computer

बोरीस बेकरला ‘त्या’ मोहाची किंमत २० कोटी डॉलर्समध्ये चुकवावी लागली !!

गेल्या काही दिवसात बोरीस बेकरवर त्याची विंबल्डनची आणि इतर मानचिन्हे विकून कर्ज चुकवण्याची नामुष्की ओढवली आहे याच्या बातम्या आणि चर्चा जोरात चालू आहेत. वयाच्या केवळ १७ व्या वर्षी विंबल्डन जिंकणार्‍या आणि नंतर आणखी दोनदा तोच मान मिळवणार्‍या टेनीसपटूवर ही वेळ का यावी ? ३२ व्या वर्षी निवृत्त झाल्यावर हातात ६.७ कोटीची संपत्ती जमा असताना हा दिवाळखोरीचा प्रसंग बोरीस बेकरवर का यावा हे आज आपण 'बोभाटा'च्या या लेखात वाचणार आहोत.

हा प्रसंग बोरीस बेकरवर ओढवणार हे निश्चितच होते. त्याचे झगमगाटात असणारे राहणीमान, नको तिथे केलेली पैशांची गुंतवणूक आज ना उद्या त्याला या मार्गावर आणणार हे दिसतच होते. दुबईत रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक, नायजेरीयन तेल कंपनीत टाकलेले भांडवल, अशा अव्यापारेषु व्यापारात बुडत असताना वेगवेगळ्या बँकांकडून घेतलेली भरमसाट कर्जं, खाजगी व्यवहारात हातउसने म्हणून घेतलेले पैसे, जेलची वारी चुकावी म्हणून जर्मनीत बुडवलेला कराच्या खटल्यासाठी झालेला खर्च या सगळ्याचा एकत्र परीणाम म्हणजे आजची दिवाळखोरी !!

पण लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की जेतेपणाचे वारे डोक्यात गेल्यावर बोरीस बेकर अनिर्बंध जीवन जगत होता. नैतीकतेच्या पायर्‍या ओलांडून जाण्यात त्याला जो मोठेपणा वाटत होता त्याच खोट्या मोठेपणाने त्याला आज लोळवले आहे. आज आपण वाचणार आहोत बोरीस बेकरचे ते प्रकरण ज्याची किंमत कोट्यावधी डॉलर्समध्ये चुकवावी लागलीच आणि सुरळीत चालालेला संसार पण मोडावा लागला.

हे झाले कसे ?

ही घटना घडली १९९९ साली ! बोरीस तेव्हा आपल्या पत्नीसोबत-बार्बरासोबत-लंडनला आला होता. त्याच्या पत्नीला तेव्हा दिवस गेले होते आणि सातवा महीना लागला होता. एका संध्याकाळी तिला अचानक बाळंतपणाच्या कळा यायला लागल्यावर तिला हॉस्पीटलमध्ये भरती करून बेकर लंडनमधल्या पार्कलेनच्या नोबु या परीसरात एका हॉटेलात बियर पित बसला होता. दोन बियर झाल्यावर त्याचे लक्ष वेट्रेसकडे गेले. या वेट्रेसचे नाव होते अँजेला एरमीकोव्ह.

(अँजेला एरमीकोव्ह)

अँजेला एक रशियन मॉडेल होती जी या हॉटेलात वेट्रेस म्हणून काम पण करत होती. बोरीस बेकरच्या म्हणण्याप्रमाणे तिने त्याच्या नजरेला नजर दिली तेव्हा त्या नजरेत "आमंत्रण" होते. त्यानंतर त्याच्या टेबलजवळून ती दोन वेळा मुद्दाम फिरकून गेली तेव्हा त्याने पण तिला 'प्रतिसाद' दिला. काही वेळाने ती जेव्हा हॉटेलच्या टॉयलेटकडे जायला लागली तेव्हा बोरीस बेकरपण तिच्यामागे गेला. दोघं पाच मिनीटे एकमेकांशी बोलले आणि त्या बोलण्याचा शेवट 'ब्रूम क्लोजेट' म्हणजे झाडू ठेवण्याच्या खोलीत केलेल्या लैंगीक संबंधात झाला.

(बोरिस बेकरची पत्नी बार्बरा)

बोरीस बेकरने तो "कार्यक्रम" पाच मिनीटात संपवला. त्यानंतर आणखी एक बियर संपवून तो बाहेर पडला. सकाळी तो पत्नीला भेटायला हॉस्पीटलमध्ये गेला तेव्हा तिच्या कळा थांबलेल्या होत्या. दुसर्‍या दिवशी लंडन सोडून तो जर्मनीला रवाना झाला तेव्हा तो आधीच्या दिवशी संध्याकाळी वेट्रेस अँजेला एरमीकोव्ह सोबत केलेला “कॅज्युअल सेक्स” पूर्णपणे विसरून गेला होता.

आणि आठ महिन्यानी....

त्यानंतर बोरीस बेकर त्याच्या जर्मनीतल्या ऑफीसात बसलेला असाताना त्याला एक फॅक्स मेसेज आला. तो वाचल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकलीच. तो फॅक्स अँजेला एरमीकोव्हचा होता ज्यात लिहीले होते की "त्या संध्याकाळच्या" पाच मिनीटाच्या मोहाचे फळ तिच्या पोटात आहे आणि आठवा महीना सुरु आहे. बोरीस बेकरने होणार्‍या बाळाचे पितृत्व स्विकारावे नाहीतर.....

मध्यंतरी गेलेल्या काही महिन्यात अँजेला एरमीकॉव्हला मुलगी झाली आणि बोरीस बेकरने पितृत्व स्विकारण्याचा धोशा तिने त्याच्यामागे लावलाच होता.

बोरीस बेकरने सुरुवातीला अंग झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. खाजगी गुप्तहेरांची मदत घेऊन अँजेलाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. लवकरच त्याला एका खाजगी डीएनए टेस्टचा अहवाल मिळाला ज्यावरून स्पष्ट झाले होते की त्या मुलीचा बाप तो म्हणजे बोरीस बेकरच होता.

काहीच उपाय शिल्लक नाही....

(अँजेला आणि तिची मुलगी अ‍ॅना)

आता बोरीस बेकर समोर एकच उपाय शिल्लक होता तो म्हणजे "बायकोला शरण जाणे". हे शरण जाणे त्याच्या अंगावर "डबल बाँब" सारखे फुटले. बार्बारा मुलांना घेऊन अमेरीकेतल्या फ्लोरीडामधल्या घरी निघून गेली आणि अँजेला पोटगीसाठी हात धुवून पाठीमागे लागली. २००१ मध्ये बार्बराने बोरीसला घटस्फोट दिला. १.५ कोटी डॉलर-फ्लोरीडातले घर आणि दोन्ही मुलांचा ताबा घेऊन हा काडीमोड झाला. अँजेलाला बोरीस बेकरने २० लाखाची पोटगी दिली आणि दरमहा २५००० डॉलरचा खर्च देण्याचे कबूल केले.

एकूण "त्या" पाच मिनीटाची संपूर्ण किंमत २० कोटी डॉलर झाली.

म्हणून लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यशाची हवा डोक्यात गेली की नैतीकतेची पायरी चूकून पाय घसरायला वेळ लागत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required