computer

१४०० रुपये किंमतीच्या नाण्याचा १३८ कोटी रुपयांत झाला लिलाव!! सगळे विक्रम मोडणारं डबल ईगल नाणं आहे तरी काय?

कधी कधी अतिशय सामान्य वाटणाऱ्या काही गोष्टी मात्र वास्तवात अमूल्य असतात. आता अमेरिकेतील गोष्ट बघा, फक्त १४०० रुपये किंमत असलेल्या एका नाण्याचा लिलाव करण्यात आला आणि हा लिलाव तब्बल कोट्यवधींच्या घरात गेला. असे होईल हे कुणालाही वाटले नव्हते. पण नाण्याची ओळख झाली आणि बोली वाढत गेली.

न्यूयॉर्क येथे नुकतेच १९३३ सालच्या सोन्याच्या नाण्याचा लिलाव झाला. या नाण्याला डबल ईगल म्हणतात. या नाण्याने आजवरचे सर्व विक्रम मोडले आहेत. कोणत्याही इतर सोन्याच्या नाण्यासारखे साधारण वाटणारे हे नाणे चक्क १८.९ मिलियन डॉलर्स म्हणजेच १३८ कोटी रुपयांना विकले गेले आहे. या डबल ईगल सोन्याच्या नाण्यासोबतच जगातील सर्वाधिक दुर्मिळ तिकीट पण ६० कोटींना विकले गेले आहे.

हे नाणे पहिल्यांदा २००२ साली शू डिझायनर स्टुअर्ट विट्समन यांच्याद्वारे ५५ कोटींना विकत घेतले गेले होते. आता २० वर्षांनी मात्र त्यांनी यातून घसघशीत कमाई केली आहे. हे नाणे इतक्या प्रचंड किंमतीला विकले जाईल याचा अंदाज कुणीही बांधला नव्हता. जास्तीतजास्त ७५ कोटींपर्यंत हे नाणे विकले जाऊ शकते असा लोकांचा कयास होता.

आता या नाण्याकडे वळूया.  हे डबल ईगल नाणे अमेरिकेतील शेवटचे सोन्याचे नाणे आहे. १९३३ साली अमेरिकेत ग्रेट डिप्रेशनमुळे सुरू असलेल्या प्रचंड मोठ्याप्रमाणातल्या आर्थिक मंदीमुळे अमेरिकन अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी सर्व सोन्याची नाणी वितळवण्याचा आदेश दिला होता. या प्रक्रियेतून जी नाणी वाचली त्यातील हे शेवटचे नाणे आहे.

या सोन्याच्या नाण्याच्या एका बाजूला उडणाऱ्या गरुडाचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला लिबर्टीचे चित्र आहे. या नाण्याची खास डिझाईन आणि हे अमेरिकेच्या इतिहासातील शेवटचे नाणे असल्या कारणाने या नाण्याला मोठी किंमत मिळाली आहे. 

या नाण्यासोबतच १८५६ सालचा हा जगातील सर्वात प्रसिद्ध स्टँप 'ब्रिटिश गयाना वन-सेंट मॅजेन्टा' ८.३ मिलियन डॉलर म्हणजेच ६० कोटींना विकला गेला आहे. हा स्टँप देखील विट्समन यांच्याच मालकीचा होता. ते सांगतात की, "हे नाणे आणि स्टॅम्प मिळवणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. मी १२ वर्षांचा होतो तेव्हापासून नाणी आणि स्टँप गोळा करत आहे. ही नाणी आणि स्टॅम्प मिळवून मी आयुष्य सार्थकी लावले असे मला वाटत आहे."

या लिलावातील तिसरी खास गोष्टही एक स्टँप आहे. या स्टँपला इन्वर्टेड जेनी म्हणतात. या स्टँपच्या मधोमध दिसणारे विमान हे उलटे छापण्यात आले होते. या चुकीमुळे हे स्टँप अमेरिकन इतिहासात प्रसिद्ध झाले आहे. या स्टँपला ४.८६ मिलियन म्हणजे जवळजवळ ३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची बोली लागली होती.

जगात आपल्या शौकीनपणासाठी कितीही किंमत मोजणारे लोक आहेत हेच या निमित्ताने समोर येत आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required