दुर्मिळ आजाराने मृत्यूपंथावरच्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासाठी या चीनी बाबाने घरीच औषध बनवले..
बाप नावाचा खंबीर आधार पाठीशी असेल तर कुठलंही वादळ पेलण्याची जिद्द निर्माण होते. आपल्या कुटुंबाला कसलाही धक्का लागू नये म्हणून ऊन, वादळ, वारा, पाऊस कशाचीही तमा न करता वणवण करणारा बाप वेळ आलीच तर स्वतःला घरात कैदही करू शकतो हे आपण गेले दोन वर्षे अनुभवतोच आहोत. आज आपण अशाच एका खंबीर बापाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या मुलाच्या इलाजासाठी देशात कुठेच औषध मिळत नाही म्हणून घरीच औषधाची प्रयोगशाळा सुरु केली आणि आपल्या मुलासाठी आवश्यक असणारे औषध बनवले.
चीनच्या शु वेई यांच्या दोन वर्षाच्या मुलाला एक गंभीर आजार आहे. हा आजार फार दुर्मिळ आहे, तो लाखांत एखाद्या मुलाला होतो. त्यांचा मुलगा हाओयांगला जन्मत:च जनुकीय संरचनेतील बदलामुळे मेनेकस सिंड्रोम नावाचा एक दुर्मिळ आणि दुर्लभ आजार झाला आहे. त्याच्या जन्मावेळीच डॉक्टरांनी शु वेई यांना याची कल्पना दिली होती आणि हेही सांगितले होते की, हाओयांग फक्त काही महिन्यांचा पाहुणा आहे. आपलं बाळ फक्त काही महिनेच जगणार हे सत्य कुठले आई-वडील पचवू शकतील? शु वेई यांना डॉक्टरांचे हे सत्य खरे ठरू नये म्हणून प्रयत्न करायचे होते.
मेनेकस सिंड्रोम हा असा आजार आहे, ज्यात शरीरात कॉपरचे प्रमाण वाढत जाते आणि हे वाढलेले कॉपर शरीरातच साचून राहते, यामुळे रुग्णाचा काही दिवसातच मृत्यू होतो. लाखात एखाद्या मुलामध्येच हा आजार आढळून येतो. त्यामुळे यावर अजूनही यशस्वी उपचार पद्धती निघालेली नाही. या आजारावर तात्पुरता इलाज म्हणून कॉपर हिस्टीडाइन नावाचे औषध दिले जाते. परंतु याचा खप जास्त नसल्याने कुठल्याही औषध कंपन्या हे औषध भरपूर प्रमाणात बनवून ठेवत नाहीत. गेली दोन वर्षे तर लॉकडाऊनमुळे हे औषध मिळणे जवळपास अशक्यप्राय बनले होते. अशा परिस्थितीत शु वेई यांनी घरीच हे औषध बनवण्याचा निर्धार केला. त्यांच्या मनात ही कल्पना आली आणि त्यांनी तात्काळ हे काम सुरु केले.
शु वेई सध्या तीस वर्षांचे आहेत. फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या शु वेई यांना औषधनिर्माणशास्त्राबद्दल कसलीच माहिती नाही. इंटरनेटच्या आधारे त्यांनी आधी या औषधाबद्दलची सगळी माहिती जमा केली. यात आणखी एक अडचण म्हणजे ही माहिती इंग्रजीत होती आणि शु वेई यांना इंग्रजीचे फक्त कामचलाऊ ज्ञान आहे. इंटरनेटच्याच आधारे त्यांनी या माहितीचे चीनी भाषेत ट्रान्सलेशन केले. त्यातून घरीच औषध बनवण्यास सुरुवात केली.
त्यांचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीय देखील हा मूर्खपणा करण्यात वेळ वाया घालवू नको असा सल्ला देत होते, पण शु वेई यांनी कुणाचेही ऐकले नाही. सुरुवातीला त्यांनी तयार केलेला औषधाची ट्रायल सशांवर करून पाहिली. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही या औषधाची चाचणी घेतली आणि त्याचे कसलेही साइडइफेक्ट होत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी हाओयांगवर या औषधाचे उपचार सुरू केले.
हाओयांगची वाढ खूपच मंद गतीने होत आहे. दोन वर्षे झाली तरी त्याला अजुनही बोलता येत नाही की, चालता येत नाही. डॉक्टरांनी तर त्याची आशाच सोडली आहे. त्याच्या आईलाही त्याची अवस्था पाहवत नाही त्यामुळे ती आपल्या पाच वर्षाच्या मुलीसोबत वेगळी राहते. अर्थात ती हाओयांग आणि शु वेईची काळजी करत नाही असे नाही, पण तिच्यात हे सत्य स्वीकारण्याची क्षमता नाही.
शु वेई यांना हे औषध बनवण्यास सहा आठवडे लागले. सहा आठवड्यांसाठी त्यांनी स्वतःला त्यांच्या घरातच कोंडून घेतले होते. एकीकडे हाओयांगची देखभाल करायची आणि दुसरीकडे त्याच्या औषधासाठी प्रयत्न करायचे, त्यासाठी पैशाची जमवाजमव करायची ही सगळी कसरत त्यांनी कशी पार पाडली देव जाणे.
सध्या तरी त्यांनी कामचलाऊ औषध बनवले असले तरी त्यांना या आजारावर पूर्णतः गुणकारी ठरेल असे औषध बनवायचे आहे. आपल्या मुलाला थोडीशी का असेना जगाची ओळख करून द्यायची आहे. त्याला बोलता येत नसेल चालता येत नसेल म्हणून काय त्याला जीव नाही का? त्याला भावना नाहीत का? त्याच्या भावनांना समजून घेण्यासाठीच त्यांचा हा सगळा आटापिटा सुरू आहे.
शु वेई यांच्या प्रयत्नांना यश येवो आणि त्यांचा हाओयांग लवकर बरा होवो हीच प्रार्थना!
मेघश्री श्रेष्ठी