दसरा विशेष: सांगली जिल्ह्यातल्या कवठे एकंदची आतषबाजी..

Subscribe to Bobhata

तर मंडळी, आपला महाराष्ट्र वेगवेगळ्या अफलातून गोष्टींनी भरलेला आहे. पण आपणच आपला उदोउदो करत नसल्यानं मराठी माणसांचे कलागुण सगळ्यांपर्यंत पोचत नाहीत. असेच भन्नाट कलागुण भरलेयत सांगली जिल्ह्यातल्या कवठे एकंदच्या गांवकर्‍यांमध्ये. या गांवी दरवर्षी दसर्‍याच्या रात्री डोळ्यांचे पारणे फिटतील अशी आतषबाजी रात्रभर चालते. आसपासच्या गावांतून हे दारूकाम बघण्यासाठी गावात गर्दी होते.  यावर्षी या गावकर्‍यांनी समस्त मराठीजणांना व्हॉटसऍपच्या माध्यमातून साद घातलीय. तेव्हा शक्य असेल तर आजच्या रात्री कवठे एकंदला जरूर भेट द्या. 

नक्की काय आहे कवठे एकंदमध्ये?

खरंतर कवठे एकंद हे खूप लहानसं खेडं आहे. सांगली जिल्ह्यातल्या तासगांव तालुक्यातलं. तासगांवपासून साधारण पाच-सहा किलोमीटर्सवर असणारं. इथलं बिर्‍हाडसिद्ध हे देवस्थान प्रसिद्ध आहे. श्रावणातल्या दर सोमवारी इथं जत्रा भरते आणि आसपासच्या गावातले लोक कवठ्यापर्यंत चालत येतात.  श्रावणातल्या रिमझिम पावसात तर पाच-सहा किलोमीटर्स हे अंतर काही जास्त नाही.  तर या बिर्‍हाडसिद्धासमोर दसर्‍याच्या रात्री म्हैसूरच्या दारूकामाच्या बरोबरीने असलेली आतषबाजी केली जाते. 

असं म्हणतात की ही दोनशे वर्षांहूनही अधिक काळापासून चालत आलेली परंपरा आहे. इथल्या दारूकामासाठी लागणारी शोभेची सर्व दारू गावातच बनवली जाते. रुई, शेवरी, चुना पावडर, हडताळ, विविध रंगांचा खार, हजार स्फोटकं, असं साहित्य वापरुन
शोभेची दारू बनवतात. आपल्याकडं जशी गणेशोत्सव मंडळं असतात, तशी तिथं दारूकाम मंडळंही आहेत. त्यामुळं प्रत्येक मंडळात बनणार्‍या दारूकामाचा फॉर्मुला हे त्यांचं-त्यांचं ट्रेड सिक्रेट असतं.  लोक यातही बरेच प्रयोग करतात आणि हे रहस्य त्या-त्या गटातल्या मुख्य व्यक्तीकडं गुपित ठेवलं जातं. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींकडे हे शास्त्र असतं, त्याला 'गोलंदाज'  म्हणतात.  आज गावात शोभेची दारू बनविणारे ३ ते ४ हजार 'गोलंदाज' आहेत, यावरुन येथील उत्सवाचा अंदाज येईल. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच या उत्सवात आणि दारूकाम बनवण्यात सहभागी होतात. दसर्‍यानंतर लोक दिवाळीसाठीही इथले फटाके येऊन घेऊन जातात. 

 

कसे होते हे दारूकाम?

शिंगटी:

ही  शोभेची दारू खरंतर झाडाच्या बुंधा पोखरून त्यात भरली जाते. चिंचेचं झाड यासाठी जास्त उपयोगी ठरतं. चार- पाच फूट लांबीचा चिंचेच्या झाडाचा बुंधा कापून त्यात तीन-चार इंच व्यासाचं आरपार छिद पाडतात आणि त्यात लाकडी मुसळ्याने शोभेची दारू ठासून भरतात. बरेचदा ही अशी दारू भरताना स्फोट होतात आणि दरवर्षी  अशी किमान एखादी तरी दुर्घटना घडतेच घडते. तर या चिंचेच्या खोडात भरलेल्या दारूला शिंगटं म्हणतात. हे शिंगटं किंवा शिंगटी रस्त्याच्या कडेला तीन-तीन फुटांचे खड्डे खणून त्यात बसवतात. ही शिंगटी  तब्बल दीड-दोनशे फूट उंच उडते. आणि आकाशात मस्त रंगीबेरंगी तुषार दिसतात.

औट: 

पोखरलेल्या नारळात दारू भरून हा औट नावाचा फटाका तयार करतात. हा औट आकाशात भिरभिरत जाऊन फुटतो. कधीकधी हा औट आकाशात एखादा देखावाही तयार करतो.  पण हाच औट परत येऊन एखाद्या घरावर पडला तर घराची कौलंही फुटतात. 

जमिनीवरचे देखावे: 

शिंगटी आणि औट आकाशात जाऊन फुटतात पण जमिनीवरचे देखावेही काही कमी नसतात. एका काठीवर देखावा उभा केला जातो. त्यातही मोर, फुगडी हे नेहमीचे यशस्वी कलाकार. एकदा का पेटवलं की काठीभोवती बांधलेली दारू त्या काठीला गोल-गोल भिरवते आणि नाचरा मोर किंवा फुगड्या घालणार्‍या बायका मनोहारी दिसतात. दरवर्षी या देखाव्यांत भर पडतच राहते.

आजवर  डिस्को, सोनेरी झाड, कारंजे, सुदर्शन चक्र, फुगडी, मोर, स्वागत कमान, धबधबे, भारताचा नकाशा, गेटवे ऑफ इंडिया, अमेरिकेतील र्वल्ड ट्रेड सेंटरचा नजारा या आतषबाजीतून जमिनीवर आणि आकाशात दाखवला गेलाय. यावर्षी तर आर्मीने केलेला सर्जिकल स्ट्राईक हे मुख्य आकर्षण असणार आहे. दरवर्षी घडणार्‍या दुर्घटना सोसूनही आज कवठे एकंद आपली परंपरा पुढे चालवत आहे. इतक्या जुन्या परंपरेचे काही दस्तावेज आज उपलब्श नसले तरी तरी तिचं संवर्धन केलं जातं आहे, हे ही काही कमी नाही. 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required