computer

बोभाटाची बाग : भाग २४ - 'थीम गार्डन'चे अस्सल भारतीय प्रकार 'नक्षत्रवन', 'नवग्रह वाटीका', 'राशी वाटीका' !!

आज बोभाटाच्या बागेत फिरताना गीतकार पी. सावळाराम यांनी लिहिलेले आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेले 'असावे घर ते अपुले छान' हे जुने गाणे आम्हाला आठवले. 

पुढे असावा बागबगीचा। 
वेल मंडपी जाई-जुईचा||
आम्रतरूवर मधुमासाचा।
फुलावा मोहर पानोपान||

अशी बाग सर्वांनाच हवीहवीशी वाटते पण शहरीकरणाच्या सपाट्यात आता बागा हरवल्याच आहेत. घरात ठेवण्याची झाडं म्हणजे 'इन डोअर प्लँट' ही फक्त फॅशन झाली आहे. शहरांची निर्मिती करताना बर्‍याच टाऊन प्लॅनींगच्या नकाशात 'गार्डन प्लॉट' राखीव ठेवले जातात, पण त्यावर बागा फुलतच नाहीत. काही दिवसांनी त्यावर अनधिकृत घरं तयार होतात आणि बागेचा विषय संपतो. असं घडत असताना काही निसर्गप्रेमी त्यातूनही मार्ग काढतात आणि त्यातून 'थीम गार्डन' जन्माला येते. अशा काही थीम गार्डनच्या रचनेबद्दल आज आपण जाणून घेऊ या.

आपल्या प्राचीन संस्कृतीत निसर्ग हा देवदेवतांच्या सोबत जोडला गेला आहे. आपल्या रितीभाती पण वृक्ष संस्कृतीसोबत जोडल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, काही कुटुंबांसोबत त्यांचे मूळ वृक्ष दैवत जोडले गेले आहे. त्या कुटुंबाची कुलदेवता जेथे निवास करते ते त्यांचे 'देवक' असे म्हटले जाते. 

उदाहरणार्थ: चव्हाण: कळंब, वासुंदीवेल, रुई. थोरात:  कळंब, केतकी, पिंपळ. महाडीक : कळंब, पिंपळ.

ही आपले सामाजिक जीवन निसर्गासोबत कसे जोडले गेले आहेत हे दर्शवणारी प्रातिनिधिक स्वरुपाची उदाहरणे आहेत. लग्नकार्य आणि इतर धार्मिक प्रसंगांच्यावेळी या वनस्पतींचे कार्यात उपस्थित असणे आवश्यक समजले जाते. आता देवता म्हटली की त्या देवतेसोबत आकाश आले , आकाश आले म्हणजे राशी आल्या , राशींसोबत त्यांची नक्षत्रे पण आली. एकूण २७ नक्षत्रे असतात. एका राशीत साडेतीन नक्षत्रे असतात असे समजले जाते. या प्रत्येक नक्षत्राचा संबंध पृथ्वीशी वनस्पतींच्या माध्यमातून जोडला जातो. या संकल्पनेतून जन्माला आलेले काही थीम गार्डन म्हणजे 'नक्षत्र वन/वाटिका 'राशी वन- वाटिका आणि नवग्रह वन वाटिका.

नक्षत्रवन /वाटिकेची रचना समजून घेण्यापूर्वी एक महत्वाची सूचना : वर लिहिलेला मजकूर 'बोभाटा'चा आहे. त्यातून धर्म- जाती -श्रध्दा- अंधश्रध्दा या विषयांची चर्चा अपेक्षित नाही. वृक्ष संवर्धन हा बोभाटाचा मुख्य विषय आहे. 

डॉ. मधुकर बाचूळकर आणि डॉ. मकरंद ऐतवडे  यांच्या 'झाड लावताना' या पुस्तीकेत या नक्षत्र वनाची  रचना कशी असावी याबद्दल मार्गदर्शन केले आहे. 

नक्षत्र वन तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे १०००० स्क्वे. फूट गोलाकार जागा निवडावी. गोलाकार जागेच्या केंद्रकापासून ४० फूटावर वर्तुळाचा परिघ काढून त्याचे समान २७ भाग करावेत . प्रत्येक केंद्रकापासून २० फूटावर पहिला आराध्य वृक्ष आणि त्यापासून दुसर्‍या २० फूटावर दुसरा आराध्य वृक्ष अशी रचना करावी. अनेकदा या नक्षत्रांचे वृक्ष उपलब्ध होत नाहीत. यासाठी तक्त्यात दिल्याप्रमाणे पर्यायी वृक्ष लावावा. 

नवग्रह वाटीका तयार करण्यासाठी १००० चौरस फूट चौकोनी जागा निवडावी. दोन झाडांमध्ये सर्वसाधारणपणे २० फूटाचे अंतर असावे. सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे त्या त्या दिशेला नवग्रहांची झाडे लावावीत. 

राशी वाटीका तयार करण्यासाठी ३००० चौरस फूट गोलाकार जागा निवडावी. या गोलाकार जागेच्या केंद्रातून २० फूट अंतरावर वर्तुळ काढावे व त्याचे बारा भाग करावेत. सुरुवात शून्य अंशापासून करून मेष राशीचे झाड प्रथम लावून इतर राशींची झाडे क्रमाने लावावीत. अशा प्रकारे प्रत्येक भागामध्ये एक झाड लावावे. 

वाचकहो, आता आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा विचारात घेऊ या. यासाठी मध्यम आकाराच्या एका वृक्षाने पर्यावरणीय मूल्य काय असते ते बघा.