पुरुषांनाही स्तनांचा कर्करोग होतो का ? जाणून घ्या पुरुषांच्या ‘ब्रेस्ट कॅन्सर' बद्दल !!
मंडळी, आज आपण एका दुर्लक्षित परंतु महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. महिलांच्या स्तन कर्करोगाविषयी जनजागृती होत आहे, काही अंशी ती सफलही झाली आहे. पण पुरुषांचं काय? पुरुषांनाही स्तनांचा कर्करोग होतो का? याचे उत्तर आहे… होतो! पुरुषांनाही स्तनांचा कर्करोग होतो. चला तर मग पाहूया काय आहे हा पुरुषांचा ‘ब्रेस्ट कॅन्सर’, आणि तो होण्याची कारणे व उपाय…
मुळात आपल्याकडे एक गैरसमज आहे की पुरुषांना स्तन नसतात म्हणून त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. पण असं नाही मंडळी. 400 पुरुषांमधून एकाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. महिला आणि पुरुष दोघांनाही ब्रेस्ट टिश्यूज असतात. महिलांमध्ये अनेक प्रकारच्या हार्मोन्सच्या प्रभावामुळे त्यांच्या स्तनांना आकार मिळून ते मोठे होतात मात्र पुरुषांमध्ये हे हार्मोन नसल्याने पुरुषांचे स्तन अविकसित राहतात आणि छाती सपाट राहते.
पुरुषांच्या स्तनांच्या कर्करोगाची पहिली केस पॅरिस मध्ये आढळून आली होती. जर हा कर्करोग आढळून आला आणि वेळीच उपचार केले नाहीत तर महिलांमध्ये जीव जाण्याचे प्रमाण 83 टक्के असते तर पुरुषांमध्ये तेच प्रमाण 73 टक्के आहे. पण पुरुष या आजाराकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने जास्त धोका पुरुषांनाच संभवतो. जर दोन्ही स्तनांच्या आकारात फरक असेल किंवा कुठे गाठ आल्याचे जाणवले तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करायला हवी.
पुरुषांमध्ये स्तन कर्करोग होण्याची कारणे -
रेडिएशन
जर कुणी पुरुष आपल्या छातीवर लिंफोमा सारखे रेडिएशन उपचार करत असेल तर त्याला कर्करोग होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
मद्यपान
अति प्रमाणात केलेल्या मद्यपानामुळे लिव्हरवर परिणाम होतो आणि स्तन कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
वाढते वय
जसे जसे वय वाढते तसे तसे कर्करोगाची शक्यता सुद्धा वाढत जाते. अनेकदा असे दिसून आले आहे की 68 वर्षांच्या जवळपास असलेल्या पुरुषांमध्ये हा कर्करोग जास्त प्रमाणात होतो.
अनुवंशिकता
नात्यातील कुठल्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर झालेला असेल तर पुरुषाला सुद्धा तो होण्याची शक्यता असते. महिलांप्रमाणेच पुरुषांच्या रक्ताच्या नात्यातील आजी, आई, बहीण वगैरेना ब्रेस्ट कॅन्सर असेल तर पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो.
इस्ट्रोजन हार्मोनचे वाढते प्रमाण
लिव्हर सिरोसिस आजारात इस्ट्रोजन हार्मोनचे प्रमाण वाढते आणि त्या हार्मोन मुळे कर्करोग होण्याची शक्यता सुद्धा वाढते. एवढंच नाही तर इस्ट्रोजन वाढवणाऱ्या पदार्थांचे अति सेवन केल्यास, इस्ट्रोजन वाढवणारे औषध घेतल्यास ते जीन्स ला सक्रिय करतात आणि स्तनांचा कर्करोग होण्याच्या शक्यता निर्माण करतात.
मंडळी, काही काळजी वेळेत घेतल्यास या कॅन्सरला ओळखता येऊ शकते. पुरुषांमध्ये बेफिकिरी थोडी जास्तच असते त्यामुळे शरीरात काही बदल होत असतील तर ते तिकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच अगदी सुरुवातीच्या स्टेज मध्ये हा कॅन्सर चटकन लक्षात येत नाही. एक छोटीशी गाठ किंवा निपल्सच्या रंगात झालेले परिवर्तन सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरची नांदी असू शकते. या शिवाय या कॅन्सरचा फैलाव महिलांपेक्षा पुरुषांच्या शरीरात जास्त वेगाने होतो. कारण, पुरुषांच्या स्तन उती या महिलांपेक्षा जास्त विरळ प्रमाणात असतात.
कर्करोगावर केले जाणारे उपाय हे लिंग, वय आणि कर्करोगाचा प्रकार यावर अवलंबून असतात. त्याशिवाय कॅन्सर कुठल्या अवस्थेतला आहे यावरही बरेच काही ठरते. प्राथमिक उपचार म्हणजे मास्टेकटॉमी. मास्टेकटॉमी ही स्तनांच्या उतीमधील कॅन्सर झालेला हिस्सा हटवण्याची वैद्यकीय प्रक्रिया आहे. या उपचारानंतर पुरुषांमध्ये इस्ट्रोजनचे असंतुलन रोखण्यासाठी हार्मोन उपचार सुरू केले जातात. कधी कधी केमोथेरपी सुद्धा करावी लागते.
तर मंडळी, कुठलाही रोग असो, तो झाल्यानंतर उपचार करण्याऐवजी रोग होऊ नये म्हणून काळजी घेतलेली केव्हाही बरी. आणि अश्या दुर्लक्षित आजारात तर जास्तच काळजी घ्यावी लागते. कॅन्सर हा असा रोग आहे जो सुरुवातीच्या स्टेज मध्ये आढळून आला तरच यशस्वी उपचार होऊ शकतात. जर तो हाताबाहेर गेला तर प्राण जाण्याची शक्यता अधिक असते.
तेव्हा पुरुषांनो, आपल्या स्तनांकडे दुर्लक्ष करू नका. हाताने तपासणी करताना गाठ असल्याची शंका आल्यास किंवा दोन स्तनांमध्ये फरक जाणवल्यास किंवा निपल्सच्या रंगात फरक पडल्यास त्वरित दवाखाना गाठा.