computer

५० वर्षं खपून एका मिल कामगारानं या जंगलात काय केलं हे पाहा..

फिनलंडच्या Veijo Rönkkönen या माणसाने ४१ वर्ष एका पेपर मिलमध्ये काम केलं. तो काहीसा एकलकोंडा होता. दिवसभर काम करणे आणि संध्याकाळी घरी परतणे हाच त्याचा दिनक्रम होता. हा साधा माणूस जिवंत होता तोपर्यंत लोकांच त्याच्याकडे लक्ष गेलं नाही, पण त्याच्या मृत्युनंतर (२०१०) सगळ्या जगाचं लक्ष त्याने वेधून घेतलं. काय होतं त्याच्यात खास? चला जाणून घेऊ.....

मंडळी, विएहो हा एक शिल्पकार होता. त्याने त्याचं आयुष्य शिल्पे तयार करण्यात घालवलं. त्याने तयार केलेली असंख्य शिल्पे त्याच्या घराच्या जवळच्या जंगलात विखुरली आहेत. तो गेल्यानंतर लोकांना याचा पत्ता लागला.

त्याच्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी थोडं मागे जाऊया. त्याचा जन्म १९४४ चा. त्याने अवघ्या १६ व्या वर्षी मिलमध्ये कामाला सुरुवात केली. त्याला ओळखणारी माणसं म्हणतात की त्याने आपल्या पहिल्या पगारातून सफरचंदाच्या बिया आणि सिमेंट विकत घेतलं होतं. अशा प्रकारे त्याच्या घराजवळचं जंगल आणि पुतळे एकत्रित तयार होत गेले.

मंडळी, पेपर मिल मध्ये काम करणारा साधारण कर्मचारी एक शिल्पकार होता यापेक्षा जास्त  नवल ती शिल्पं कशी तयार केली आहेत यात आहे. आपण ही शिल्पं थोडी जवळून पाहूयात.

फोटोत दिसणाऱ्या पुतळ्याच्या तोंडात खरोखरचे दात असावेत असं वाटतं ना? खरं तर हा कलेचा नमुना वगैरे नसून खऱ्याखुऱ्या माणसाचेच दात आहेत. ते कोणाचे आहेत आणि विएहोने ते कसे मिळवले हे अजूनही एक गूढ आहे. असे अनेक पुतळे या भागात सापडतात. याशिवाय काही पुतळ्यांच्या तोंडात स्पीकर्स बसवण्यात आलेत. या स्पीकर्समधून विचित्र आवाज निघत असतो.

तिथलं जंगल आणि विखुरलेली शिल्पे मिळून एक गूढ आणि रहस्यमय जग तयार झालं आहे. या शिल्पांमधून विजोने लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्री-पुरुष अशा सगळ्या मानवांचा भावभावना दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आश्चर्य म्हणजे विएहो शिल्पकला शिकला नव्हता आणि तरीही त्यानं ही सारी शिल्पं तयार केली आहेत.

विएहोला शिल्पकलेशिवाय योग साधनेची आवड होती. त्याची ही आवड त्याने आपल्या कलेत उतरवली आहे. योगा करत असलेले जवळजवळ २५५ नग्न पुतळे त्याने तयार केलेत. मंडळी, आज विएहोची शिल्पकला लोकांना आकर्षित करत आहे. दरवर्षी जवळजवळ २५००० माणसं विएहोच्या कलेला पाहण्यासाठी येतात. अनेकांना ते विचित्र, गूढ, भीतीदायक सुद्धा वाटतं.

सबस्क्राईब करा

* indicates required