computer

मलेरियावरचं सर्वात जुनं औषध 'क्विनाइन' स्मगलिंग करावं लागलं होतं माहित्ये का?

आज आम्ही तुम्हाला मलेरियाच्या एका जुन्या औषधाची मनोरंजक स्टोरी सांगणार आहोत. तर वाचकहो, या जुन्या औषधाचे नाव आहे क्विनाइन म्हणजे आताच्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे आजोबा!! चला तर वाचू ही रंजक कथा!!

क्विनाइन म्हणजे सिंकोना नावाच्या झाडाच्या सालीपासून बनवलेले औषध!

सिंकोना या वनस्पतीचे मूळस्थान म्हणजे दक्षिण अमेरिका. यांतल्याच एका देशात म्हणजे पेरूमध्ये धर्मप्रसारासाठी युरोपियन पाद्री जेव्हा पोहचले तेव्हा त्यांना या वनस्पतीची उपयुक्तता कळली. पेरूच्या सरकारने ही वनस्पती देशाबाहेर जाऊ नये म्हणून कडक कायदे केले होते. पण तरीसुध्दा या वनस्पतीचे 'स्मगलिंग' होऊन या वनस्पतीची लागवड इतर देशांत सुरु झाली. त्यामुळे सिंकोनाच्या सालीच्या भुकटीला आधी 'जेसुइट पावडर' असे नाव मिळाले होते.

तसं पाह्यलं तर जगात एकूण चाळीस प्रकारच्या सिंकोना प्रजाती आहेत. पण त्यांपैकी फक्त चारच प्रजाती उपयुक्त आहेत. त्या चार प्रजातींपैकी सिंकोना ऑफीसिनालीसची प्रामुख्याने लागवड करण्यात आली. १६७७ साली लंडन फार्माकोपीयात या औषधाचा मलेरियावरील औषध म्हणून समावेश करण्यात आला.  आता या औषधाला 'जेसुइट पावडर ' म्हणणे योग्य दिसले नसते. म्हणून अधिकृत नाव सिंकोनाच्या सालीचे नाव क्विनाइन असे नोंदण्यात आले.

१८२० साली पेलेटिअर आणि कॅवेंटॉ या दोन रसायनशास्त्रज्ञांनी सिंकोनाच्या सालीपासून शुध्द क्विनाइन वेगळे केले. १८२० पूर्वी झाडाची साल वाळवून त्याची वस्त्रगाळ भुकटी केली जायची. त्यानंतर ही भुकटी एखाद्या द्रावात, शक्यतो वाईनमध्ये मिसळून प्यायली जायची. त्यकाळात तेव्हा मलेरियाच्या जंतूंचा म्हणजे प्लाज्मोडीयमचा शोध लागला नव्हता. पण या भुकटीने ताप कमी होतो, मलेरिया बरा होतो याचे ज्ञान लोकांना होते. १९४४ साली वुडवर्ड आणि डोरींग या दोन शास्त्रज्ञांना प्रयोगशाळेत रासायनिकरित्या क्विनाइन तयार करण्यात यश मिळाले. त्यानंतर सिंकोनाच्या सालीच्या भुकटीचा वापर कमी होत गेला.

पण सिंकोना हे नाव पण या वनस्पतीला कसे मिळाले यामागेही एक गमतीदार किस्सा आहे. त्याकाळी पेरूमध्ये लुई फर्नांडेझ हा स्पेनचा व्हाइसरॉय होता. हा व्हाईसरॉय चिंकोनाचा उमराव  होता. त्याच्या पत्नीला म्हणजे अ‍ॅना डी ओसोरिओला मलेरिया झाला तेव्हा तिने या वनस्पतीच्या काढ्याचा वापर केला. आपल्या पतीसोबत जेव्हा ती पेरूत आली तेव्हा ती मलेरियाने पुन्हा आजारी पडली. तेव्हा जवळच्या एका शहरातल्या सरकारी अधिकार्‍याने हे तिला औषध पाठवले. अशा अनोळखी उपायांवर विश्वास नसल्याने आधी तिने आजारी पडलेल्या नोकराला दिले. तो बरा झालेला पाहून सिंकोनाची उपयुक्तता तिला समजली. १६३८ साली त्यांची बदली मायदेशी स्पेनला झाली तेव्हा सोबतच्या सामानात ती सिंकोनाच्या साली मोठ्या प्रमाणात घेऊन गेली. नेमकी त्याच वेळी स्पेनमध्ये मलेरियाची साथ आली. अ‍ॅना डी ओसोरिओने आणलेल्या औषधाचा त्याकाळी इतका उदोउदो झाला की त्या भुकटीला लोकं काउंटेस पावडर म्हणायला लागले. त्यानंतर कार्ल लिनीअस या वनस्पती शास्त्रज्ञाने या वनस्पतीला Chinchona हे नाव दिले.

भारताच्या इतिहासात पण सिंकोनाचा हिस्सा आहेच. १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दानंतर कंपनी सरकारची सत्ता संपुष्टात आली. ब्रिटिश सरकारने सत्ता हातात घेतल्यावर पुन्हा युध्द होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात ब्रिटिश सैन्य इथे आणण्याचा निर्णय घेतला. या सैन्यापुढे मोठी समस्या होती मलेरियाची. त्याकाळी भारतात मलेरिया हा कायम छळणारा आजार होता. तेव्हा भारतात सैन्य आणण्याच्या सोबत इथे सिंकोनाची लागवड करण्याचा पण निर्णय घेण्यात आला. निलगिरी प्रांतात अडीच लाख रोपे लावून या कामाची सुरुवात करण्यात आली. १९४४ नंतर सिंथेटीक क्विनाइन आल्यावर सिंकोनाची गरज संपली. पण मलेरियाचा प्रादुर्भाव कायम होता. म्हणून गावोगावी पोस्ट ऑफीसाच्या मार्फत मलेरियाच्या गोळ्यांचे वितरण व्हायचे. 

तर वाचकहो, औषधाचे राजकारण हा विषय आजचा नव्हे, तर फार जुना आहे इतकंच या लेखात आम्हाला सांगायचं होतं!!

सबस्क्राईब करा

* indicates required