हिटलरला विष्णूचा अवतार मानणाऱ्या कोण होत्या या बाई ?

विष्णूचे दहा अवतार आहेत असं म्हटलं जातं. यातील वामन अवतार, परशुराम, राम आणि कृष्ण हे अवतार मानवी अवतार म्हणून ओळखले जातात. कलीयुगात ‘कलीचा अवतार घेऊन विष्णू पुन्हा पृथ्वीवर येणार असंही मानलं जातं. हे सर्व अध्यात्मिक स्तरावरचं झालं, पण खरंच विष्णू पुन्हा अवतार घेऊन पृथ्वीवर येईल ही एक कवी कल्पना वाटू शकते.
मंडळी, भारतात या गोष्टीवर विश्वास ठेवणारे अनेक असले, तरी आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीशी ओळख करून देणार आहोत जिनं भारतीय नसूनही या गोष्टीवर विश्वास ठेवला. फक्त विश्वास ठेवला नाही इतकंच नाही, तर तिने कलीचा तो अवतार कोण होता याचा शोधही लावला होता. तिच्या म्हणण्याप्रमाणे हा अवतार होता ‘अडॉल्फ हिटलर’!!
तुम्ही बरोबर ऐकलंत राव. हिटलर हाच कलीचा अवतार आहे असं त्या म्हणत. मॅक्सिमियानी पोर्तास उर्फ ‘सावित्री देवी’ असं या महिलेचं नाव.
कोण होत्या या सावित्री देवी ?
मॅक्सिमियानी या फ्रांसमधल्या होत्या. त्यांचे वडील ग्रीक-इटालियन होते, तर आई इंग्रज. त्या शिक्षणात अव्वल होत्या. त्यांच्याकडे केमिस्ट्रीमधली मास्टर्स डिग्री होती. त्याचबरोबर त्या गणितात डॉक्टरेटसुद्धा होत्या. त्यांचे विचार हे सुरुवातीपासून समानतेच्या मतांविरुद्ध होते. नात्झी जर्मनीच्या उदयानंतर त्या हिटलर आणि त्याच्या नात्झी विचारांकडे आकर्षित झाल्या.
सावित्रीदेवींचं सरळ मत होतं की एक कृष्णवर्णी आणि गौरवर्णी समान कसे असू शकतात? हाच असमानतेचा विचार त्यांना हिटलरकडे घेऊन गेला. नात्झी विचारांमधला एक महत्वाचा विचार होता तो म्हणजे ‘आर्यन’ हीच फक्त शुद्ध रक्ताची मानवजात असून ती जगातल्या सर्व संस्कृतींचं मूळ आहे. या विचारांना अनुसरून मॅक्सिमियानी यांनी आर्यांच्या भूमीत म्हणजे भारतात जायचं ठरवलं. तिने भारतात येऊन आर्यांवर अभ्यास केला आणि ती भारताच्या प्रेमातच पडली.
भारतात आल्यानंतर त्यांनी आपला धर्म बदलला. त्या हिंदू झाल्या आणि त्यांनी आपलं नाव ‘सावित्री देवी’ ठेवलं. पुढे त्यांनी ‘असित कृष्ण मुखर्जी’ या ब्राम्हण कार्यकर्त्याशी लग्न केलं. आपला नवरा देखील आर्य आहे यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.
भारत शुद्ध आर्यांचा देश का आहे ?
भारतात शुद्ध रक्ताचे आर्य का आहेत, याचा अर्थ त्यांनी असा लावला की भारतीय हे आपल्या जातीबाहेर कोणाशी लग्न करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात रक्ताची सरमिसळ होत नाही. त्यांच्या मताप्रमाणे हिटलरने ज्यूंचं जे हत्याकांड चालवलं आहे ते आर्य वंशाला वाचवण्यासाठी योग्यच आहे. त्यांच्या या नात्झी विचारांमुळे भारतात असताना त्यांच्यावर इंग्रजांनी नजर ठेवली होती.
हिटलर हा विष्णूचा अवतार आहे !
सावित्री देवी यांनी हिंदू पुराण आणि फॅसिझम यांच्या एकत्रीकरणातून असा शोध लावला की हिटलर हा विष्णूचा कलियुगातील अवतार आहे. एक दिवस हा अवतार जगात सत्ययुग आणणार यावर त्यांचा दृढ विश्वास होता. नात्झी विचार हे फक्त राजकारणापुरते मर्यादित नाहीत, तर ते अध्यात्मिक आणि सामाजिक स्तरावर कसे बरोबर आहे हे दाखवून देण्यात सावित्री देवी अग्रेसर राहिल्या.
नात्झी विचारांची धुरा
सावित्री देवी यांनी हिटलरच्या नात्झी कार्याला वाहून घेतलं होतं. त्यांनी सुरुवातीला महात्मा गांधींची भेट घेतली. पण त्यांचे विचार पटले नसल्याने तिने सुभाषचंद्र बोस यांना गाठलं. सुभाषबाबूंची आणि जपानच्या अधिकाऱ्यांची ओळख करून देणाऱ्या या सावित्री देवीच होत्या.
१९४५ साली नात्झी जर्मनीला दोस्त राष्ट्रांनी हरवलं. युद्धात पराभव झाला असला तरी सावित्री देवी लढत राहिल्या. त्यांनी नात्झी विचारांची पुन्हा उभारणी करण्यासाठी कामही केलं. १९४८ साली त्यांनी जर्मनीत जाऊन ‘हिटलर की जय’ असा मजकूर असलेली नात्झी पत्रकं वाटली. इंग्रज अधिकाऱ्यांनी यावरून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना तुरूंगात टाकलं. पुढे त्यांच्या पतीच्या प्रयत्नांनी त्यांना सोडून देण्यात आलं. त्यांनी उर्वरित आयुष्य फ्रांस आणि भारत या दरम्यान घालवले. १९८२ साली सावित्री देवी मरण पावल्या.
सावित्री देवींनी लिहिलेलं ‘द लाइटनिंग अॅंड सन्स' हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. याच पुस्तकात त्यांनी हिटलरला विष्णूचा अवतार म्हणून घोषित केलं होतं. निओ-नात्झी विचार सध्या इंटरनेटच्या माध्यमातून पाय पसरू लागला आहे. याच्या पार्श्वभूमीवर सावित्री देवींचे विचार पुन्हा समोर येऊ लागले आहेत.
जो नात्झी भस्मासुर जर्मनीत गाडला गेला तो पुन्हा मूळ धरेल का असा प्रश्न आता भेडसावू लागला आहे.