मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

कुठ्ठे कुठ्ठे म्हणून न नेण्याच्या लायकीचा माणूस!

4 मिनिट वाचन

सेवानिवृत्त काकांचे विविध प्रकार आणि बँकेतील गमतीशीर प्रसंगांवर आधारित एक खुसखुशीत विनोदी लेख.

शेअर करा:
कुठ्ठे कुठ्ठे म्हणून न नेण्याच्या लायकीचा माणूस!

बायोलॉजीत जसे स्पेसिज-फायलम-सब फायलम असं वर्गीकरण असतं तसेच सेवानिवृत्त काकांचे फायलम असतात.त्यापैकी सहज आढळणारा म्हणजे - फायलम पासबुकीया ! या फायलममधले काका विविध देशी-विदेशी -सहकारी नागरी बँकांची पासबुकं सक्काळपासून अपडेट करण्यासाठी फिरत असतात. म्हणजे त्यांच्या खात्यात पैशाचा पूर आलाय वगैरे असं काहीच नसतं. दोन चार लाभांश-एखादा अ‍ॅन्युइटी प्लॅन - मासिक व्याज इतकंच काय ते जमा होत असतं पण त्यानिमित्ताने 'मेरीआवाज सुनो'हा कार्यक्रम त्यांना करता येतो. या पासबुकीयांच्या छळवादाला कंटाळून बँकानी पासबुकं छापायचं मशिन लावल्याची अशीही एक अफवा आर्थिक जगतात आहे. पासबुक मशिनच्या बाईचा आवाज भयंकर 'थ्रेटनींग' आहे असं मला शेजारच्या रामकृष्ण अय्यरने एकदा सांगितलं होतं. आता त्यानं मला सांगायचं कारण असं की मी पण त्याचाय फायलममधला माणूस आहे. फरक इतकाच आहे की माझा सब फायलम थोडा वेगळा आहे म्हणजे 'अंकल सरक्यास्टीया' आहे.

म्हणजे कसा ?
तर उदाहरणार्थ आमच्या बँकेचं एटीएम वारंवार बंद पडायचं म्हणून मी वारंवार तक्रार केली पण काही उपयोग नाही.बंद म्हणजे बंद ! मग मी एक दिवस बँकेत जाऊन मॅनेजर बाईंना म्हटलं 'अहो आपल्या नाक्यावर आता बेटींग घेतात'
माझ्या या बोलण्यावर शक्य तितका राग आणि तिरस्कार दाखवून त्या ताई म्हणाल्या 'सर, प्लीज बी रेलेव्हंट'
मग मी म्हट्लं 'अहो, रेलेव्हन्स आहे ना !
त्या म्हणाल्या काय आहे ? मी म्हटलं 'तुमच्या बँकेचं एटीएम मशिन आज चालू असेल की बंद यावरच बेटींग घेतात आजकाल !
त्या दिवसापासून आजतगायत आमचं एटीएम अखंडीत चालतं आहे.

एक मोठ्ठा प्रॉब्लेम असा आहे की सब फायलम 'अंकल सरक्यास्टीया'ची माणसं घरच्यांना काहीवेळा म्हणजे बर्‍याचवेळा लाज आणतात.
मग त्यांच्यावर 'कुठ्ठे कुठ्ठे म्हणून न नेण्याच्या लायकीचा माणूस' असा टिळा लावला जातो.म्हणजे नेमकं काय घडतं ? ते तर सांगितलंच पाहिजे !
म्हणजे त्याचं असं झालं की बँकेच्या पे-इन स्लीपवर चेकचे विवरण लिहिताना तळाशी एक प्रश्न असायचा तो असा की 'हा चेक कसा मिळाला ? लाभांश ? पेन्शन ? सेल ? इन्हेरिटन्स ? अदर ? वगैरे वगैरे .आता हा प्रश्न बँकेने का विचारायचा तर तसा नियम आहे म्हणून पण हा नियम फक्त १० लाख किंवा जास्त रकमेसाठी लागू होतो. पण नेमकी ती सूचना पे इन स्लीपवर नव्हती. आता काय करावं म्हणून मी त्या स्लीपवर 'अदर'च्या पुढे NOYB लिहून चेक जमा करायला सुरुवात केली.
पाचव्या चेकच्या वेळी क्लिअरिंगवाल्या काकूंनी मला विचारलं ' ये NOYB क्या है ?
'मी म्हटलं NOYB म्हणजे None Of Your Business'
काकूंनी कपाळावर आठ्या आणून हात मारून घेतला !

आता 'अंकल सरक्यास्टीया' सब फायलमचे काका शक्यतो सुटे सुटे फिरतात. बायकोला सोबत घेऊन फिरणं म्हणजे त्यांना 'बेबी सिटींग' केल्यासारखं वाटतं. पण काहीवेळा केवळ अपघाताने बायको सोबत असल्यावर काय होतं हे सांगितलं म्हणजे आजचा अध्याय संपेल.
त्याचं झालं असं की बँकेत NOYB म्हणून नाव कमावल्यनंतर एक दिवस मी आणि बायको बँकेत गेलो होतो. तेवढ्यात क्लियरिंगवाल्या काकूंनी मला बोलावून घेतलं 'चार दिन पैले आपका बड्डे था ना' असं म्हणत आणि एक टी शर्ट दिला. त्यावर छानपैकी मोठ्ठ्या अक्षरात NOYB छापलं होतं.
आता आश्चर्य मला वाटलं आणि मी म्हणालो मी तर रोजच येतो बॅकेत , माझ्या बड्डेला द्यायचा ना ?
त्यावर काकू म्हणाल्या ' रोज आपकी मिसेस आती नही साथमे, आज है साथमे तो सोचा दे दू आजही, वो भी तो पुछे NOYB क्या है ?

वेगळं काय सांगायचं त्या दिवसापासून बायकोनं मला 'कुठ्ठे कुठ्ठे म्हणून न नेण्याच्या लायकीचा माणूस' या वर्गात टाकलं आहे.

(गेल्या रविवारी वर्ल्ड लाफ्टर डे म्हणजे जागतिक हास्य दिवस होता. त्या आठवणीसाठी एक विनोदी लेख बोभाटाच्या वाचकांसाठी !)

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!
मनोरंजन

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!

बँडमध्ये वाजवताना खाल्लेला मार ते मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार; दादा कोंडके यांच्या सुरुवातीच्या संघर्षाचा एक रंजक किस्सा.

८ ऑगस्ट, २०२६

अंकल पै : चित्रांच्या चौकटीतून भारताची गोष्ट सांगणारा माणूस
मनोरंजन

अंकल पै : चित्रांच्या चौकटीतून भारताची गोष्ट सांगणारा माणूस

अमर चित्र कथांच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या भारतीय मुलांना इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणारे लाडके 'अंकल पै' म्हणजेच अनंत पै.

१७ सप्टेंबर, २०२६

हॉलीवूडच्या ‘स्टार ट्रेक’पर्यंत पोहोचलेली भारतीय अभिनेत्री पर्सिस खंबाटा
मनोरंजन

हॉलीवूडच्या ‘स्टार ट्रेक’पर्यंत पोहोचलेली भारतीय अभिनेत्री पर्सिस खंबाटा

मिस इंडिया, आंतरराष्ट्रीय मॉडेल आणि हॉलिवूडच्या ‘स्टार ट्रेक’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या पर्सिस खंबाटा यांचा विस्मरणात गेलेला प्रवास.

२ ऑक्टोबर, २०२६

आचार्य अत्रे: ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने महाराष्ट्र घडवला
मनोरंजन

आचार्य अत्रे: ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने महाराष्ट्र घडवला

पत्रकार, नाटककार, वक्ता आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे खंदे नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या कार्याचा आढावा.

१३ ऑगस्ट, २०२६