रिटायर्ड आर्मी डॉग्जना दत्तक घ्यायचंय?? त्यासाठी फक्त हे करावं लागेल!
कुत्रा हा प्राणी सैन्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो. त्याच्या हुंगण्याच्या जबरदस्त क्षमतेमुळे लष्कराच्या तो कामी येतो. साधारण माणसासाठी जसा कुत्रा एक खरा मित्र असतो तसाच तो सैन्यासाठी पण विश्वासार्ह असतो. हे सगळं असलं तरी असं म्हणतात की सैन्यातील कुत्र्यांना निवृत्तीनंतर ठार केलं जातं. पण हे काल परवापर्यंत होत होतं. आता तुम्ही सैन्यातील कुत्रा दत्तक घेऊ शकता.
मंडळी, सैन्यातील निवृत्त अधिकारी रोहित अग्रवाल यांनी ट्विट करून भारतीय नागरिकांना सैन्यातील श्वान दत्तक घ्या अशी विनंती केली आहे. या श्वानांनी जवळजवळ ७ वर्ष देशाची सेवा केली आहे. आता ते निवृत्त झाले आहेत आणि त्यांना एका नव्या घराची गरज आहे.
These dogs have served the Nation for seven years, now age catching. You can adopt them and give them a loving home. All you need to do is submit an affidavit.
— Rohit Agarwal (@ragarwal) April 16, 2019
Write to Comdt RVC Centre & College, Meerut Cantt, Meerut - 250001
Courtesy @Ranteej_Kolwat @adgpi pic.twitter.com/086FDXYkIs
सैन्यातून निवृत्त झालेल्या श्वानांना मारून टाकण्याची प्रथा आता बंद झाली आहे. त्याऐवजी त्यांची रवानगी संरक्षण पथकात केली जाते. काही कुत्र्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवलं जातं. पण खरं तर श्वानांना माणसाची सवय असते. अशावेळी जर त्यांना एका कुटुंबात जागा मिळाली तर त्यांना आधार मिळू शकतो.
मंडळी, यासाठी प्रक्रिया पण अगदी सोप्पी आहे. तुम्हाला एक शपथपत्र (affidavit) बनवून पुढील पत्त्यावर पाठवायचं आहे. शपथपत्र पाठवल्यानंतर सैन्यातर्फे तुम्हाला संपर्क केला जातो आणि पुढील प्रक्रिया केली जाते.
पत्ता : कमांडंट आरवीसी सेंटर अँन्ड कॉलेज, मेरठ कॅन्ट, मेरठ - 250001.
मंडळी, सैन्यासाठी राबलेल्या या छोट्या जवानांना नक्कीच त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. बोभाटाच्या वाचकांपैकी कोणाकोणाला त्यांना घरी आणायला आवडेल ??