पराभूत झालेल्या राजस्थानच्या टीममधला हा बॉलर भाव खाऊन जातोय...त्याचा संघर्ष एकदा वाचायलाच हवा !!
किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात काल झालेल्या तुफान चित्तथरारक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने बाजी मारली. आयपीएलचा थरार काय असतो हे कालच्या सामन्यात पुन्हा एकदा पाहायला मिळाले. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनच्या जोरदार शतकानंतर देखील राजस्थान सामना वाचवू शकला नाही.
राजस्थानने सामना गमावला असला तरी त्यांच्या एका बॉलरकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्थानचे सर्व बॉलर्स जेव्हा १० पेक्षा जास्त सरासरीने धावा देत होते. तेव्हा या एकट्या पठ्ठ्याने फक्त ७ च्या सरासरीने धावा देत ३ विकेट परत पाठवल्या. चेतन सकारिया असे त्या भावाचे नाव!!!
चेतनची गोष्ट वाचली तर तुमच्या अंगावर काटा उभा राहील्याशिवाय राहणार नाही. वर्षाच्या सुरुवातीला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत चेतन स्वताला सिद्ध करण्यासाठी झगडत होता. तर तिकडे घरी त्याच्या सख्या भावाने आत्महत्या केली. त्याच्यावर परिणाम नको व्हायला म्हणून ही गोष्ट पूर्ण सिरीज संपेपर्यंत त्याला माहित पडू दिली गेली नाही.
चेतन एवढे मोठे दुःख पचवून खेळत राहिला आणि मेहनतीला फळ मिळाले त्याला राजस्थानकडून विकत घेतले गेले. पहिल्याच सामन्यात एवढी चांगली बॉलिंग अनेकांना जमलेली नाही.
चेतनची गोष्ट सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी मुलांसारखी आहे. एका खेडेगावात सामान्य घरात शिकत असताना चांगले क्रिकेट खेळतो म्हणून भाव मिळत होता, एवढंच काय तो त्याचा प्लस पॉईंट. पण ना कुठले प्रशिक्षण ना कुठले क्रिकेटचे साहित्य! त्याला कित्येक दिवस तर आपण बॅटिंग पेक्षा बॉलिंग चांगली करू शकतो हेच माहीत नव्हते. पुढे प्रशिक्षण नसल्याने चुकीच्या पद्धतीने खेळून स्वताला जखमी करून घेतले. अशा पद्धतीने भावाला वर्षभर क्रिकेट सोडावे लागले.
वडील आजारी असल्याने त्यांचे काम बंद पडले. कमविण्याची जबाबदारी चेतनवर येऊन पडली. पण म्हणतात ना छातीत आग असेल तर सर्व शक्य आहे. भावाने काहीही झाले तरी क्रिकेट सोडले नाही. बूट घ्यायला पैसे नाहीत म्हणून विना बूट खेळला. त्याची परिस्थिती बघून एका खेळाडूने त्याला बूट घेऊन दिले. पठ्ठ्याने त्यालाच आऊट करून दाखवले.
अशा पद्धतीने चेतनला सौराष्ट्र संघात घेतले गेले. संधीचे सोने करत त्याने आयपीएलमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका खेडेगावातला मुलगा ज्याच्याकडे कुठलीही सुविधा नव्हती तो आता आयपीएल गाजवतोय यापेक्षा मोठी प्रेरणा काय असू शकते?