दिवाळीत कोणते सिनेमे रिलीज होत आहेत? यातला तुम्ही कोणता पाहणार आहात?
दिवाळी जवळ आली आहे. सणासुदीचे आगमन होताच आनंदाचे, उत्साहाचे वातावरण सगळीकडे असते. दरवर्षी सुट्या, ईद, दिवाळी अशा मुहूर्तांवर बॉलीवूडचे अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. मात्र कोरोनामुळे गेल्या एक वर्षापासून चित्रपटगृहे बंद होती. अशा परिस्थितीत चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित झाले. मात्र आता सिनेमागृहे सुरू झाली असून त्यांच्या लाडक्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी, थेटरात जाण्यासाठी आणि तिथे पॉपकॉर्न खात सिनेमे पाहण्यासाठी रसिकप्रेक्षक उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या चित्रपटांची यादी देत आहोत जे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत. तुम्ही याचा आनंद विविध प्लॅटफॉर्मवर घेऊ शकता.
सूर्यवंशी
सिंघम आणि सिंबानंतर रोहित शेट्टीच्या कॉप फ्रँचायझीमधला हा चौथा चित्रपटयेतेओय. सूर्यवंशी हा रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रिलायन्स एंटरटेनमेंट, रोहित शेट्टी पिक्चर्स, धर्मा प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स निर्मित एक ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोव्हर, अभिमन्यू सिंग, निहारिका रायजादा, विवान भटेना, सिकंदर खेर, निकितिन धीर आणि जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय कुमार हा डीसीपी वीर सूर्यवंशी, दहशतवाद विरोधी पथकाचा प्रमुख अशी भूमिका करतोय. त्याच्यासोबत कतरिना कैफ हीसुद्धा चित्रपटात अॅक्शन करताना दिसणार आहेत. अजय देवगण आणि रणवीर सिंग शेट्टीच्या मागील चित्रपटांमधील सिंघम आणि सिम्बाच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहेत. सिम्बा चित्रपटाच्या शेवटी कुमारच्या पात्राची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट 5 नोव्हेंबर 2021 चित्रपटगृहात रिलीज होतोय. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते.
'नो मीन्स नो'
'नो मीन्स नो' हा बहुप्रतिक्षित इंडो-पोलिश चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण इंग्रजी, हिंदी आणि पोलिश अशा तीन भाषांमध्ये झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती G7 फिल्म्स पोलंडने केली आहे आणि दिग्दर्शन विकास वर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात ध्रुव वर्मा, गुलशन ग्रोवर, शरद कपूर आणि अण्णा गुजिक यांच्या भूमिका आहेत. पोलंडमधील स्की चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणाऱ्या एका भारतीय स्की चॅम्पियनची ही कथा आहे. तिथे तो एका पोलिश सौंदर्याच्या प्रेमात पडतो. चित्रपटाचे पार्श्वसंगीत हरिहरन आणि अक्षय हरिहरन यांनी दिले आहे. चित्रपटाचे गायक करण हरिहरन आणि श्रेया घोषाल आहेत. ऋषभ नागनेही चित्रपटातील अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. हा चित्रपट ५ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
हम दो हमारे दो
हम दो हमारे दो या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जैन यांनी केले आहे आणि दिनेश विजयन यांनी याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात राजकुमार राव, क्रिती सॅनन, परेश रावल आणि रत्ना पाठक हे मुख्य कलाकार आहेत. चित्रपटाचे संगीत सचिन जिगर यांनी दिले आहे. ही कथा पालकांना दत्तक घेण्यास उत्सुक असलेल्या एका तरुण जोडप्याची आहे. ट्रेलर पाहिल्यावर हा एक विनोदी, मनोरंजक सिनेमा आहे असे वाटते. हा चित्रपट २९ ऑक्टोबरला रिलीज होतोय.
अन्नत्थे (Annaatthe)
रजनीकांतचा सिनेमा एवढी याची ओळख दिली तरी पुरेशी होईल. अन्नत्थे हा आगामी भारतीय तमिळ-भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट शिवा यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली कलानिथी मारन याची निर्मिती करत आहे. या चित्रपटात रजनीकांत, मीना, खुशबू, नयनतारा आणि कीर्ती सुरेश यांच्या भूमिका आहेत. मनोरंजनाचे फुल पॅकेज असा हा चित्रपट असेल. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला रिलीज होतोय.
मीनाक्षी सुंदरेश्वर
या चित्रपटात अभिमन्यू दासानी आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट विवेक सोनी दिग्दर्शित आणि करण जौहरच्या धर्मिक एंटरटेनमेंटनिर्मित बहुप्रतिक्षित रोमँटिक कॉमेडी आहे. तुम्ही हा चित्रपट Netflix वर पाहू शकता. हा चित्रपट ५ नोव्हेंबरला रिलीज होतोय.
Eternals :-
Eternal हा त्याच नावाच्या मार्वल कॉमिकवर आधारित चित्रपट आहे. एक सुपरहिरो आणि त्याला संकटात टाकणारे व्हीलन. त्यांचा सामना करून तो कसे जगाला वाचवतो अशी साधी सरळ कहाणी. हा चित्रपट मार्वल स्टुडिओने निर्मित केला आहे, त्यांचा हा २६ वा चित्रपट आहे. जेम्मा चॅन, रिचर्ड मॅडेन, कुमेल नानजियानी, लिया मॅकहग, ब्रायन टायरी हेन्री, लॉरेन रिडलॉफ, बॅरी केओघन, डॉन ली, हरीश पटेल, किट हॅरिंग्टन, सलमा हायेक आणि अँजेलिना जोली हे कलाकार आहेत. हा चित्रपट ५ नोव्हेंबरला रिलीज होतोय.
तुम्ही यातला कुठला चित्रपट पाहायला उत्सुक आहात, कमेंट करून जरूर सांगा.
शीतल दरंदळे