computer

भारतीय सिनेसृष्टीचे गिनिज बुकात आपोआप नकळत नोंदले गेलेले अनेक उच्चांक !

गिनिज बुकात उच्चांकाची नोंद व्हावी म्हणून लोक धडपडत असतात. पण काहीजणांची नोंद आपोआप होते. बॉलिवूडचे किंवा सिनेसृष्टीचे अनेक उच्चांक असेच नकळत नोंदले गेले आहेत. आज त्यांचाच एक धावता आढावा घेऊया.

१. ब्रह्मानंदम कन्नेगंटी 
हे प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन आहेत.  तशा यांनी तेलगू सिनेमात जास्त भूमिका केल्या आहेत, पण त्यांचा चेहरा आपल्याला अगदीच अनोळखी नाही. २०१५ मध्ये त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला ३० वर्षं झाली नसतील, पण तेव्हा त्यांनी काम केलेल्या भूमिकांची संख्या १००० झाली होती.  ब्रह्मानंदम यांच्या नावावर 'सर्वाधिक स्क्रीन क्रेडिट्स असलेला हयात अभिनेता' यासाठीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 

२. समीर अंजान

नाव समीर अंजान असले तरी आख्खं बॉलीवूड यांना गीतकार समीर एवढ्याच नावानेही ओळखतं. त्यांच्या गाजलेल्या गाण्यांची यादी देणं कठीण आहे. आशिकी, साजन, बेटा, क्रांतीवीर, लाडला, धडकन , रहना है तेरे दिलमें, राज, कभी खुशी कभी गम, धूम ३ ते अगदी दबंग-३ पर्यंत त्यांनी अनेक सिनेमांसाठी गाणी लिहिली आहेत. आणि ही फक्त नमुना यादी आहे बरं!!  १५ डिसेंबर २०१५ पर्यंत समीरनी ३,५२४  गाणी लिहिणारे  एकमेव बॉलीवूड गीतकार म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नोंदवले गेलेय. 

३. आशा भोसले

साथिया सिनेमातलं 'चोरी पे चोरी' गाणं ६९ वर्षांची बाई म्हणतेय हे सांगूनही पटणार नाही. ही जादू आहे सोनेरी गळ्याच्या गायिका असलेल्या आशा भोसलेंची!! त्यांच्या आवाजाला कोणत्या प्रकाराचं, वयाचं आणि भाषेचंही बंधन नाही. २०११ त्यांच्याही नावे एका रेकॉर्डची नोंद झालीय.   'संगीत इतिहासातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केलेला कलाकार' हा मानाचा शिरपेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांना स्थान देऊन गेला आहे. आशाताई सुमारे १९४३  पासून गाणी गात आहेत. २० पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये त्यांची गाणी रेकॉर्ड झाली आहेत. त्यांची  लोकप्रिय गाणी देण्याचा आम्ही गुन्हा करू शकत नाही, कुठलं द्यावं आणि कुठलं नको हे आम्ही ठरवण्यापेक्षा तुम्हीच आम्हांला या निमित्ताने तुमच्या आवडीची आशाताईंची गाणी अधिक चांगली सांगू शकाल. 

४. कुमार सानू- 

१९९०च्या दशकातला एक मुख्य आवाज म्हणजे कुमार सानू. त्या काळात गायक आणि हिरोंच्या जोड्याच असायच्या. शाहरुखसाठी अभिजीत, आमीरसाठी उदित नारायण, सलमानखानसाठी एस. पी. बालसुब्रमण्यम. पण कुमार सानूंवर असा कुणाचा शिक्का नव्हता. त्यामुळे ते बऱ्याच चेहऱ्यांसाठी पार्श्वगायन करायचे.  डीडीएलजेतलं  तुझे देखा तो ये जाना  सनम,  एक लडकी को देखा तो ऐसा लगा, दो दिल मिल रहे हैं अशी एक ना अनेक गाणी आपण आजही गुणगुणतो. तर या कुमार सानूंच्या नावे १९९३ मध्ये एका दिवसात जास्तीत जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. एकाच दिवसात २८ गाणी रेकॉर्ड करणारा हा अवलिया थोरच!!

५. कपूर कुटुंब

१९२९मध्ये पृथ्वीराज कपूर यांची ग्रँड एन्ट्री मोठ्या पडद्यावर झाली व त्यानंतर मात्र कपूर कुटुंबाने मागे वळून पहिले नाही. मुले-मुली, सुना, नातवंडे असे संपूर्ण खानदान बॉलीवूडमध्ये अजूनही पाय रोवून आहे.  कपूर कुटुंबातील असे चोवीस सदस्य सध्या चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. एकाच कुटुंबातल्या इतक्या लोकांनी हिंदी फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यामुळेच १९९९ पासून रेकॉर्ड बुकमध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची  नोंद झाली आहे.

६ बाहुबली: द बिगिनिंग

राजामौलीच्या बाहुबली: द बिगिनिंगने या सिनेमाने ५०,००० चौरस फूट पेक्षा जास्त मोठे पोस्टर बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. त्या पोस्टरचे क्षेत्रफळ ४७९३.६५ चौरस मीटर इतके आहे

७. जगदीश राज

 नुसतं नाव घेतलं तरी डोळ्यांसमोर पोलिस अधिकारी येतो.  या दिग्गज अभिनेत्याने १४४ सिनेमांमध्ये पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. त्याच्या काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये दीवार, डॉन, शक्ती आणि सिलसिला यांचा समावेश आहे.
सर्वाधिक टाइपकास्ट अभिनेता होण्याचा विश्वविक्रम जगदीश राज यांच्या नावे आहे. 

८. कहो ना प्यार है

हृतिक रोशनने कहो ना प्यार है सिनेमासोबत बॉलिवूडमध्ये सुपरहिट पदार्पण केलं!! एकदम ग्रँड एन्ट्रीच घेतली म्हणा ना!! या सिनेमाने थोडेथोडके नाही, तर एकाच वेळी ९२ पुरस्कार जिंकले. २००२ च्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एका चित्रपटासाठी सर्वाधिक पुरस्कार मिळवण्यासाठी म्हणून  त्याची नोंद झाली.
आहेत ना जागतिक विक्रमांच्या रंजक आणि सुरस कथा!!

९. यादें (१९६४)

१९६४ च्या यादें या चित्रपटात एकच कलाकार होता- सुनील दत्त. दिग्दर्शन आणि निर्मितीही सुनील दत्तचीच. नाही म्हणायला नर्गीसची सावली, फक्त सावली शेवटच्या प्रसंगात येते.  एकच कलाकार अभिनीत सिनेमा असल्या कारणाने 'यादे'ची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.  कथनात्मक चित्रपटातील सर्वात कमी कलाकारांचा पुरस्कार यादेंने  जिंकला.

१० ललिता पवार

सिने जगतातील अभिनेत्री म्हणून सर्वाधिक काळ  चित्रपट कारकीर्द करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ललिता पवार  यांच्या  नावावर आहे. ललिता पवार यांनी वयाच्या १२ व्या वर्षी सिने सृष्टीत पदार्पण केले आणि संपूर्ण हयात, म्हणजे ७० वर्षे अखंड अभिनय केला. त्यांनी ७००हून अधिक मराठी-हिन्दी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ६२० करोड रुपयांची कमाई केली होती.

 

सबस्क्राईब करा

* indicates required