computer

जेव्हा मॅच हरल्यावर पाकिस्तानी कोचचा मृत्यू होतो....हा खून होता की नैसर्गिक मृत्यू ??

आजपासुन बारा वर्षापूर्वी म्हणजे २००७ साली वेस्ट इंडिज या कॅरेबियन देशात वर्ल्डकप आयोजित करण्यात आला होता. वेस्ट इंडिज म्हणजे एकेकाळची जगज्जेती टीम!! पहिले दोन्ही वर्ल्डकप यांनी जिंकले.  पण यांचा विजयरथ रोखला तो भारताने. मंडळी, आपल्या १९८३च्या विजयानंतर वेस्ट इंडिज आजपर्यंत वर्ल्डकप जिंकू शकलेली नाही. उंच तगडे खेळाडू ही त्यांची जमेची बाजू! पण चपळ आणि तरतरीत अशा भारतीय आणि आस्ट्रेलियन खेळाडूंपुढे त्यांचे जास्त काही चालले नाही.

यावेळी आपल्या स्वतःच्या देशात तरी जिंकू अशी त्यांना आशा होती. आपले गडी पण राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली लई उत्साहात गेले होते. पण ते आजवर कुठल्याच वर्ल्डकपमध्ये आपटले नसतील, एवढ्या जोरात मार खाऊन परत आले. मंडळी, चक्क बांगलादेशानेसुद्धा आपल्याला हरवले. याला काय अर्थ आहे का राव? पण जिथे भारत मार खातोय, तिथे पाकिस्तान कसा मागे राहील?  त्यांना तर चक्क आयर्लंडने हरवले!! यामुळे झाले काय, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही तगड्या टीम्स वर्ल्डकपच्या पहिल्याच राउंडमध्ये बाहेर फेकल्या गेल्या.  या दोन्ही टीम्स बाहेर पडल्याने क्रिकेट फॅन्सचा पुरता हिरमोड झाला. आता भारत-पाकिस्तान मॅच नाही तर वर्ल्डकप पाहून तरी काय करणार? 

आपली टीम तर मॅच हरून भारतात परतली.  पण पाकिस्तानच्या मागे लागलेली साडेसाती काय संपायचे नाव घेत नव्हती. आयर्लंडने हरवल्याच्या काही तासांतच पाकिस्तानचे कोच बॉब वुल्मर यांचा संशयास्पद मृत्यू झाला.  असं म्हणतात की पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर फेकल्याच्या  तणावात त्यांनी प्रचंड प्रमाणात दारू घेतली.  त्यानंतर ते त्यांच्या खोलीत बेशुद्धावस्थेत सापडले. तिथून त्यांना जमैकाच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.  तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मॅच हरल्यावर ते खुप टेन्शनमध्ये दिसत होते. बसमध्येही ते कुणाशी जास्त बोलले नाहीत. बस हॉटेलपर्यंत पोहोचल्यावरसुद्धा ते थेट आपल्या रूममध्ये गेले. लिफ्टमध्ये त्यांच्याबरोबर फक्त शोएब मलिक होता.  लिफ्ट थांबली तेव्हा ते शोएब मलिककडे बघून फक्त दोनच शब्द बोलले-'लेडीज फर्स्ट'.  आता तो जोक होता की दुसरे काही, हे आजवर समजलेले नाही. 

असा संशयास्पद मृत्यू होणे, तो पण पाकिस्तानच्या कोचचा.. घटना धक्कादायक होती. जगभरात या गोष्टीबद्दल उलट सुलट चर्चा रंगायला लागल्या. जमैका पोलीस प्रत्येक बाजूने त्यांच्या मृत्यूची चौकशी करत होती. तीन दिवस जास्त काही गदारोळ झाला नव्हता. पाकिस्तानने पण दुसऱ्या दिवशी आपली शेवटची मॅच जिंकून आपल्या कोचला श्रद्धांजली अर्पण केली. जेव्हा वुल्मर यांच्या मृत्यूच्या तीन दिवसानंतर पोलिसांनी सांगितले की त्यांना वुल्मर यांचा खून झाला असल्याचा संशय आहे, तेव्हा खरा दंगा चालू झाला. आता या प्रकरणाची गुंतागुंत वाढली होती. वर्ल्डकपसारख्या जगभरात एवढा मान असलेल्या स्पर्धेत अशा गोष्टीत घडायला लागल्या तर लोकांचा क्रिकेटवरील विश्वास उडेल अशा बातम्या यायला लागल्या.

काही पाकिस्तानी क्रिकेटर्सचीसुद्धा चौकशी करण्यात आली. त्यांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. पण परतताना एअरपोर्टवर  लोक त्यांना ओरडून ओरडून विचारत होते, "हा खून तुम्हीच केला का?". काहींचं असंही म्हणणं होतं की  पाकिस्तान टीमच्या बसमध्ये भांडण झाले होते, काही सांगत होते कि तिथल्या लोकल गुंडांनी त्यांची हत्या केली. सर्वात मोठी चर्चा ही होती की  पाकिस्तानी टीमच्या फिक्सिंगबद्दल वुल्मर बाहेर सांगणार होते म्हणून त्यांचे तोंड बंद करण्यात आले.

नंतर सखोल चौकशी केल्यावर मात्र पोलिसांनी वुल्मर यांचा मृत्यू ही नैसर्गिक घटना होती असे सांगून त्यांच्या मृत्यूची फाईल बंद केली.  वुल्मर हे त्या काळातले मोठे कोच मानले जात होते. क्रिकेटर म्हणूनसुद्धा त्यांनी खूप चांगली कामगिरी केली होती. पण त्यांच्या टीमच्या पराभवाच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. तरीसुद्धा या प्रकरणाबद्दल लोकांमध्ये आजही संशय आहे. पण श्रीदेवीच्या मृत्यूप्रमाणे वुल्मर यांच्या मरण्याआधी काय झाले हे आजपर्यंत कुणाला कळू शकलेले नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required