computer

गावकऱ्यांच चोराला पत्र...थेट चोराला पत्र लिहिण्याची वेळ का आली? गावकऱ्यांनी पत्रात काय म्हटलंय ?

सलमान खानचा मैंने प्यार किया आठवतोय. तोच सिनेमा ज्यात भाग्यश्री कबूतरामार्फत सलमानसाठी पत्र पाठवते. कबुतर जा जा....आठवला का तो सिनेमा?? हा तोच तोच..... बरं,आता तुम्ही म्हणाल की मध्येच कसा काय बुआ पत्राचा विषय निघाला. पत्र पाठवण्याचा, पत्र येण्याचा, पत्राची वाट पाहण्याचा जमाना तर काळाच्या ओघात नाहीसा झालाय. आता डायरेक्ट वॉट्स अँप करायचा जमाना आहे. पण....पण मित्रांनो, जगात आजही अश्या काही घटना घडतात,जिथे हा पत्र पाठवण्याचा प्रकार फायद्याचा ठरतोच ठरतो. चला तर मग पाहूया एका पत्राची आणि त्यामागच्या घटनेची गोष्ट..

मध्यप्रदेशातील बैतुलमधील मलकापूर ह्या गावी चोरी झालीये. मलकापूर मधील स्मशानभूमीत एकूण ७० झाडे आहेत. चोरांनी स्मशानभूमीतील झाडांना पाणी घालण्यासाठी असलेली १५० फूट लांब पाईप चोरून नेला आहे.

गावकऱ्यांच्या भावना मात्र ह्या घटनेने प्रचंड दुखावल्या गेल्या आहेत. कारणही तसंच आहे. गावातील सर्व लोकांनी पैसे जमवून हा पाईप विकत घेतला होता. त्यामुळेच चोरीमुळे गावातील प्रत्येक नागरिक दुखावला गेला आहे.

गावकऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तशी तक्रारही नोंदवली होती. पण पोलिसांना काही चोराचा सुगावा लागला नाही. म्हणून शेवटी गावकऱ्यांनी थेट त्या चोरालाच पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला. सध्या ही घटना आणि गावकऱ्यांच पत्र चर्चेचा विषय ठरला आहे. ते का आता जाणून घेऊया.

या पत्राचे शीर्षक “एक पापी चोर के नाम” असे आहे. तर पत्राची सुरुवात 'प्रिय चोर' अशी तिखटगोड केलेली आहे.

ह्या पत्रातील सर्वात प्रभावी ओळ म्हणजे, “एक दिन इसी मोक्षधाम में आपको भी आना है. इसलिये यहा से चोरी किया हुआ सारा सामान चूप-चाप यहीं वापस रख दो."

(एक दिवस तुम्हालाही या स्मशानभूमीत परत यावे लागेल. तर तुम्ही चोरी केलेल्या सगळ्या वस्तू परत करा.)

पुढे जाऊन त्या पत्रात असेही लिहिले आहे की," जेव्हा तुम्ही हे जग सोडून जाल, तेव्हा तुमचे प्रेतही ह्याच स्मशानभूमीमध्ये आणले जाईल. तेव्हा तुमचे जे नातेवाईक येतील, त्यांना सावलीमध्ये काही घटका बसता यावे म्हणून ही झाडे लावली गेली आहेत. "

तर, एकंदर असा चोराला चांगलीच समज देणारा मजकूर असलेले हे पत्र गावकऱ्यांनी बऱ्याच घरांच्या भिंतीवर लावलेले आहे. त्यांची अशी इच्छा आहे की ज्याने कोणी स्मशानभूमीतील पाईप चोरला आहे त्याने हे पत्र वाचून पाईप परत करावा.

तुम्हाला काय वाटतंय, गावकऱ्यांच्या पत्रामुळे चोर पाईप परत करेल का?

 

लेखिका: स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required