computer

एका प्लास्टिकच्या ट्यूब मधून जन्माला आलेले मनोरंजनाचे विश्व – झी एन्टरटेनमेंट.

तुम्हाला आठवत असेल तर एकेकाळी टूथपेस्ट, दाढीचं, क्रीम, औषधी मलम, अल्युमिनियमच्या ट्यूब मधून यायचे. शास्त्रीय परिभाषेत अशा प्रकारच्या पॅकेजिंग ‘मेटॅलिक कॉलाप्सिबल ट्यूब’ म्हणायचे. या ट्यूब अल्युमिनियमच्या पातळ पत्र्यापासून बनवलेल्या असायच्या. हळूहळू अल्युमिनियमचे भाव वाढल्यानंतर हे ट्यूब खर्चिक होत गेले. दुसऱ्या बाजूस प्लास्टिक तंत्रज्ञान विकसित होत होते. थोड्याच दिवसात या मेटॅलिक कॉलाप्सिबल ट्यूबची जागा प्लास्टिक कॉलाप्सिबल ट्यूबने घेतली. ही क्रांतिकारी पॅकेजिंगची कल्पना भारतात आणली एस्सेल पॅकेजिंग या कंपनीने. या उत्पादनाला इतकी प्रचंड मागणी होती की एस्सेल पॅकेजिंगचा नफा धबधब्यसारखा वाढला. हा नफा गुंतवण्यासाठी दुसरी एक कंपनी अस्तित्वात आली ती म्हणजे ‘एस्सेल एन्टरटेनमेंट’ आणि जन्माला आलं ‘एस्सेल वर्ल्ड’. पुढच्या काही वर्षात एस्सेल पॅकेजिंग प्रोपॅक्ट नावाच्या कंपनीत विलीन झाली. इथे प्लास्टिक ट्यूबचा पहिला अध्याय संपला आणि एका नव्या कंपनीचा जन्म झाला जी कंपनी आज मनोरंजनाच्या क्षेत्रात अव्वल क्रमांकावर आहे. असा जन्म झाला ‘झी एन्टरटेनमेंट’चा.

या नव्या प्लास्टिक कॉलाप्सिबल ट्यूबचे जनक होते ‘डॉ. सुभाषचंद्र गोयल’ (सुभाष चंद्र). म्हणजेच ‘झी’चे सर्वेसर्वा. सुभाष चंद्र यांचे व्यावसायिक आयुष्य म्हणजे एका पाठोपाठ येणाऱ्या समस्या आणि त्यातून उलगडत जाणारे नवनवीन प्रकल्प. अडचण हीच संधी असं समजणाऱ्या सुभाषचंद्राच्या अनेक व्यापारी क्लृप्त्या नक्कीच वाचण्यासारख्या आहेत.

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी सुभाष चंद्रांना शाळा सोडून कौटुंबिक व्यवसायात लक्ष घालावं लागलं. त्यांच्या आजोबांनी सुरु केलेला जिनिंग, डाळी, तेलबिया यांचा व्यापार बुडाला होता. घरात अन्नाचीही चणचण होती. इंजिनियर व्हायला निघालेले सुभाष चंद्र शिक्षण सोडून चार पैसे कमवायला बाहेर पडले. या दरम्यान सुभाष चंद्र यांची गाठ फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (FCI) एका व्यवस्थापकाशी पडली. कडधान्यापासून डाळ बनवून पॉलिश करून डाळ FCI ला परत करण्याचे पहिले कंत्राट या व्यवस्थापकांनी त्यांना दिले. इथून १९७६ पर्यंत FCI च्या अनेक समस्यांची पूर्ती सुभाष चंद्रांनी केली. उदाहरणार्थ १९७६ साली FCI कडे १४ लाख टन धान्य जमा झाले होते. हे धान्य साठवण्याची पुरेशी व्यवस्था FCI कडे नव्हती. अशावेळी गोदामापेक्षा प्लास्टिकचे तंबू उभे करून त्याखाली धान्य साठवण्याची कल्पना सुभाष चंद्र यांची. कल्पना अर्थातच त्यांची असल्यामुळे कंत्राटही त्यांना मिळाले. या नंतर सोवियेत रशियाला डाळी पुरवण्याचे काम FCI मार्फत सुभाष चंद्र यांनी घेतले. पण रशियाला फक्त डाळी पाठवण्याऐवजी सोबत सोयाबीन देखील पाठवण्याची कल्पना सुभाष चंद्र यांचीच. यामुळे मूळ कंत्राटाच्या अनेक पट मागणी वाढली. याचा फायदा FCI ला आणि अर्थातच सुभाष चंद्र यांना झाला.

या दरम्यान सुभाष चंद्र यांची घरची परिस्थिती तर सुधारलीच आणि हातात ९५ कोटी रुपयाचा नफा पण शिल्लक राहिला. आता समस्या होती की ९५ कोटी रुपयाचं करायचं काय.

या काळात टूथपेस्टची ट्यूब ही अॅल्युमिनियम पासून बनवली जायची. आजच्या प्रमाणे प्लास्टिकची कॉलाप्सिबल ट्यूब त्यावेळी अजून यायची होती. हळूहळू अॅल्युमिनियमचे भाव वाढल्याने ही ट्यूब खर्चिक होती गेली. काळाची पावले ओळखून सुभाष चंद्र यांनी १९८२ साली कॉलाप्सिबल प्लास्टिक ट्यूब तयार करण्याचं तंत्रज्ञान जर्मनीहून भारतात आणलं. बऱ्याच जाणत्या व्यक्तींनी सुभाश चंद्र यांच्या या निर्णयाला नापसंती दर्शवली. भारत अजून या तंत्रज्ञानासाठी तयार नाही असं त्यांचं मत होतं. सुभाष चंद्र यांनी मात्र ऐकलं जनाचं आणि केलं मनाचं. आज ‘एस्सेल पॅकेजिंग प्रोपॅक्ट’ ही कंपनी ट्यूब तयार करणारी एक प्रमुख कंपनी म्हणून ओळखली जाते.

तर, पुन्हा एकदा अतिरिक्त नफा जमा झाला. काय करायचं आता ? आता सुभाष चंद्र यांनी एका नव्या क्षेत्रात पैसा गुंतवला. हे क्षेत्र होतं मनोरंजनाचं. आता पर्यंत सिनेमा नाटकाव्यतिरिक्त मनोरंजन हा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय होऊ शकतो याची कल्पना भारतात कोणाच्याच डोक्यात नव्हती. दूरदर्शन घराघरात पोहोचले होते पण २४ तास मनोरंजन करणारी खाजगी वाहिनी भारतात सुरु करण्याची कल्पना फक्त सुभाष चंद्रांच्या डोक्यात होती. मुंबई जवळच्या एका ओसाड बेटावर उभे राहिले एस्सेल वर्ल्ड !! तो पर्यंत अम्युझमेंट पार्क हा विषय देखील भारतात नवीन होता. आठवतेय का तुम्हाला ती जाहिरात ‘एस्सेल वर्ल्ड में जाउंगा मै.’ ??

एस्सेल वर्ल्ड इतका झी चा जन्म सोप्पा नव्हता. त्याची गोष्ट फारच मनोरंजक आहे.

तो काळ दूरदर्शनने व्यापलेला होता आणि कायदा कोणत्याही खाजगी वाहिनीला मान्यता देत नव्हता. या उलट CNN आणि BBC सारख्या परदेशी कंपन्यांना भारतात प्रसारणाची मुभा होती. या अजब कायद्याने सुभाष चंद्रांनी झी चं स्वप्न सोडून दिलं नाही. या मध्ये अडचण होती खाजगी वाहिनी भारतात कायदेशीर उभी राहू शकत नव्हती पण परदेशातून भारतीय सिनेमा किंवा मनोरंजनाचे इतर कार्यक्रम दाखवण्यास आक्षेप नव्हता. दुसरी समस्या अशी होती की प्रसारणासाठी “ट्रान्सपाँडर”ची गरज होती. पण हे ट्रान्सपाँडर परदेशी कंपन्यांच्या मालकीचे होते. आता प्लान पक्का झाला. ‘कंटेंट’ भारतात बनवायचा आणि प्रसारण परदेशातून करायचं.

सुभाष चंद्र यांनी हॉंगकॉंगच्या AsiaSat या प्रसारण कंपनीशी संपर्क साधला. त्यांची अशी कल्पना होती की भारतातून AsiaSat ला कंटेंट पाठवला जाईल आणि AsiaSat तोच कंटेंट भारतात प्रसारित करेल. पण हे ही एवढं सोप्पं नव्हतं.  

AsiaSat च्या अधिकाऱ्यांशी पैशांसबंधी सगळी बोलणी झाली. आता फक्त AsiaSat चे CEO ‘ली किंग शिंग’ यांच्या परवानगीची गरज होती. सुभाष चंद्र ली का शिंग यांच्या भेटीसाठी ताटकळत उभे होते. काही तासांनी ली का शिंग यांनी भेटीची वेळ दिली, पण नकार देण्यासाठी.

ली का शिंग यांनी सुभाष चंद्र यांना ऐकवलं ‘भारतात पैसा नाही, मला भारतात रस नाही’.

(ली का शिंग)

प्रसारणाची त्याकाळातली फी होती १.५ मिलियन डॉलर्स, पण सुभाष चंद्र यांनी त्यांना ५ मिलियन डॉलर्स देऊ केले. हा आकडा पाहूनही ली का शिंग यांनी फारसं मनावर घेतलं नाही. पण तो चीनी माणूस अखेर विरघळलाच. यानंतर सुभाष चंद्र यांनी त्यांना आपल्या एस्सेल वर्ल्ड आणि आपल्या कारखान्यांची एक सफर घडवून आणली. या सफारीने ली का शिंग हे इतके खुश झाले की त्यांनी हा सौदा मंजूर केला.

हे यश मिळे पर्यंत सुभाष चंद्र यांना मिडिया व्यवसायातील काहीच माहिती नव्हती. पण त्यांचा आत्मविश्वास यावेळी कामी आला.

 

ऑक्टोबर २, १९९२ सालापासून मुंबईची झी टेलिफिल्म्स लिमिटेड झी टीव्ही हॉंगकॉंगला कंटेंट पुरवू लागली. हा टीव्हीचा नवीन मसाला त्याकाळी केवळ २ तासांसाठी दाखवला जायचा. पण काही दिवसातच झी ने दूरदर्शनला टक्कर द्यायला सुरुवात केली. ६ महिन्याच्या आत झी ची प्रेक्षक संख्या १.२ कोटी झाली. हा आकडा वाढल्या नंतर झी २ तास प्रसारित न होता २४ तास प्रसारित होऊ लागलं.
 

(रुपर्ड मुर्डोक)

हा आनंद फार काळ टिकला नाही. प्रसारण वाहिनीतील ‘भाई’ स्टारवाले रुपर्ड मुर्डोक यांनी AsiaSat विकत घेतली. सुभाष चंद्र यांचा हिस्सा ‘अल्पसंख्यांक गुंतवणूकदार’ झाला. ही वेळ होती एक बुद्धिबळाची चाल खेळण्याची. सुभाष चंद्र दोन पाऊलं मागे आले. त्यांनी त्यांचा हिस्सा रुपर्ड मुर्डोक यांना विकून टाकला. महत्वाची अट अशी होती की स्टार फक्त इंग्रजी कंटेंट भारतात प्रसारित करेल. इंग्रजी व्यतिरिक्त कंटेंट फक्त झी प्रसारित करेल. स्टारला ही अट काही दिवसातच अडचणीची वाटू लागली. करार मोडून त्यांनी प्रादेशिक भाषेत पाऊल टाकले.

त्यांच्याच भाषेत सांगायचं तर “त्यांना वाटलं होतं की आपण मोठे भाई आहोत आणि आपण करू तसंच झी ला मान्य करावं लागेल. पण कराराचा भंग त्यांनी केला होता. आम्ही सत्याच्या मार्गावर होतो.”.

रुपर्ड मुर्डोक यांनी झी च्या त्यावेळेच्या मूल्यांकनाच्या चौपट किमतीत झी विकत घेण्याचा प्रस्ताव अनेकदा मांडला. पण सुभाष चंद्र यांनी रुपर्ड मुर्डोक यांचाच हिस्सा विकत घेऊन त्यांची बोळवण केली. आता AsiaSat ची शंभर टक्के मालकी झी कडे आली. सोबत मिळाले १६७ देशात प्रसारणाचे हक्क आणि ५० कोटी प्रेक्षकवर्ग.

सध्या परिस्थिती काय आहे ?

गेले काही दिवस झी चा काही हिस्सा विकण्याचा सुभाष चंद्र यांचा प्रयत्न आहे. अशा बातम्या मिडिया मध्ये येत आहेत. याला कारण आहे काही इन्फ्रा कंपन्यांमध्ये झी ने केलेली गुंतवणूक डोईजड झाली आहे. जवळजवळ १६,००० कोटी रुपयांची तरतूद झी ला करावी लागणार आहे. याखेरीज झीच्या सुरुवातीच्या दिवसात एकत्र असलेली सुभाष चंद्र यांचा परिवार आता विभक्त झाला आहे. आता पर्यंत ज्यांनी सुभाष चंद्र यांचा प्रवास बघितला आहे त्यांना खात्री आहे की या संकटातून झी बाहेर पडेल.

नुकतीच तेलंगणात इलेक्ट्रिक कार्सना लागणाऱ्या लिथियम बॅटरीजच्या प्रकल्पाची पायाभरणी ही सुभाष चंद्र यांच्या नव्या विचाराची चुणूक दाखवते आहे. तुम्हाला काय वाटतं ?

सबस्क्राईब करा

* indicates required