पी व्ही सिंधूने भारताला मिळवून दिले पहिले जागतिक अजिंक्यपद...वाचा तिच्या खडतर प्रवासाची कहाणी !!
असे म्हटले जाते की भारतात क्रिकेट शिवाय कुठल्याच खेळाला भारतीय प्रेक्षक दाद देत नाहीत. पण, जर कालच्या सोशल मीडियावर आलेल्या पोस्टचा महापूर बघितला तर आपल्या लक्षात येईल भारतीय प्रेक्षकही आता प्रत्येक खेळामध्ये रुची घेऊ लागलेला आहे. पी. व्ही. सिंधूने भारताला बँडमिंटनमध्ये पहिले जागतिक अजिंक्यपद मिळवून दिल्यानंतर प्रत्येक भारतीयाने तिचे अभिनंदन केले आहे. भारतीयांना अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे.
आजच्या लेखामध्ये आपण पी व्ही सिंधूच्या खडतर प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.
काल पी. व्ही. सिंधूने भारताला बॅडमिंटन स्पर्धेतील पहिलं विश्वविजेतेपद मिळवून दिले. सिंधू एका सामान्य कुटुंबामधून पुढे आलेली मुलगी आहे. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली ती गेली अनेक वर्ष बॅडमिंटनचे धडे गिरवत आहे. गेल्या तीन वर्षांपासून तिला यश हुलकावणी देत आहे. अनेक अडचणींवर मात करत आणि कठोर परिश्रम करत सिंधू आज विश्वविजेती ठरलेली आहे.
(नोझोमी ओकुहारा)
नोझोमी ओकुहारा सोबत झालेल्या या निर्णायक लढतीमध्ये सिंधू कायमच पुढे होती. तिने सुरुवातीपासूनच खेळावरती नियंत्रण मिळवले होते असे म्हणायला हरकत नाही. सिंधूने नोझोमिला 21-7, 21-7 अशा फरकाने धूळ चारली. या आधी सिंधूला नोझोमीकडून तीन वेळेस उपांत्य फेरीमध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे. सिंगापूर ऑस्ट्रेलियन ओपनच्या तीन उपांत्य सामन्यांमध्ये झालेला तिचा पराभव तिच्या चांगलाच जिव्हारी लागला होता आणि म्हणूनच काल सुरुवातीपासूनच तिने संपूर्ण सामन्यावरती आपले प्रभुत्व मिळवले होते.
तिच्या या मेहनतीमध्ये आणि यशामध्ये गोपीचंदचाही फार मोठा वाटा आहे. एकेकाळी "ऑल इंग्लंड " की स्पर्धा जिंकूनही दुर्लक्षित राहिलेल्या या खेळाडूने भारतात येऊन पराभव न पत्करता स्वतःची एक कोचिंग अकँडमी चालू केली. गोपीचंदने भारताला सायना नेहवालसारखे दिग्गज खेळाडू दिले. आपण जरी दुर्लक्षित राहिलो असलो तरी दुसरा कुठलाही बॅडमिंटन खेळाडू भारतामध्ये दुर्लक्षित राहू नये यासाठीच गोपीचंदने त्याची स्वतःची अकॅडमी चालू केली होती आणि आज त्याने केलेला संकल्प पूर्ण केलेला आहे.
(पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि गोपीचंद)
सिंधूचे घर गोपीचंदच्या बॅडमिंटन अकॅडमीपासून दूर होते. त्यानंतर तिला कॉलेजही करावे लागत असे. अशा वेळेस तिची दगदग होऊ नये म्हणून गोपीचंदने तिच्या पालकांना घरच अकॅडमीजवळ घेण्याचा सल्ला दिला आणि मुलीच्या भविष्यासाठी तिच्या पालकांनीही तो सल्ला तेवढ्याच नम्रपणे स्वीकारला. सिंधूच्या एवढ्या वर्षांच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे. संपूर्ण भारत आज तिचा गौरव करत आहे.
बोभाटा तर्फे पी व्ही सिंधूचे अभिनंदन. भविष्यातही तिने यशाची अनेक शिखरे चढावीत आणी भारताचे नाव उंचवावे हिच अपेक्षा.
लेखक : रोहित लांडगे