computer

आता नोकरी मिळेल घरबसल्या; गूगलने भारतात आणलं नवं अ‍ॅप!!

कोविडच्या पाठोपाठ आलेलं नवीन संकट म्हणजे बेरोजगारी. गेल्या काही महिन्यांत लाखो लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. काहींच्या स्टँडबाय मोडवर आहेत. काहींची नोकरी शाबूत असली तरी मधल्या काळात पगार मिळालेला नाही किंवा कमी पगारावर काम करावं लागलंय. या सगळ्यांतून बाहेर पडण्यासाठी गूगलबाबा लोकांच्या मदतीला धावला आहे. नेहमीप्रमाणेच. गूगलमुळे आता नोकरी शोधणं शक्य झालं आहे. तेही फार धावपळ न करता... एका जागी बसून!

गूगलचं जॉब सर्च अ‍ॅप्लिकेशन आता भारतातही लाँच झालं आहे. या अ‍ॅपचं नाव आहे - कॉर्मो (Kormo). हे अ‍ॅप आपल्याकडच्या लाखो तरुणांना एंट्री लेव्हलच्या नोकर्‍या शोधण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, आणि जॉब मार्केटमध्ये आघाडीवर असलेल्या लिंक्डइनला त्याने आत्ताच टक्कर द्यायला सुरुवात केली आहे.

गूगलने भारतात हे अ‍ॅप गूगल पे (Google Pay) बरोबर संलग्न केलं आहे. यापूर्वी २०१८ मध्ये त्यांनी हे अ‍ॅप बांगलादेशमध्ये लाँच केलं होतं. त्यानंतर इंडोनेशियात त्याचा विस्तार केला गेला आणि आता ते भारतात उपलब्ध झालं आहे. सध्या भारतातल्या प्रमुख दहा शहरांमध्ये असलेल्या नोकरीच्या संधींची यादी केली जात आहे. यात मुंबई, नवी मुंबई, पुणे, दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, बेंगलुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता ही शहरं आहेत.

कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे हे अ‍ॅप लाँच केल्यापासून झोमॅटो, डन्जो यांच्यासह अनेक कंपन्यांनी त्यावर २० लाखांहून अधिक नोकर्‍यांच्या जाहिराती पोस्ट केल्या आहेत. ऑन-डिमांड बिझिनेस, रिटेल आणि हायपरलोकल डिलिव्हरी यासारख्या वेगाने वाढणार्‍या क्षेत्रांसाठी तर ते वरदानच ठरलंय. लाँच केल्यापासून या अ‍ॅपने १०,००,००० डाऊनलोड्सचा टप्पा ओलांडला आहे.

एन्ट्री लेव्हलच्या नोकर्‍या शोधताना बहुतेकांचं घोडं अडतं ते चांगल्या रेझ्युमे/ सीव्हीपाशी. आवश्यक कौशल्यं तर आहेत, पण ती योग्य प्रकारे मांडायची कशी? आपलं प्रोफाईल इतर दहाजणांमध्ये उठून दिसेल अशा प्रकारे कसं बनवायचं? हे प्रश्न बहुतेकांना सतावतात. पण या अ‍ॅपने हेही सोपं केलंय. ते तुम्हाला छानसा डिजिटल रेझ्युमे बनवून देतं. तुम्ही फक्त एवढंच करायचं- अ‍ॅप डाऊनलोड करायचं आणि शैक्षणिक आणि वैयक्तिक पार्श्वभूमी, याआधी केलेल्या कामांचा इतिहास याबद्दलची माहिती भरून प्रोफाइल पूर्ण करायचं. काही वेळात आपला नवीन डिजिटल रेझ्युमे आपल्यासमोर हजर. तो तुम्ही विनामूल्य डाऊनलोड करू शकता आणि इतरांना शेअरदेखील करू शकता.

हे अ‍ॅप तुम्हाला तुमच्या प्रोफाईलशी मिळत्याजुळत्या असणार्‍या जॉबबद्दलची लेटेस्ट माहितीदेखील देतं. त्यामुळे युजर्सना जास्तीत जास्त ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करणं शक्य झालं आहे. इतकंच नाही तर हे अ‍ॅप नवी कौशल्यं शिकण्यासाठी मदत करणार आहे. ठिकाणांनुसार नोकर्‍यांची यादी, रीअल-टाइम ट्रॅकिंग, अ‍ॅप्लिकेशनवरील अपडेट्स, डिजिटल सीव्ही तयार करण्यासाठी मार्गदर्शक आणि नवीन स्किलिंग सामग्री अशा अनेक सोयीसुविधा कॉर्मोने देऊ केल्या आहेत.

आज कोविडच्या पार्श्वभूमीवर जॉब मार्केटचं चित्र खूप बदललं आहे. पूर्वीपेक्षा वेगळी कौशल्यं आणि अनुभव यांची आवश्यकता आहे. काही क्षेत्रांचं तर पार कंबरडं मोडलं आहे. काही क्षेत्रं कशीबशी तग धरून आहेत. तुम्ही कुणीही असा, उद्योजक, नोकरदार अथवा विद्यार्थी; आव्हानं भरपूर आहेत. अशा परिस्थितीत कॉर्मो हा आशेचा किरण ठरावा.

 

लेखिका : स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required