मालकाने सोडून दिलेली कुत्री आज अनेकांचा जीव वाचवत आहे !!

प्रवास किती धोकादायक होत चालला आहे हे काही आम्ही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यातल्या त्यात तो रेल्वेचा असेल तर मग बोलायलाच नको!! लोक रेल्वे ट्रॅक ओलांडून किती मोठी रिस्क घेत असतात आपण बघतोच. थोडासा वेळ वाचवण्याच्या नादात रोजच्या रोज किती अपघात होतात हे ही आपण बघतो असतो. पण आता हे अपघात थांबविण्यासाठी चक्क एक कुत्री मैदानात उतरलेली पाहायला मिळत आहे मंडळी!!
Chinnaponnu, a dog, who was abandoned at station two years ago is seriously offering her services in assisting RPF in warning passengers illegally crossing the track and travelling on footboard at Chennai Railway station. pic.twitter.com/ub2gMXNB2t
— Ministry of Railways (@RailMinIndia) November 17, 2019
खुद्द रेल्वे मंत्रालयाने हा कुत्रीचा व्हिडिओ ट्विट केला आहे. चेन्नईच्या पार्क टाऊन स्टेशनवर आरपीएफला ही कुत्री मदत करताना दिसते. पुलाचा वापर न करता जे लोक रेल्वे ट्रॅक ओलांडून जाताना दिसतात, त्यांच्यावर भुंकून त्यांना आपला रस्ता बदलण्यास ती भाग पाडत असते.
चिन्नापोन्नू असे त्या कुत्रीचे नाव आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तिला तिच्या मालकाने सोडून दिले आहे. तेव्हापासुन ती या रेल्वे स्टेशनवरच राहते. गेले दोन वर्ष ती चेन्नईच्या पार्क टाऊन रेल्वे स्टेशनवर राहत असल्याने तिला रोज पोलिस रेल्वे ट्रॅक ओलांडण्यापासून लोकांना रोखताना दिसायचे. हे चुकीचे आहे हे तिला कळून चुकले आणि तीसुद्धा पोलिसमामांसोबत लोकांना तसे करण्यापासून रोखू लागली.
चिन्नापोन्नूचा कुणालाच त्रास होत नाही मंडळी!! उलट तिची मदत होते. ती फक्त खाकीत असलेल्या माणसाचाच आदेश पाळते. तिचा व्हिडियो वायरल झाल्यावर नेटकरी तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत. आजवर पोलिसांना मदत करणारे कुत्रे तुम्ही खूप बघितले असतील, पण आता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनासुद्धा प्राणी मदत करताना दिसत आहेत. प्राण्यांना व्यवस्थित वागणूक दिली तर ते माणसांच्या किती फायदयाचे ठरू शकतात हे अशा उदहारणांनी सिद्ध होते. तुम्हांला काय वाटतं?
लेखक : वैभव पाटील