computer

बोभाटाची बाग : भाग २० - खैर, मोह, कवठ, रिठा आणि अशा महत्त्वाच्या मध्यम उंचीच्या झाडांबद्दल तुम्हांला हे सगळं माहित आहे का??

गेल्या आठवड्यात तुम्ही बोभाटाच्या बागेत आला होतात तेव्हा बर्‍याच ओळखीच्या, पण अनोळखी वृक्षांशी आपला परिचय झाला होता. कदाचित बागेत फिरताफिरता कोणत्या जंगलात अडकलो असंही तुम्हाला वाटलं असेल. पण आजच्या यादीतल्या वृक्षांची नावं वाचली की तुम्हाला अगदी गावाजवळ आल्यासारखं वाटेल. या मध्यम आकाराच्या आणि उंचीच्या वृक्षांमध्ये अनेक ओळखीची नावं तुम्हाला दिसतील. उदाहरणार्थ :रिठा, पांगारा, कवठ, मोहा, खैर, शेवगा!!

देशी वृक्ष अभियानाच्या अंतर्गत आज यातल्या काही वृक्षांची अधिक माहिती वाचूया! अर्थातच, संपूर्ण यादी लेखाच्या शेवटी वाचायला मिळेल.

रिठा :

शाळेत काळीकुळीत बी घासून त्याचा चटका देण्या-घेण्याचा खोडकरपणा सगळ्यांनीच केला असेल. तोच हा रिठा! लालसर तपकीरी फळाच्या आत ही काळी बी असते. रिठ्याचं शास्त्रीय नाव Sapindus mukorossi. रिठा पाण्यात भिजवल्यावर साबणासारखा फेस येतो म्हणून त्याची जातकुळी झाली Sapindus. या फेसाचे कारण असते त्यात असलेले सॅपोनीन हे रसायन! पारंपारिक पध्दतीत सोन्याचे दागिने धुण्यासाठी रिठा वापरला जातो, केस धुण्यासाठी शिकेकाईच्या सोबत रिठ्याचा समावेश केला जातो, कारण साबणापेक्षा हा नैसर्गिक साबण सौम्य पध्दतीने सफाईचे काम करतो. अनेक त्वचा विकारांवर पण रिठा काम करतो.

औषधी गुणांव्यतिरिक्त या रिठ्याचा एक नवा उपयोग शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. तेलविहीरीतील तेल उपसण्याची पारंपारिक पध्दत जिथे हात टेकते, तेथे रिठा काम करतो. त्याच्या 'सर्फँक्टंट ' गुणामुळे उरलेसुरले तेलही बाहेर काढता येते. आपल्या देशी वनस्पतीचे असे नवनवे उपयोग परदेशी शास्त्रज्ञ शोधत आहेत. अशीच एक भाजी गवारीची! गवारीच्या गोंदाला आंतराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे आणि इतके वर्ष गवार खाऊन आपण 'गँवार'च राहिलो. देशी वृक्ष अभियानाचे महत्व कळावे म्हणून ही माहिती इथे दिली, बस्स इतकेच!

खैर-

'खदिरांगार' हा शब्दप्रयोग मराठीत तुम्ही नक्की वाचला असेल. खैराच्या झाडाचं संस्कृत नाव खदिर! खैराच्या झाडापासून बनवलेला कोळसा अत्यंत लाल रंगाने तळपत जळतो, त्यावरून हा शब्दप्रयोग आला. Senegalia catechu या नावाने ओळखले जाणारे हे झाड प्रसिध्द आहे त्याच्यापासून मिळणार्‍या काथासाठी. भारतीय पान संस्कृतीत काथाचे महत्व वेगळे सांगायला नको. पण याच काथाने या झाडाचा सत्यानाश केला आहे असे म्हणायला हरकत नाही. पान खाणं असभ्य दिसतं म्हणून लोकांनी 'गुटखा' खायला सुरुवात केली. गुटख्याची चव काथावर अवलंबून असल्याने या वृक्षांची अतोनात कत्तल झाली. त्यावर अनेक प्रकारची बंदी आली आणि काही प्रमाणात हा वृक्ष वाचला. आता गुटख्यात असतो तो काथ नव्हे, तर इंडोनेशीयातील 'गंबीर' या झाडापासून बनलेला काथ!

आता तुम्हाला देशी वृक्ष अभियानाचे महत्व अधिकच कळले असेल!

कवठ :

या वृक्षाची ओळख म्हणजे त्याचे फळ! वर क्रिकेटच्या सिझन चेंडूसारखे कवच आणि आत मऊ आंबट गर! या आंबट गरामुळे या झाडाला लिमोनिया अ‍ॅसिडीसिमा हे नाव मिळाले आहे. लिमोनिया हा शब्द अरबी आहे, तर अ‍ॅसिडीसिमा म्हणजे आंबट. त्याला दुसरेही नाव आहे जे त्याच्या फुलोर्‍यावरून दिले आहे. फेरोनिया एलीफंटम! या नावाची कथा अशी आहे की या झाडची फुलं अगदी नाजूक असतात, अगदी एखाद्या परीसारखी. ग्रीक भाषेत परीला फेरोना म्हणतात. हत्तींचे हे आवडते फळ-म्हणून नाव झाले फेरोनिया एलिफंटम.

या निमित्ताने एक छोटीशी बाब ध्यानात आणून द्यायची आहे ती अशी की कठीण वाटणार्‍या शास्त्रीय शब्दांचा अर्थ कळला की ती फार सोपी वाटतात. इंग्रजीत याचे नाव आहे वुड अ‍ॅपल, तर संस्कृतात कपित्थ, दहीफल, कपीप्रिय, अशी अनेक नावं आहेत. चटण्या, सरबतं बनवण्यासाठी या फळांचा वापर केला जातो. जर तुम्ही कृष्णेकाठच्या दत्ताच्या ठिकाणी म्हणजे औदुंबर किंवा नरसोबाच्या वाडीला दर्शनासाठी गेलात तर तिथे कवठाची बर्फी मिळते, ती अवश्य चाखून बघा.

मोह :

या वृक्षाच्या प्रेमात पडला नाही त्याला तर आपण 'हाय, कंबख्त! तूने पीही नही' असेच म्हणू! आंबेमोहर तांदूळ शिजताना जो सुगंध घरात दरवळतो, तसाच पण थोडा उग्र आणि गोड सुगंध मोहाच्या फुलांना असतो. मोहाच्या फुलांच्या प्रेमात फक्त माणूसच नव्हे, तर पशू- पक्षी - कीटक सगळेच असतात. त्याच्या गोड सुगंधामुळे त्याला मधुका लाँजीफोलीया हे नाव मिळालं. मधुका म्हणजे मधासारखे गोड, तर लांब पानाचे झाड म्हणून लाँजीफोलीया. घाटावर, मराठवाड्यात, कोकणात.. सर्वत्र हे झाड बघायला मिळते. याच्या फुलापासून बनवलेली दारु अत्यंत लोकप्रिय तर आहेच, पण बर्‍याच आदिवासी संस्कृतीत लग्नाच्या वेळी अगदी 'इसेन्शीअल' यादीत मोडते.

अनेक शहरांत मोहाची बनावट दारु विकली जाते. आता इतकी मोठी मागणी असल्यावर फुलं येईपर्यंत थांबतंय कोण? पण आपल्या माहितीसाठी - फळाला मोहटी म्हणतात आणि त्याची भाजी केली जाते. बियांपासून जे तेल मिळतं ते एकेकाळी वंगण म्हणून वापरलं जायचं. अती उंचीवरून उडणार्‍या विमानात पण एकेकाळी वंगण म्हणून या तेलाचा वापर केला जायचा. कारण अत्यंत थंड तापमानातही हे तेल गोठत नाही.

शेवगा:

अगदी आपल्या अंगणात असलेले हे झाड! आपण याच्या शेंगांची भाजी या पलीकडे या झाडाकडे फारसे लक्ष दिले नाही. शेवग्याबद्दल हा आमचा लेख तुम्ही वाचला असेल तर वेगळे काही सांगायला नको. पण वाचला नसेल तर इतकंच सांगतो की शेवग्याच्या औषधी गुणधर्मांची ओळख करून द्यायची झाली तर चार पानंदेखील कमी पडतील. आपल्या कानावर आपल्याच झाडाची किर्ती किती उशीरा पोहचते याचे उदाहरण म्हणजे शेवगा! भारतातून आखाती देशात एक्स्पोर्ट होणार्‍या शेवग्याच्या शेंगांची जेव्हा चणचण भासायला लागली तेव्हा शेवग्याची व्यापारी लागवड आपल्याकडे सुरु झाली. आम्ही अधिक काही सांगण्यापेक्षा देशी वृक्ष अभियानाचे डॉ. मधुकर बाचूळकर आणि डॉ अशोक वाली यांचे 'बहुगुणी शेवगा' हे पुस्तक वाचा इतकेच आम्ही सांगू.

बोभाटाच्या बागेत आज आपण या ओळखीच्या काही झाडांची माहिती आपण वाचलीत. पण आपले देशी वृक्ष वैभव खूप मोठे आहे. म्हणून सोबत जोडलेली मध्यम आकाराच्या झाडांची यादी जरूर वाचा.

मध्यम आकाराचे वृक्ष:

(कंचनार)

करंज, शिवण, आपटा, कांचन, कंचनार, रिठा, भोकर, बेल, बहावा, सीताअशोक,

ताम्हण (जारूळ), बहावा (अमलतास), तिवर, पळस, पांगारा, करमळ, नागकेशर,

(उंडी)

उंडी, आंबा, गुलभेंडी, गणेर (सोनसावर), कवठ, वारस, शिसम, चारोळी, बिब्बा,

मोहा, टेमरू, र्त्मगुंज, आवळा, गोंदणी, धावडा, आंबाडा, सुकाणु, कोकम, शमी,

(बारतोंडी)

खैर, बुचपांगारा, बाभूळ, समुद्रफळ, धामण, कासी, रूद्राक्ष, बेलपटा, निंबारा,

कळम, बोर, बारतोंडी, खिरणी, हिंगणबेट, शेवगा, तिवस, हिरडा, तिरफळ, निवर.

 

हे वृक्ष दुर्मिळ तर नक्कीच नाहीत. म्हणूनच तुमच्याकडे या झाडांचे फोटो असले तर जरूर शेअर करा.