जगात मुंबई-पुण्याएवढ्या आकाराचे देश आहेत? ही घ्या १० देशांची यादी !!
जगातील काही देशांकडे बघून छोटा पॅकेट बडा धमाका म्हणतात तसा प्रत्यय येतो. हे देश आकाराने, लोकसंख्येने आणि नावाने सुद्धा अगदी लहानसे आहेत. किती लहान, तर मुंबई-पुण्यापेक्षाही लहान आकाराचे देश आज जगात अस्तित्वात आहेत. पण, सौंदर्य, आदर-सत्कार, सांस्कृतिक इतिहास, आणि रमणीय ठिकाणांच्या बाबतीत हे देश मोठ्या देशांच्या तोडीस तोड म्हणता येतील असे आहेत.
आज आम्ही असे १० देश तुमच्यासाठी आणले आहेत. यातील कोणत्या देशात तुम्हाला जायला आवडेल हे ठरवा.
१) माल्टा –
माल्टा या यादीतील पहिला देश आहे. या देशाचे क्षेत्रफळ आहे अवघे ३१६ चौकिमी. दक्षिण युरोपमधील हा एक सौंदर्य संपन्न देश. रिपब्लिक ऑफ माल्टा असे या देशाचे संपूर्ण नाव. माल्टा हे एक बेट आहे. समुद्र किनाऱ्यानी वेढलेला देश. इथल्या समुद्र किनाऱ्यावर तुम्ही पाण्यातील अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद लुटू शकता. समुद्रात केल्या जाणाऱ्या स्कुबा डाइव्हसाठी तर हा देश विशेष प्रसिद्ध आहे. समुद्रातील खारट पाणी आणि रेताड वाळू यांचे जर तुम्हाला फारसे कौतुक नसेल तरीही तुमच्यासाठी इथे असे बरेच काही आहे ज्याबद्दल तुम्हाला आकर्षण वाटू शकेल. माल्टाला ७००० वर्षांचा इतिहास आहे आणि या इतिहासाची साक्ष देणारी अनेक ऐतिहासिक ठिकाणे इथे आहेत. इथली प्राचीन संस्कृतीची माहिती घेण्यास आणि त्याच्याशी संबंधित असलेली ही ठिकाणे पाहायला तरी तुम्हाला नक्कीच आवडेल.
२) मालदीव्ज –
मालदीव देशाचे क्षेत्रफळ तर अवघे ३०० चौकिमी आहे. पण, या देशाचे वर्णन करताना अगदी ताजातवाना देश अशी केली जाते. रिपब्लिक ऑफ मालदीव आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात नेहमीच आसुसलेला असतो. इथले पांढरे शुभ्र समुद्रकिनारे तुम्हाला भुरळ पडल्याशिवाय राहणार नाहीत. इथल्या समुद्रातील निळेशार स्वच्छ पारदर्शी पाणी, मुक्तहस्ते किरणांची आणि उबदार पणाची उधळण करणारा सूर्य, सुस्तावलेली संध्याकाळ अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांचा अनुभव तुम्ही कधीच विसरणार नाही.
३) सेंट किट्ट्स अँड नेविस –
वेस्ट इंडीज देश समूहांतील हा एक देश. ज्याचे क्षेत्रफळ आहे फक्त २६१ चौकिमी. इथे तुम्हाला निरनिराळ्या प्रकारच्या अॅडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी होता येईल. पोहणे, बोटिंग करणे अशा पारंपारिक प्रकाराशिवायही अनेक वॉटर स्पोर्ट्स खेळता येतात. जसे की स्नोर्क्लिंग, कयाकिंग, जेट स्काइंग. इथे दिवसभर तुम्ही अशा खेळात वेळ घालवू शकता किंवा वेगवेगळ्या इस्टेट्सना भेटी देऊन तिथल्या पारंपारिक शुगर प्लांटेशन विषयीची माहिती घेऊ शकता. रात्री संगीताचे लाईव्ह शो आयोजित केले जातात. त्यांच्या संगतीत तुम्ही कँडल नाइट डिनरचा आनंदही घेऊ शकता.
४) मार्शल आइसलँड –
पॅसिफिक समुद्रातील मार्शल आइसलँड हे एक देखणं बेट आहे. पर्यटक नेहमीच या देशाकडे कानाडोळा करत आले आहेत. सुमारे वर्षभरात फक्त ५००० लोकं हा देश पाहण्यासाठी येतात. याचा अर्थ तुम्ही असा घेऊ, नका अरे मग काय अर्थय जाण्यात? पण तुम्हाला माहितेय का इथले उथळ पण स्वच्छ निळ्याशार पाण्याचे साठे किती आकर्षक दिसतात ते. पाण्याखालचे अद्भुत जग पाहण्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर या बेट सदृश्य देशाला तुम्ही आवर्जून भेट दिली पाहिजे. या देशात माशांच्या सुमारे ८०० प्रजाती आणि प्रवाळ म्हणजेच शेवाळाचे १६० प्रकार पाहायला मिळतात.
५) लेचंस्टाइन –
स्वित्झर्लंड, जर्मन आणि ऑस्ट्रिया असा तिन्ही बाजूंनी मोठ्या देशाच्या सीमेला लागून असलेला हा एक छोटासा देश. याचे क्षेत्रफळ आहे, १६० चौकिमी. तुम्ही जेंव्हा या देशाला भेट द्याल तेंव्हा तुम्हाला आपण एखाद्या परीकथेतील शहरात तर आलो नाहीत ना असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. हो खडकांनी बनवलेले पक्के रस्ते आणि मोठमोठे विस्मयकारक किल्ले पाहिल्यावर दुसरे काय वाटेल? या देशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे संगीत रसिक आणि संगीतकारांचा देश आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. या देशाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती नक्कीच मिळेल.
६) सॅन मरिनो –
सॅन मारिनो हे जगातील सर्वात प्राचीन सार्वभौम राज्य असल्याचे म्हंटले जाते. तसेच जगातील सर्वात जुना प्रजासत्ताक देश. याचे क्षेत्रफळ अवघे ६१ चौकिमी आहे. अपेनाइन डोंगर रांगांमध्ये हा देश वसला आहे. इथल्या डोंगर रांगा आणि स्वादिष्ट भोजन तुम्हाला एक अविस्मरणीय अनुभव देतील.
७) तुवालू –
पॅसिफिक समुद्रातील हे देखील एक छोटेसे बेटच. हवाई आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशाच्या मध्ये हे बेट आहे. जहाज प्रवास, डायव्हिंग, स्नोर्कलिंग अशा अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद येथे लुटू शकता. या देशाच्या सीमेवरून मोटारबाईकची राइडही करू शकता. फक्त २६ चौकिमीच्या देशाला प्रदक्षिणा घालणे किती मजेशीर गोष्ट असेल नाही!
८) नाउरु -
पॅसिफिक समुद्रातील एका लहान बेटावर हा देश वसला आहे. हा जगतील एकमेव असा दश आहे ज्याला राजधानी नाही. इथली रमणीय ठिकाणे आणि तेथील निसर्ग सौंदर्य भुरळ पडणारे आहे. हा छोटासा देश फॉस्फेटच्या खाणींनी समृद्ध आहे. इथल्या समुद्र किनाऱ्यावर होणारा सूर्योदय फारंच मनोहारी दिसतो. या छोट्याशा देशात बारा जमातीचे लोक राहतात. त्यांच्या देशाच्या झेंड्यावर बारा स्टार आहेत. प्रत्येक तारा या बारा जमातींचे प्रतिक म्हणून घेतला आहे.
नाउरु : घरचं फॉस्फेटचं सोनं उधळून सर्वात श्रीमंताचा आता भिकारी झालेला देश!!
९) मोनॅको –
या देशाचे क्षेत्रफळ अवघे २.०२ चौकिमी आहे . इतक्या कमी क्षेत्रफळाच्या या देशात जगातील सर्वात जास्त श्रीमंत लोकं राहतात. तुम्हालाही जर अशा ऐश्वर्य संपन्न जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर या देशाला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. या छोट्याशा देशात मनोरंजक आणि चित्तवेधक अशा अनेक गोष्टी आहेत. ऐतिहासिक ठिकाणे, प्रसन्न समुद्र किनारे, कॅसीनोज, सुंदर वास्तू अशी कितीतरी मोठी यादी सांगता येईल.
१०) व्हॅटीकन सिटी –
रोमन कॅथोलिक चर्चचे मुख्य केंद्र म्हणून या देशाची ख्याती आहे, हे तर आपल्याला माहित आहेच. इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी हा देश वसलेला आहे. याचे क्षेत्रफळ आहे अवघे ०.४४ चौकिमी. या देशाला चारी बाजूला भिंतींचे कुंपण आहे. पण, या छोट्याशा देशात अनेक जागतिक ऐतिहासिक ठिकाणे आहेत ज्याचे संपूर्ण जगाला आकर्षण आहे. इथल्या चर्चच्या पोपना ख्रिश्चन धर्मातील सर्वोच्च पोपचा मान दिला जातो.
लॉकडाऊनच्या काळात घरात बसून कंटाळा आलाच असेल, तर या छोट्याछोट्या देशांना भेट देऊ शकता. मग कधी घेताय बॅग भरायला?
लेखिका : मेघश्री श्रेष्ठी