरीही, १९७२च्या म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धांना खास निमंत्रित म्हणून ते हजर राहिले. परंतु पुढच्याच वर्षी, १९७३मध्ये, वयाच्या अवघ्या एक्केचाळिसाव्या वर्षी मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला...
संकटाचे संधींत रूपांतर करणे हे येरागबाळ्याचे काम नसते. म्हणूनच दोन दशकांहूनही कमी काळ कारकीर्द लाभलेल्या आणि दर तीन-चार वर्षांनी असे संकटांचे डोंगर ओलांडून त्यापलीकडील शिखरे सर करणारे अबेबे बिकिला यांना त्यासाठीच सलाम.
....
http://aims-worldrunning.org/articles/655-abebe-bikila.html
अबेबे बिकिला यांनी रोम ऑलिम्पिक स्पर्धांत अनवाणी धावत जिंकलेले सुवर्णपदक :
अबेबे बिकिला यांच्या जीवनपटावर आधारित The Athlete हा चित्रपट २००९मध्ये प्रदर्शित झाला आहे. त्याचा ट्रेलर :
Imedge Media ही डॉक्युमेंटेशनच्या क्षेत्रात काम करणारी व्यावसायिक संस्था आहे.
अधिक माहितीसाठी https://www.facebook.com/Imedge-Media-248022901989999/