गॉडफादर सिनेमात मार्लन ब्रँडोने गालात नक्की काय आणि का ठेवले होते?
'द गॉडफादर' हे नाव वाचले तरी गॉडफादरचे फॅन्स कान टवकारतात. तब्बल ५० वर्षं गॉडफादरचे गारुड लोकांवर आहे. हॉलिवूडमधील हा सिनेमा आज ५० वर्षांनी देखील तरुण पिढी आवडीने बघते. जुन्या पिढीतल्या लोकांचा तर कित्येकदा हा सिनेमा बघून झाला आहे. डॉन विटो कार्लीओनीच्या भूमिकेत मार्लन ब्रँडो आणि मायकल कार्लीओनीच्या भूमिकेत अल पचिनो यांनी अक्षरशः प्राण ओतला. यातले डायलॉग तर कित्येकांच्या जीभेवर असतात. "आय विल गिव यू ऑफर यू कान्ट रिफ्युज!!" हा डायलॉग लोकांच्या मनावर कोरला गेला आहे. असे कित्येक डायलॉग लोकांच्या आवडीचे आहेत. गॅंग्स ऑफ वासेपुरवरची गॉडफादरची छाप दिसून येते. शतकातल्या महान कलाकृतींमध्ये गॉडफादर सिनेमांची सिरीज गणली जाते. पण गॉडफादरला गॉडफादर बनविण्यासाठी या सिनेमात तसा प्रचंड जीवही लोकांनी ओतला आहे.
डॉन विटो कार्लीओनी ज्या पद्धतीने पडद्यावर वावरतो ते बघून प्रेक्षकसुद्धा घाबरतील इतक्या दर्याऱ्यात तो वावरत असे. काय ती संवादफेक, काय ते एक्सप्रेशन्स, काय ते परफेक्शन... सगळेच ओक्के म्हणल्यावर गॉडफादर इतिहास घडवणारच होता. मात्र गेली ५० वर्षं अनेकांना एक प्रश्न सतावत आहे. त्याचे उत्तर काहींनी शोधले, तर काहींना अजूनही उत्तर सापडलेले नाही.
गॉडफादरसाठी मार्लन ब्रॅंडो या अभिनेत्याने प्रचंड मेहनत घेतली होती. त्याने साकारलेला डॉन कार्लीओनी सिनेमात तोंडात एकतर काहीतरी ठेऊन वावरतो किंवा त्याचे तोंडच तसे असावे. त्याच्या तोंडात नेमके काय होते हा प्रश्न आजही अनेकांना पडला आहे. आता यामागील स्टोरी अशी आहे की, मार्लन ब्रॅंडो याला गॉडफादरचा लूक हा एखाद्या डॉनला शोभेल असा करायचा होता. त्यासाठी तो हिंसक आणि खुनशी दिसणे ही पहिली अट होती. आपण तसे दिसतो का याबद्दल ब्रॅंडोला काही गॅरंटी नव्हती. सुरुवातीला तर त्याने ऑडिशनवेळी चक्क तोंडात कापसाचा बोळा कोंबला होता.
यामुळे त्याचे एका साईडचे गाल थोडे फुगीर दिसायचे आणि त्याला हवा तसा लुक त्यामुळे मिळत होता. पण पूर्ण गॉडफादरच्या शूटिंगसाठी असा कापसाचा बोळा कोंबून फिरणे काय योग्य ठरले नसते. म्हणून मग त्याने यावर एक नामी युक्ती केली. यासाठी त्याने एक डेंटिस्ट गाठला. डेंटिस्टकडून त्याने दातांखाली बरोबर दबलेला राहील असा एक माऊथपीस बनवून घेतला. यामुळे त्याची क्रूर दिसण्याची हौस पूर्ण होणार होती. पण हे सोपे नव्हते. शूट पूर्ण होईपर्यंत त्याला हा माऊथपीस तोंडात ठेवावा लागला.
अनेकांना त्याने तंबाखू वगैरे तर तोंडात धरून ठेवली नाही ना अशी शंका होती. सिनेमाचे शूटींग संपल्यावर मार्लन ब्रँडोने वापरलेले माऊथपीस अजूनही न्यूयॉर्क येथील अमेरिकन म्युझियममध्ये ठेवलेले आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते एखादी महान कलाकृती तयार होत असताना त्यामागे त्या कलाकारांची मेहनत देखील तितकीच महान असते.
उदय पाटील