जगातल्या ११ यडचाप सायकली....सर्वात यडचाप कोणती? सांगा बरं !!
दोन चाकं, मध्ये पॅडल (पायडल/पायंडल), हँडल, गियर, त्रिकोणी शीट, हे वर्णन वाचून काय आठवलं ? सायकल ना ? सायकल म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर सर्वसाधारणपणे असंच चित्र उभं राहतं. पेट्रोलचा खर्च नाही, डीझेलचा खर्च नाही, इतर कोणतंही इंधन नाही, चालवल्यावर उलट आपलाच व्यायाम होतो. अशी ही आपली लाडकी सायकल. पण काहींना सायकलीचं हे सर्वसाधारण रूप बघवत नाही ना. मग ते काय करतात नवीन सायकल बनवतात. एकदम अतरंगी. अश्या सायकलींची मोठी लिस्ट आहे भाऊ. आज आम्ही तुमच्यासाठी १० नमुने घेऊन आलोय.
बघा तरी लोकांनी कशा यडचाप सायकली बनवल्या हायत ते !!
१. शु बाईक
आहे नेहमीचीच सायकल, पण रबर टायरच्या जागी ६ चपलांचा टायर लावण्यात आलाय. व्हिडीओमध्ये बघा सायकल पळते कशी.
२. रेयूलेक्स त्रिकोणी सायकल
चाक म्हटलं की ‘गोल’च असतं ना? पण ह्यांनी बघा काय केलंय. त्रिकोणी चाकाचा टायर बनवलंय. ही आयडिया आहे ‘फिल मिलर’ नावाच्या मॅकॅनिकल इंजिनियरची.
३. २० फुटाची सायकल
सिनेमॅटोग्रफार रिची ट्रिम्बल यांनी २०१४ साली ही सायकल तयार केली. या सायकलचं नव आहे ‘स्टुपिडटॉलर’ (अर्थात यडचाप), पण एवढी उंच सायकल घेऊन करायचं काय?
४. ग्लाइडसायकल
रोजच्या धावपळीत खरोखरच धावायला वेळ मिळत नाही का? मग तुमच्याचसाठी आहे ‘ग्लाइडसायकल’. सायकल चालवता चालवता पळण्याचा आनंद घ्या भाऊ.
५. स्कूटर बाईक (वेरबाईक)
लहान पोरांची ती स्कूटर आठवते का, त्यात हँडलसाठी मोठा दंड असायचा आणि स्कूटर पायाने ढकलत न्यावी लागायची? अगदी तशीच आहे ही सायकल. फक्त या सायकल कम बाईकला मोटार लावण्यात आली आहे ज्यामुळे तुमचे पायाने ढकलण्याचे कष्ट वाचतात.
६. निल्सन युनो व्हील
१९३० साली वॉल्टर निल्सनने एक चाकी सायकल तयार केली होती. या सायकलीला त्यांनी चक्क मोटार जोडली होती. त्याकाळात याची मोठी चर्चा रंगली होती.
७. व्ही डब्ल्यू बिटल बाईक
टेक्ससच्या सायकल कंपनीने ही अजब सायकल ३ महिन्यात तयार केली. सायकलवर लहानसहान वस्तूंसाठी पॅडलच्या मध्ये एक छोटा कप्पा तयार करण्यात आला. पण झालं असं की या सायकलला कोणी विचारलं सुद्धा नाही.
८. स्प्रिंगची सायकल
ब्रिटीश युट्युबर कॉलीनने ‘मज्जा’ म्हणून सायकलच्या दांड्यांना स्प्रिंग सोबत बदललं. त्यानं हे सगळं कॅमेऱ्यासमोर केलं आहे. वरचा व्हिडीओ बघा !!
९. चेनलेस सायकल – बायसॅम्पल
जसा कम्प्युटर मदर बोर्डशिवाय ‘अधुरा’ आहे, तसंच सायकल चेनशिवाय ‘अधुरी’ आहे. पण याला सुद्धा पर्याय आहे. बायसॅम्पल नावाची सायकल अशीच आहे. या सायकलचे पॅडल्स मागच्या टायर्सना जोडलेले असल्याने चेनची गरजच पडत नाही.
१०. दुतोंडी सायकल
आपण दोन सायकली एकत्र केलेल्या बघितल्या असतील. पण एकमेकांच्याविरुद्ध बाजूला तोंड असलेल्या सायकली कधी बघितल्या आहेत का? हे म्हणजे रेल्वेसारखं झालं. ‘येताना मी चालवतो, जाताना तू चालव !!’
११. फ्लीज
ही फ्लीज नावाची सायकल आहे ना, तिला चेन, पॅडल्स आणि सीट सुद्धा नाही. मग तिला सायकल कसं म्हणणार ? असो... या सायकलच्या वरच्या दांड्यातून डोकं बाहेर काढण्यासाठी जागा असते, त्यातून डोकं बाहेर काढायचं अन् पायाने सायकल हाकत जायचं. सायकलिंग आणि चालण्याचा एकत्रित आनंद देणारी याहून यडचाप सायकल आजवर बनलेली नाही.
तर आता आम्हाला सांगा तुम्हाला कोणत्या सायकलने फिरायला आवडेल ?