क्या बोलते बंटाई?? बोभाटा घेऊन आलंय खऱ्याखुऱ्या गल्लीबॉइजना.. भेटा पहिल्या गलीबॉयला !!
क्या बोलते बंटाई?? काय मग, तुम्ही रणवीर सिंगच्या गल्ली बॉईज पिक्चरचं ट्रेलर पाह्यलं की नाही? त्यातल्या गाण्यात रणवीर सिंग स्वतःच रॅप करतोय आणि म्हणतोय की आपल्याला असली हिप-हॉपला भेटवणार आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत गाणं नसलं बघितलं तरी ते लगेच बघून घ्या. राव, गल्ली बॉईज सिनेमा मुंबईतल्या कुर्ला आणि जे बी नगर अंधेरी इथं राहणाऱ्या डिव्हाईन आणि नेझी या दोन रॅपरच्या आयुष्यावर बनवलाय. कोण आहेत हे डिव्हाईन आणि नेझी आणि काय आहे मुंबईतलं हे हिप-हॉप प्रकरण? जाणून घेऊया आपल्या नवीन सीरिजमध्ये- क्या बोलते बंटाई??
मुंबई ७०: कुर्ला वेस्ट
आपण पहिल्या भागात भेटणार आहोत मुंबई -७०, म्हणजेच कुर्ला वेस्टमध्ये राहणाऱ्या नावेद शेख उर्फ नेझीला. तर मंडळी, आपल्या मुंबईच्या अंडरग्राउंड हिप-हॉप विश्वात नेझीला बराच मान आहे. अर्थात त्याला कारणंही तशीच आहेत. नेझीची तुम्हाला दुसरी ओळख सांगायची तर त्यानं आपल्या एका गाण्यावर रणवीरसिंग, अक्षयकुमार, अमिताभ बच्चन आणि ह्रितिक रोशन या सगळ्यांना नाचवलंय. आईच्या गावात! हे आणि कुठलं गाणं हा प्रश्न पडला ना? बिर्जू नावाचं हे गाणं गणेश आचार्यच्या 'हे ब्रो' सिनेमात होतं. सिनेमा पडला, पण हे गाणं पार्ट्यांमध्ये बरंच चाललं होतं.
तर मंडळी, या आपल्या नेझीची कथा एकदम इंटरेस्टिंग आहे. कुर्ल्याचा वस्तीत राहत असल्यामुळं गल्लीतल्या पोरांच्या नादाला लागून नावेद भलत्याच मार्गावर चालला होता. क्रिकेट खेळण्यासाठी बॉल चोरणं, छोट्या-मोठ्या चोर्या करणं, मारामाऱ्या करणं हे असले सगळे उद्योग चालू होते. या उद्योगांमुळं त्याला एकदा जेलची हवापण खावी लागली. घरी आई एकटीच. बाबा कामानिमित्त दुबई. असं सगळं असताना मुलगा हातचा गेला असंच घरच्या सगळ्यांना वाटू लागलं. पण योगायोगानं खुद्द नावेदलाच आपण सुधारलो नाही तर आपलं काही खरं नाही हे पटलं. याचकाळात त्याच्या आयुष्यात हिप-हॉपनं प्रवेश केला.
नावेदचा नेझी झाला..
नावेद ते नेझी होण्याच्या त्याच्या प्रवासात त्याला हिप-हॉपची ओळख कशी झाली ही एक गंमतच आहे. एकदा गल्लीत डीजे चालू होता. तिथं त्यानं शॉन पॉलचं टेंपरेचर हे गाणं ऐकलं. त्याला हे गाणे भलतंच आवडलं. इतकं आवडलं की त्यानं गाण्याच्या बोलांची सरळ प्रिंटआऊट मारली आणि गाणं तोंडपाठ केलं. नेझी तेव्हा आठवीत होता. तो हे गाणं शाळेत मित्रांना गाऊन दाखवू लागला. आपल्याला लै भारी इंग्रजी गाता येतं आणि ते बघून पोरी इम्प्रेस होतात हे बघून नावेदचा हिप-हॉपमधला इंटरेस्ट भलताच वाढला. त्यानं मग दुसऱ्या इंग्लिश आर्टिस्टची गाणी ऐकायला आणि ती गाऊन शाळेत शाईन मारायला सुरवात केली. पण मग त्याला जाणवलं की दुसऱ्यांची गाणी किती दिवस गाणार? स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर आपल्या भाषेतच करावं लागेल.
रॅप करत असताना त्यानं स्वतःचं स्टेजनेम ठरवलं- नेझी!! का? कारण नावेद इज क्रेझी!! त्याच्या पहिल्या गाण्याची कथा पण सॉलीड आहे. गाणं तयार करायचं तर त्याच्याकडं त्यासाठीची साधनं काहीच नव्हती. असं असताना या नेझीभौंना गाणं तयार करायचं होतं. त्यानं एका रात्री आपल्या गाण्याच्या काही गोळी लिहून काढल्या. आता गाणं तर रेकॉर्ड करायचं होतं पण स्टुडिओ काय-कसा-कुठे-भाडं किती अशी काहीच आयडिया नव्हती. त्याचे बाबा दुबईत होते, म्हणून त्यांनी स्काईप कॉल करण्यासाठी एक आयपॅड त्याला दिला होता. त्याच आयपॅडवर त्यानं गॅरेज बँड हे सॉफ्टवेअर वापरलं आणि आयुष्यातलं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. जन्मानं मुंबईकरच तो. त्यामुळं गाण्याचा कुठे व्हिडिओ बनवता येईल याचा अंदाज होता. मग तोच आयपॅड घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन गाण्याचा व्हिडीओ पण बनवून टाकला. व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड झाला आणि एका रात्रीत नेझीला प्रसिद्धी मिळाली.
हे पाहा त्याचं पहिलं गाणं...
त्यानंतर नेझीनं जे बी नगरमध्ये राहणाऱ्या डिवाईनसोबत मिळून एक गाणं केलं. त्या गाण्याचं नाव होतं 'मेरी गली में'. या गाणं आणि डिवाईनबद्दल आपण पुढल्या भागात बोलूच. तर, नेझीचा प्रवास पुढे चालूच राहिला. ओ. एम. एल. या मॅनेजमेंट कंपनीनं नेझीसोबत करार केला आणि त्यानंतर नेझी एक एक हिट गाणे देत गेला.
पण तुम्हांला काय वाटतं, त्याचं हे काम त्याच्या घरच्यांना आवडत असेल का हो? नाही हो.. बिचाऱ्या नेझीचे घरचेपण तुमच्या-आमच्या घरच्यांसारखेच आहेत. त्यांना नेझीने हिप-हॉप केलेलं आवडत नाही. त्यांचं म्हणणं आहे की हे आपलं कल्चर नाही. हा काहीतरी भलतंच करतोय असं त्यांना वाटतं. पण नावेद याबाबतीत एकदम क्लिअर आहे. त्याला आपल्या गाण्यातून आपल्या आजूबाजूच्या तरुणांना एक संदेश द्यायचा आहे. मुंबई ७० मधले लोक त्याच्यापासून प्रेरणा घेत नाहीत आणि नुसतेच प्रभावित होत आहेत याचं त्याला दुःख आहे. आपल्या गाण्यातून एक चांगला संदेश देऊन लोकांना काहीतरी चांगलं करायला लावायचा त्याचा विचार आहे.
आपल्या दमदार शब्दांसाठी ओळखला जाणारा असा हा नेझी गल्ली बॉयच्या टीममध्ये आहे. गेल्या वर्षभरात नेझीनं एकही नवीन गाणं दिलं नाहीय. ही खरं तर चिंताजनक बाब आहे. पण गल्ली बॉयचं ट्रेलर आल्यानंतर त्यानं लगेच फेसबुकवर पोस्ट टाकून आपण परत येतोय हे सांगितलंय. आता आम्ही तुमची नेझीसोबत ओळख करुन दिलीच आहे तर सोबत त्याची काही गाणी तुम्हीपण नक्की ऐका.
'कसं काय बंटाई??'च्या पुढल्या भागात मुंबई अंडरग्राउंडच्या अजून एका ताऱ्याची ओळख करून घेऊ.. तोवर बाय-बाय.