computer

नोकिया ३३१० फोनला २१ वर्षे पूर्ण...या फोनसोबत तुमच्या काय आठवणी आहेत?

जगभर आता टचस्क्रीन्सचा बोलबाला आहे. सध्या लहानांपासून मोठ्या प्रत्येकाच्या हातात टचस्क्रीन स्मार्टफोन आहेत. आता अशी वेळ आलीय की चुकून टचस्क्रीन नसलेला फोन हातात आला तर त्यात काय करावे हेच लोकांना कळत नाही. पण नोकियाने एक काळ गाजवला होता. त्या फोन्सच्या आठवणीत आजही कित्येक लोक भावूक होतात. नोकियाचेही बरेच फोन्स आले आणि गेले, पण त्यांचा सर्वात प्रसिद्ध फोन म्हणजे नोकिया ३३१०!!! या महिन्यात या नोकिया ३३१० ला २१ वर्षं होत आहेत.

अनेकांच्या कित्येक आठवणी या फोनसोबत जोडल्या गेल्या आहेत. आज पंचविशीच्या पुढे असलेल्या जनरेशन झेडमधील प्रत्येकाला नोकिया ३३१०चे दिवस आठवत असतील. अनेकांचा आयुष्यात हातात घेतला पहिला फोन म्हणजे नोकिया ३३१०!!! कुणी पॉकेट मनीचे पैसे जमा करून, कुणी पहिल्या पगारावर घेतलेला फोन आहे हा.

या पिढीतल्या लोकांना नोकिया ३३१०चा विसर आजही पडलेला नाही. आजच्या घडीला ३३१० सोबत नसला म्हणून काय झालं? मीम्समधून लोकांना आठवणींचे उमाळे तर सतत येताना दिसतात. त्यातले बहुतेक मीम्स तर स्नेक गेम आणि कसे आजचे फोन हे कमकुवत आहेत आणि नोकिया ३३१० कसा थॉरच्या हाथोड्याहून जास्त कणखर होता हे सांगत असतात.

पण खरंच यात अतिशयोक्ती नाहीय. अनेकांना अनुभव आले असतील. टेरेसवरून पडला, चालत्या गाडीवरून पडला तरी हा मोबाईल जस्साचा तस्सा राहायचा. आपल्या या लाडक्या फोनच्या वाढदिवशी अनेकांनी त्याची आठवण काढली. आज टेक्नॉलॉजी कुठेच्या कुठे पोचली असली तरी या जुन्या फोनची गोष्टच न्यारी होती नाही का?

 

आणखी वाचा :

तब्बल १२०० फोन्सचा मालक...'नोकिया मॅन' जयेश काळे !!

सबस्क्राईब करा

* indicates required