व्हिडीओ ऑफ दि डे: भारताच्या आर्म रेसलिंग चॅम्पियनने जगप्रसिद्ध बॉडीबिल्डरला धूळ चारली आहे...
भारताच्या आर्म रेसलिंग चॅम्पियन राहुल पॅनिकरने जगातल्या सर्वात मजबूत बॉडीबिल्डरचा पराभव केला आहे. आर्म रेसलिंग म्हणजे हातपंजा लढवणे. भारताच्या राहुल पॅनिकर हे नाव भलेही तुम्हाला आजपर्यंत माहीत नसेल, मात्र आता या नावाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची कामगिरी वाचून तुम्हीही त्याचे फॅन व्हाल हे नक्की. त्याचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
३१ वर्षीय राहुल हा भारताचा नॅशनल आर्म रेसलिंग चॅम्पियन आहे. त्याने दुबईमध्ये रंगलेल्या बॉडीबिल्डर लॅरी व्हील्ससोबत आर्म रेसलिंग मॅच खेळली. बॉडीबिल्डर लॅरी व्हील्स हा नंबर एक आर्म रेसलिंग चॅम्पियन आहे. त्याचा पराभव करत भारताच्या या चॅम्पियनने पदक जिंकले. या सामन्याचे फुटेज भारतीय आर्म रेसलिंग फेडरेशनने त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे. तेव्हापासून राहुलचे खूप कौतुक होत आहे.
कोचिमध्ये तो सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करतो. गेल्या १० वर्षात आर्म रेसलिंग मध्ये त्याने ६ पेक्षा जास्त राष्ट्रीय पदकं जिंकली आहेत. या जागतिक चॅम्पियन स्पर्धेतला अंतिम सामना राहुलसाठी सोपा नव्हता. लॅरीसोबत खेळताना राहुल पहिले दोन राउंड हरला होता. पण पुढील राउंडमध्ये राहुलने जोरदार पुनरागमन करून हा मुकाबला जिंकला. राहुलने ही कामगिरी करून सर्वानाच सुखद धक्का दिला आहे.
राहुलला रेसलिंगची आवड कॉलेजपासूनच होती. १२वी पासून तो जिल्हास्तरिय सामने खेळत आहे. याचे प्रोत्साहन त्याला घरातूनच मिळाले आहेत. त्याचे वडील पीटी पॅनिकर हे आयआरएस अधिकारी म्हणून रिटायर झाले. ते पॉवरलिफ्टरही होते. त्यांना 'पॉवर मॅन ऑफ इंडिया' हा खिताबही मिळाला होता. त्याचे काका उन्नीकृष्णन पॅनिकर हे सुद्धा वेटलिफ्टींग चॅम्पियन होते. ते नंतर भारतीय संघाचे कोचही झाले होते. त्याचे ४ भाऊही या क्षेत्रात आहेत.
आर्म रेसलिंगसाठी राहुल खूप मेहनत घेतो. आहार पाळण्याव्यतिरिक्त, राहुल आठवड्यातून तीनदा साडेतीन तासाच्या ट्रेनिंगमध्ये भाग घेतो, तसेच एडप्पल्ली येथील जिममध्येही खूप कसरत करावी लागते. WAF (World Arm Wrestling Federation) मध्ये गोल्ड मेडल जिंकणे हे त्याचे स्वप्न होते.
या विजयाने राहूलने भारताचे नाव आर्म रेसलिंगमध्ये जागतिक स्तरावर उंचावले आहे. अजूनही अनेक तरुण या क्षेत्राकडे वळतील व भारताला भविष्यात अनेक पदकं मिळवून देतील अशी आशा करायला हरकत नाही.
राहुल पॅनिकरला बोभाटातर्फे शुभेच्छा.
लेखिका: शीतल दरंदळे