computer

NSG, BSF, कमांडो, नेव्हीसाठी तरुणांना प्रशिक्षण देणाऱ्या देशातल्या पहिल्या महिला कमांडो ट्रेनर डॉ. सीमा राव!!

सैन्य आणि महिला हे समीकरण अजूनही जगात हवे त्या प्रमाणात जुळून आलेले नाही. लष्कराशी संबंधित इतर अनेक क्षेत्र जसे हवाईदल या क्षेत्रांमध्ये महिला स्वत:ला सिध्द करत आहेत. पण थेट युद्धभूमीवर उतरणे हे महिलांसाठी पुरेसे शक्य झालेले नाही. मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल, पण किमान भारतात तरी पुरुष जवान जे युद्धभूमीवर शौर्य गाजवतात त्यांतल्या काहींना प्रशिक्षण देण्याचं काम एका महिलेने केलेले असते.

डॉ. सीमा राव हे नाव लष्कर आणि लष्करप्रेमी लोकांमध्ये आदराने घेतले जाते. सीमा राव या गेली २० वर्ष लष्करातील प्रमुख विभाग एनएसजी, बिएसएफ, गरुड कमांडो, पॅरा कमांडो, नेव्ही यासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षण देत आहेत. सीमा राव आणि त्यांचे पती दीपक राव कोणताही स्वार्थ मनात न ठेवता फक्त देशसेवेच्या हेतूने हे काम पार पडत आहेत.

सीमा यांना देशसेवा काय असते हे घरातच पुरेपूर समजले होते. कारण त्यांचे वडील रवीकांत सिनारी हे स्वातंत्र्यसैनिक होते. सीमा या खरंतर डॉक्टर आहेत. पण देशसेवा करण्याची इच्छा काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. देशात येणाऱ्या अनेक आपत्तींमध्ये काहीतरी काम करता यावे म्हणून त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विषय घेऊन एमबीए पूर्ण केले.

या काळात त्यांना एक तरूण भेटला. सीमा यांच्याप्रमाणेच देशप्रेमाने ओथंबून वाहणारा हा तरुण कुणालाही आकर्षित करेल असा होता. शरीराने दणकट, कुठलाही विषय असला तरी आत्मविश्वासाने व्यक्त होणारा, विशेष म्हणजे त्याचा मार्ग निश्चित होता. देशातील सर्वसामान्य तरुणांना लष्करी ट्रेनिंग देऊन त्यांना देशसेवेसाठी सज्ज करणे!!

सीमा आणि दीपक यांनी लग्न केले. दीपक यांनी सीमा यांना मार्शल आर्टपासून संपूर्ण ट्रेनिंग देऊन तयार केले. १९९६ साली या दाम्पत्याने आर्मी, नेव्ही, बीएसएफ, एनएसजी प्रमुखांकडे देशातील तरुणांना मोफत ट्रेनिंग देण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी देखील हा प्रस्ताव आनंदाने स्वीकार केला आणि अशा पद्धतीने हा प्रवास सुरु झाला. तेव्हापासून तर आजवर या दोघांनी मिळून जवळपास १५ हजार तरुणांना ट्रेनिंग दिलेली आहे.

सीमा यांनी अजून एक महत्वाचे अभियान सुरु केले आहे . DARE (Defence against Rape and Eve teasing) या अभियानाच्या माध्यमातून त्या महिलांना छेडखानीसारख्या घटनांना सामोरे जाताना स्वसंरक्षणाचे धडे देत असतात. या गोष्टी फक्त हिमनगाचे फक्त टोक वाटाव्या असे त्यांचे कर्तृत्व आहे. त्यांनी ब्रुसली यांनी तयार केलेला मार्शल आर्ट जीत कून डो चे प्रशिक्षण घेतले आहे.

मार्शल आर्ट मधील त्या ब्लॅक बेल्ट आहेत. सीमा कॉम्बॅट शूटिंग इंस्ट्रक्टर, फायर फायटर, स्कूबा डाइवर या सर्वांमधील मेडलीस्ट आहेत. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे त्या मिस इंडिया फायनलिस्ट आहेत. आता हि यादी इतकीच नाही. खरंतर ही यादीची सुरुवात म्हणता येईल. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. हाथापाई नावाचा एक सिनेमा पण त्यांनी तयार केला आहे. एवढे मोठे कर्तृत्व असूनही त्यांचा जमिनीवरील पाय कधीही हलला नाही.

सीमा आणि दीपक यांनी अजून एक धाडसी निर्णय लग्न झाल्यावर घेतला. तो म्हणजे मूल जन्माला न घालण्याचा. त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले. दत्तक घेतलेली ही मुलगी आज स्वतःच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा जगभर उमटवत आहे. डॉ. कोमल राव या त्यांच्या मुलीने एका मार्शल आर्ट स्पर्धेत पुरुष प्रतिद्वंदीला हरवून इतिहास घडवला. असे करणारी ती पहिला महिला ठरली आहे.

सीमा राव यांचा हा प्रवास मात्र किती खडतर असेल याचा अंदाज तुम्ही लावला असेल. अनेकवेळा अपघात, जखमी होणे असे प्रकार त्यांनी बघितले. जिद्द मात्र कधीच सोडली नाही. एकदा तर डोक्याला मार लागल्याने त्यांची पूर्ण मेमरी गेली होती. ६ महिने इलाज केल्यावर कुठे त्या ठीक झाल्या.

देशसेवा हे एकमेव ध्येय घेऊन प्रवास करणाऱ्या सीमा राव यांनी देशासाठी दिलेले योगदान खरोखर प्रचंड आहे. त्यांनी हजारो मुलींना आणि मुलांना आपण काहीतरी करून शकतो हा आशेचा किरण दिला आहे हेच त्यांचे खरे योगदान म्हणायला हवे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required