सकाळी परसाकडे खूप वेळ लागतो? हे उपाय करून बघा...
सकाळी सकाळी पोट साफ होऊन गेलं की दिवसभर कसलीच अडचण होत नाही, असं सगळ्याच लोकांचं मत असतं. पण प्रत्यक्षात सकाळी पोट साफ होणं हीच मोठी अडचण असते.
या परिस्थितीला निरनिराळी कारणं आहेत. आपला रोजचा आहार, जेवणाच्या वेळा, आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती आणि एकूणच आपली दिनचर्या या सार्या गोष्टींचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होत असतो. पचन संस्था योग्य काम करत नसेल तर पचन प्रक्रियेत अडचण येते आणि तिचा परिणाम शौचविधीवर होतो. या बाबत विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे, ज्यांचं पचन चांगलं आहे त्यांना बहुतांशी हा त्रास होत नाही. आपण काय खातो यावर तर पोट साफ होणं अवलंबून असतंच, तसंच यात सवयीचाही मोठा सहभाग असतो.
शौच विधीसाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम. कारण सकाळच्या वेळी पोटातला वात हा खालच्या दिशेने सरकत असतो. साहजिकच, आपली शी सुद्धा खालच्या दिशेने या वाताच्या साहाय्याने जात असते. म्हणजेच, सकाळच्या वेळेस शौचाला मदत करणारा वायूच जेव्हा पॉवरफुल असतो तेव्हा ’काम’ अगदी पटकन होऊन जातं. पण होतं काय, कधी झोप तर कधी कंटाळा या असल्या कारणांमुळं आपण ही सोयीची वेळ घालवतो आणि दिवसभर "जुदा हो के भी तू मुझमें कहीं बाकी है।" हे गाणं म्हणत बसतो.
म्हणूनच, हवं तेव्हा झटकन पोट रिकामं व्हावं म्हणून किंवा ते वेळच्यावेळी व्हावं म्हणून, खाली दिलेले उपाय नक्की करा..
१. चालणे, धावणे, सायकलिंग यांसारखा नियमित व्यायाम करावा..
२. पालक, चवळी, मूळा, मेथी अशा हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट, मूळा, सुरण अशा विविध कंदांचा वापर असलेला असा फायबरयुक्त आहार करावा..
३. आहारात वातूळ पदार्थांचे प्रमाण कमी करावं..
४. अतिप्रमाणात तळलेले, चिज, पाव, ब्रेड यांनी युक्त पदार्थांचे सेवन टाळावं..
५. दिवसभरात पाण्याचं योग्य प्रमाणात सेवन करावं..
६. रात्री झोपण्यापूर्वी एक-दोन चमचे तूप घालून गरम दूध प्यावं..
७. तूपाबरोबर त्रिफळा चूर्ण खावं..
रोजच्या रोज आणि वेळच्यावेळी पोट साफ होणं हे आरोग्याचं पहिलं लक्षण मानलं जातं. वर सांगितलेल्या उपायांनी हे साध्य होणं सहज शक्य आहे.